मुणगे भगवती देवीचे माहेरघरी प्रस्थान

मुणगे भगवती देवीचे माहेरघरी प्रस्थान

टीपः swt१०१५.jpg मध्ये फोटो आहे.
मुणगे ः देवी भगवतीचे कारिवणेवाडी येथे माहेरघरी आगमन झाल्यानंतर पाडावे बंधूंसह परिवारातील सुहासिनींनी तरंग व देवीचे औक्षण केले. (छायाचित्र ः विश्वास मुणगेकर)

मुणगे भगवती देवीचे माहेरघरी प्रस्थान

कारिवणेवाडीत जल्लोषी स्वागत ः ‘हर हर महादेव’चा जयघोष

सकाळ वृत्तसेवा
मुणगे, ता. १० ः ढोलताशांच्या गजरात आणि ‘हर हर महादेव’ अशा जयघोषात आज सायंकाळी ५ वाजता अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर देवी भगवतीचे कारिवणेवाडी येथे पाडावे बंधूंच्या घरी देवीच्या माहेरघरी जाण्यास मंदिरातून प्रस्थान झाले. कारिवणेवाडी येथे सायंकाळी ६ वाजता देवीचे आगमन झाले. पाडावे बंधूंनी फटाक्यांची आतषबाजी करून समस्त पाडावे परिवार आणि कारिवणेवाडी ग्रामस्थांतर्फे देवी भगवतीचे उत्साहपूर्ण वातावरणात भक्तिभावाने स्वागत केले. हा पारंपरिक माहेरोत्सव पाहण्यासाठी ग्रामस्थांसह हजारो भाविक उपस्थित होते.
मुणगे-कारिवणेवाडी येथे ग्रामदेवता देवी भगवती आज पाडावे बंधूंच्या देवीच्या माहेरघरी जाणार असल्याने देवीच्या आणि देवीसोबत येणाऱ्या भाविकांच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू होती. पाडावे बंधू गेले कित्येक दिवस या सोहळ्याचे नियोजन करत होते. दर तीन वर्षांनी देवी भगवती माहेरघरी जाते. त्या परंपरेनुसार आज सायंकाळी समस्त पाडावे बंधू भगवती मंदिरात उपस्थित झाले. त्यानंतर गावातील ग्रामस्थ, मुंबईकर चाकरमानी उपस्थित झाल्यानंतर देवीच्या प्रतिमूर्तीस दागदागिने व वस्त्रालंकाराने सजविले. देवीच्या प्रतिमूर्तीस पालखीमध्ये बसविले. पालखीसोबत पंचारती प्रज्वलित करून तरंगासह देवस्थानचे मानकरी, देवस्थान समितीचे पदाधिकारी व गावातील ग्रामस्थांच्या लवाजमा कारिवणेवाडीकडे जाण्यासाठी सज्ज झाला. ‘हर हर महादेव’चा आदेश मिळताच पालखी ढोलताशांच्या गजरात वाजतगाजत मंदिरातून कारिवणेवाडी येथे जाण्यास मार्गस्थ झाली. देवी भगवती मंदिराच्या मागील बाजूने महापुरुष घाटीने पालखी कारिवणेवाडीकडे निघाली. यावेळी हजारो भाविकांची रयत उपस्थित होती. मार्गामध्ये भाविकांना शीतपेय, सरबताचे वाटप करण्यात येत होते. सायंकाळी ६ वाजता देवी पाडावे बंधू यांच्या घरी म्हणजेच माहेरघरी येऊन पोहोचली. समस्त पाडावे बंधूंनी देवीच्या तरंगाचे व पालखीतील मूर्तीचे औक्षण केले. देवीसोबत आलेल्या रयतेस सरबत, गुळपाणी, अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले. सायंकाळी ७ वाजता भगवती प्रासादिक भजन मंडळ मुणगे-सावंतवाडी यांचे संगीत भजन झाले. त्यानंतर ७.३० वाजता महाप्रसाद वाटपाची सुरुवात करण्यात आली. रात्री १० वाजता प्रकाश पांडुरंग लब्दे प्रस्तुत श्री देवी भगवती पारंपारिक दशावतार नाट्य मंडळ (डोंबिवली प.) यांचे ‘पुण्याई जन्माची’ हे पौराणिक दशावतारी नाटक सादर करण्यात आले. या दशावतारी नाटकास भाविकांतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
.............
चौकट
दर्शन, गाऱ्हाण्यांसह आज विविध कार्यक्रम
उद्या (ता. ११) सकाळी देवीचे दर्शन, देवीची ओटी भरणे व अवसर काढणे आदी कार्यक्रम होणार आहेत. यावेळी देवीच्या अवसरांजवळ भाविक आपल्या इच्छा-आकांक्षा पूर्ण करण्यासाठी गाऱ्हाणी घालणार आहेत. सायंकाळी ३ वाजता देवी पुन्हा मंदिराकडे जाण्यासाठी मार्गस्थ होणार आहे. भाविकांनी देवीच्या अलौकिक माहेर सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन पाडावे बंधू सहकारी मंडळाने केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com