मुणगे देवी भगवतीचे मंदिरात आगमन

मुणगे देवी भगवतीचे मंदिरात आगमन

83154
मुणगे ः कारिवणेवाडी येथील पाडावे बंधूंच्या घरी विराजमान झालेली देवी भगवती. (छायाचित्र ः विष्णू मुणगेकर)

मुणगे देवी भगवतीचे
मंदिरामध्ये आगमन

माहेरपण सोहळा उत्साहात

सकाळ वृत्तसेवा
मुणगे, ता. ११ ः येथील ग्रामदेवता देवी भगवतीचे माहेरपण पाडावे बंधू यांच्या घरी मोठ्या उत्साहात व भक्तिपूर्ण वातावरणात पार पडले. देवीच्या या माहेरपणास समस्त पाडावे बंधू तसेच कारिवणेवाडी व गावातील ग्रामस्थ, मुंबईतील चाकरमानी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शनिवारी (ता. ११) सायंकाळी ६ वाजता देवी भगवतीचे मंदिरात आगमन झाले.
अक्षय्य तृतीया या दिवशी दर तीन वर्षांनी देवी भगवती गावातील कारिवणेवाडी येथील पाडावे बंधू यांच्या घरी म्हणजेच आपल्या माहेरघरी जाते. यावर्षी शुक्रवारी (ता. १०) सायंकाळी ५ वाजता देवी भगवती माहेरी जाण्यास मार्गस्थ झाली. मंदिराच्या मागील बाजूने महापुरुष घाटीने ढोलताशांच्या गजरात देवी जाताना सोबत समस्त पाडावे बंधू, ग्रामस्थ, मुंबईकर चाकरमानी अशी रयत होती. देवीवर असणारी निस्सिम श्रद्धा व आत्मविश्वास या जोरावर देवी सोबत जाणारा भाग्यवान असल्याचे वयोवृद्ध मंडळी सांगतात. मंदिराच्या मागून जाणारी महापुरुष घाटी सुमारे अडीचशे ते तीनशे मीटर लांब चढण आहे. या घाटीने जाताना तरुणांचीही दमछाक होते. अशी घाटी वयोवृद्ध मंडळी, महिला आणि लहान मुले घेऊन देवी सोबत ढोलताशांच्या निनादात चढून जातात. तेथून पुढे सड्यावरच्या कातळावरून सुमारे तीन-चार किलोमीटर अंतर चालत कारिवणेवाडीची घाटी उतरताना एकमेकांना सावरत पाडावे बंधू यांच्या घरी म्हणजेच देवीच्या माहेरघरी हजारो भाविकांचा जथ्था दाखल होतो. फटाक्यांची आतषबाजी करून आणि पाडावे परिवारातील सुहासिनींकडून औक्षण करून देवीचे जल्लोषात स्वागत केले. भाविकांना महाप्रसाद देण्यात आला.
---
‘पुण्याई जन्माची’ नाटक रंगले
रात्री प्रकाश लब्दे प्रस्तुत देवी भगवती पारंपरिक दशावतार नाट्य मंडळ (डोंबिवली प.) यांचे ‘पुण्याई जन्माची’ हे दशावतारी नाटक झाले. शनिवारी (ता. ११) सकाळी देवीचे दर्शन व ओटी भरणे आदी कार्यक्रमांसह अवसर काढण्यात आले. देवीच्या अवसरांजवळ विनंतीसाठी भाविकांनी गर्दी केली होती. त्यानंतर महाप्रसाद करून देवी मंदिराकडे जाण्यास मार्गस्थ झाली. देवीसोबत जशी रयत गेली, तशीच पुन्हा मंदिरापर्यंत उपस्थित होती. कार्यक्रमासाठी पाडावे बंधूंनी उत्कृष्ट नियोजन केले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com