चिपळूण ः पालिकेच्या करवसुलीला सर्व्हरचा ब्रेक

चिपळूण ः पालिकेच्या करवसुलीला सर्व्हरचा ब्रेक

चिपळूण पालिकेच्या करवसुलीला ब्रेक

सर्व्हर सव्वा महिने बंद; नागरिक मारताहेत हेलपाटे

सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ११ : सव्वा महिन्यापासून शासनाचा करवसुलीचा सर्व्हर बंद असल्याने नागरिकांना पालिकेत कर भरल्याच्या पावत्या देणे शक्य होत नाही. त्यामुळे करवसुलीला ब्रेक लागला आहे. यामुळे नागरिकांना करभरणा करण्यासाठी हेलपाटे मारावे लागत आहेत.
मार्चअखेरपर्यंत चिपळूण पालिकेने थकित व चालू अशी सुमारे साडेतेरा कोटींचा मालमत्ता कर व पाणीपट्टी वसूल केली; मात्र अजूनही लाखोंची वसुली येणे बाकी आहे. नागरिक पालिका कार्यालयात जाऊन आपल्या करांची रक्कम भरणा करत होते. चिपळूण नगर पालिकेला शासनाकडून चालू व थकित करवसुलीचे शंभर टक्के उद्दिष्ट देण्यात आले होते. मार्चअखेरपर्यंत ही वसुली न झाल्यास विविध योजनांखालील विकासनिधी मिळणार नाही, अशा सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात विविध वसुली पथकांमार्फत मालमत्ता कर व पाणीपट्टी वसुलीचे काम सुरू होते. चालू व थकित असा १५ कोटी ९ लाख २९ हजार ३३ रुपये एवढा कर येणे अपेक्षित होते. त्यानुसार करवसुली पथकांनी प्रयत्नांची शिकस्त करत मार्चअखेरपर्यंत १३ कोटी ६८ लाख ४२ हजार ४७८ रुपयांची वसुली केली. वसुलीसाठी काही मालमत्ता सील करण्याबरोबरच नळजोडण्याही तोडण्यात आल्या होत्या. अजूनही काही प्रमाणात वसुली होणे बाकी आहे. त्यामुळे थकबाकीदारांसह चालू वर्षाचा कर भरण्यासाठी नागरिक नगर पालिकेत येत आहेत; मात्र शासनाचा करवसुलीचा सर्व्हर बंद असल्याने कोणतीही प्रक्रिया होत नाही. कराची रक्कम स्वीकारली जात नाही. त्यामुळे नागरिकांना परत जावे लागत आहे. हा सर्व्हर बंद असल्याने लाखो रुपयांची होणारी वसुली थांबली आहे. याचा परिणाम पुढील वर्षीच्या थकित कराच्या रकमेत दिसून येतो.
..........
कोट
मी मागील पंधरा दिवसांत दोनवेळा पालिकेत गेलो. दोन्हीवेळा सर्व्हर बंद असल्याचे सांगण्यात आले. नागरिकांचा त्रास कमी होण्यासाठी शासनाचे सर्व्हर तातडीने सुरू करावा.
- गौस मुकादम, पेठमाप, चिपळूण

.........मुझफ्फर खान.......

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com