आरवलीत आज
''नटसम्राट'' नाटक

आरवलीत आज ''नटसम्राट'' नाटक

संक्षिप्त

आरवलीत आज
''नटसम्राट'' नाटक
वेंगुर्ले : आरवली येथील श्री देव वेतोबा मंदिर वर्धापन दिनानिमित्त उद्या (ता. १२) रात्री १० वाजता आरोस गिरोबा युवक नाट्यमंडळ निर्मित वि. वा. शिरवाडकर लिखित मराठी रंगभूमीवर अजरामर ठरलेले ''नटसम्राट'' हे तीन अंकी नाटक सादर केले जाणार आहे. नाटकाचे दिग्दर्शन व आप्पासाहेब बेलवलकरांची प्रमुख भूमिका प्रवीण मांजरेकर यांनी साकारली आहे. या नाटकात निखिल नाईक, महेश कुबल, विनायक नाईक, सखाराम नाईक, बाबू नाईक, विशाल नाईक, जनार्दन नाईक, प्रशांत नाईक, गोविंद नाईक, तन्मय नाईक, रवींद्र नाईक, महेश आरोस्कर, प्रकाश पेडणेकर, दिव्या नाईक, गीता आंगणे, योगिता सावंत, कीर्ती चव्हाण व बालकलाकार निधी नाईक यांच्या भूमिका आहेत. सहदिग्दर्शक रोशन नाईक, नेपथ्य सुरेश सातार्डेकर, रंगभूषा संजय जोशी, प्रकाश योजना युवराज मंगेशकर, तर पार्श्वसंगीत सत्यवान सिलकर यांचे आहे. आरवली श्री देव वेतोबा मंदिर वर्धापन दिन सोहळ्यास बुधवारपासून (ता. ८) प्रारंभ झाला आहे. यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले असून, १५ मे रोजी सांगता होणार आहे. याचा लाभ घेण्याचे आवाहन श्री देव देवस्थान कमिटी आरवलीचे गावकरी, मानकरी व आरवली ग्रामस्थांतर्फे करण्यात आले आहे.


गिअर न्यूट्रल होऊन
टेम्पोची दुचाकीस धडक
दोडामार्ग : येथील बाजारपेठेत उतारावर उभे असलेल्या मालवाहक टेम्पोचा गिअर न्यूट्रल होऊन दुचाकीला धडक दिली. ही घटना शुक्रवारी (ता. १०) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली. गिअर न्यूट्रल होऊन टेम्पो उताराच्या दिशेने धावू लागला. याची कल्पना चालकाला आल्याने त्याने टेम्पोकडे धाव घेत दरवाजा उघडून सुरुवातीला हाताने ब्रेक दाबला, पण टेम्पो थांबला नाही. अखेर चालकाने सीटवर बसून ब्रेक दाबून टेम्पो थांबविला. मात्र, तोपर्यंत टेम्पोने समोर उभ्या असलेल्या दुचाकीला धडक दिली. यात दुचाकीचे नुकसान झाले. यावेळी बजारपेठेतील वर्दळ पाहता सुदैवाने जीवितहानी टळली. मालवाहक टेम्पो चालकांनी गाडी उताराच्या ठिकाणी पार्क करणे घातक असल्याची टीका अनेकांनी केली.

आरवलीत उद्या
आरोग्य चिकित्सा
सावंतवाडी : आरवली वैद्यकीय आणि संशोधन केंद्र, (कै.) हिराबाई नारायण प्रभुझांट्ये नेत्र रुग्णालय आणि आरवली-गावधडवाडी मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आरवली येथे सोमवारी (ता. १३) सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. आरवली वैद्यकीय आणि संशोधन केंद्रात होणाऱ्या‍ या शिबिरात अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. अमित आजगावकर, त्वचारोगतज्ज्ञ डॉ. अभिज्ञा आजगावकर, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. अश्विनी आजगावकर, नेत्ररोग धृती आजगावकर, डॉ. जयप्रकाश, डॉ. प्रग्या पोरवाल यांच्यासह डॉ. पेडणेकर, डॉ. विनायक सावर्डेकर, डॉ. ओंकार खांडेकर व डॉ. प्रदीप येसाजी, आदी डॉक्टर रुग्णांची तपासणी करणार आहेत. सल्ल्यानुसार रुग्णांची रक्त, एक्स-रे, ई.सी.जी. तपासणी मोफत केली जाणार आहे. अधिक माहितीसाठी आरवली वैद्यकीय आणि संशोधन केंद्र येथे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पिकुळे येथे आज
''नागतपस्वी'' नाटक
दोडामार्ग : पिकुळे-शेळपीवाडी येथील श्री विठ्ठल-रखुमाई मंदिर मूर्ती प्रतिष्ठापना २० वा वर्धापन दिन सोहळा उद्या (ता. १२) साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्त सकाळी १०.३० वाजता श्री विठ्ठल-रखुमाई देवतांवर महाअभिषेक, ११ वाजता श्रींची महापूजा, आरती व तीर्थप्रसाद, १.३० वाजता महाप्रसाद, सायंकाळी ५ वाजता भजन व रात्री १० वाजता ओंकार दशावतार नाट्यमंडळ, म्हापण (ता. वेंगुर्ले) यांचा ''नागतपस्वी'' हा नाट्यप्रयोग होणार आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन श्री विठ्ठल-रखुमाई प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com