रत्नागिरी - आचारसंहितेचा अडथळा

रत्नागिरी - आचारसंहितेचा अडथळा

जि. प. शिक्षक भरतीत
पुन्हा आचारसंहितेचा खो

मार्गदर्शन मागवले; समुपदेशनही पुढे ढकलले

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ११ ः लोकसभा निवडणुकीनंतर आता पदवीधर निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्यामुळे जिल्हा परिषद शिक्षक भरती प्रक्रिया पुन्हा अडकली आहे. जिल्हा परिषद प्रशासनाने पुन्हा शासनाकडे मार्गदर्शन मागवले आहे. त्यानंतर भरतीबाबत निर्णय होणार आहे.
मार्च महिन्यात शासनाने राज्यात प्राथमिक शिक्षकांच्या रिक्त जागांचा विचार करून पवित्र पोर्टलवरून भरती प्रक्रिया केली होती. जिल्ह्यात १ हजार ६८ जागांसाठी ही भरती प्रक्रिया होती. त्यापैकी १ हजार १४ उमेदवार या प्रक्रियेला हजर राहिले होते. ही प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली होती. मार्च महिन्यात ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात होती; मात्र शाळांमधील रिक्त पदांवर नवीन शिक्षकांना नियुक्ती देण्यापूर्वी जिल्ह्यातील शिक्षकांच्या अंतर्गत बदल्या कराव्यात, अशी मागणी संघटनांनी केली होती. याची दखल राज्य शासनाने घेतली. जिल्हास्तरावर सुमारे पावणेदोनशे शिक्षकांच्या बदल्या झाल्या. त्यानंतर तालुक्याअंतर्गत समुपदेशन प्रक्रिया घेण्यात आली. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पवित्र पोर्टलद्वारे निवडलेल्या नवीन उमेदवारांना रिक्त पदांवर शाळा देण्यासाठी समुपदेशन घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार १९ व २० मार्चला हे समुपदेशन रत्नागिरीत होणार होते. निवडणूक आयोगाच्या परवानगीशिवाय ही प्रक्रिया करता येणार नसल्यामुळे समुपदेशन ती पुढे ढकलण्यात आली व स्थगित करण्यात आली. याबाबत जिल्हा परिषद प्रशासनाने राज्य शासनाकडे मार्गदर्शन मागवले होते. त्यानुसार एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात मार्गदर्शन पत्र जिल्हा परिषदेला प्राप्त झाले आहे. ज्या जिल्ह्यात मतदानाची प्रक्रिया होईल त्या तारखेनंतर ही बदली प्रक्रिया करावी, असे आदेश दिले आहेत. या आदेशाचा संदर्भ घेत समुपदेशन प्रक्रियेची तारीख निश्चित करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या होत्या. या आठवडाभरात समुपदेशन तारीख निश्चित करून ही भरती प्रक्रिया होणार होती; मात्र समुपदेशनाबाबत विचार करत असतानाच अचानक पदवीधर निवडणुकीची आचारसंहिता आयोगाने जाहीर केली आहे. १० जूनपर्यंत ही आचारसंहिता असणार आहे. त्यामुळे पुन्हा ही भरती प्रक्रिया रखडली. जिल्हा परिषद प्रशासनाने शुक्रवारी पुन्हा एकदा शासनाकडे याबाबत मार्गदर्शन मागवले आहे. आचारसंहितेचे लागलेले ग्रहण सुटता सुटेना, अशी म्हणण्याची वेळ आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com