औषधी कुडा वनस्पती होतेय जंगलातून गायब

औषधी कुडा वनस्पती होतेय जंगलातून गायब

83431

औषधी कुडा वनस्पती होतेय जंगलातून गायब

संवर्धनाची गरज ः रोजगार हरवल्यामुळे आदिवासीही संकटात


सकाळ वृत्तसेवा
महाड, ता. १३ : औषधी वनस्पती म्हणून परिचित असलेली, तसेच कोकणात सर्वत्र आढळणारी कुडा वनस्पती आता जंगलतोडीमुळे नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. डोंगरदऱ्यातील आदिवासी समाज कुड्याच्या फुलांची विक्री करून आपली उपजीविका करत असतो; परंतु आता ही वनस्पती जंगलातून हद्दपार होऊ लागल्याने त्यांच्यावरही उपासमारीची वेळ आली आहे.
महाड तालुका डोंगर आणि जंगलांनी व्यापलेला आहे. त्यामुळे जंगलात अनेक औषधी वनस्पती आढळतात. यापैकीच कुडा ही वनस्पती एकेकाळी सगळीकडे दिसून येत होती; मात्र बेसुमार जंगलतोडीत कुडा नष्ट होत चालली आहे. वाढणारे शहरीकरण, व्यावसायिक वापराकरिता होत असलेली जंगलतोड, शहरातील बड्या कंपन्यांकडून होणारे जमीन व्यवहार याचा फटका आता पर्यावरणाला बसत आहे. रायगड जिल्ह्यात विशेषतः महाड तालुक्यात भात पेरणीपूर्वी जमीन भाजणी केली जाते. याकरिता पालापाचोळा आणि झुडपे तोडून तरवा लावला जातो. या तरव्यामुळे परिसरातील झुडपे तोडली जात असल्याने कुडा नष्ट होत चालली आहेत.
--
औषधी गुणधर्म
कुड्यामध्ये औषधी गुणधर्म असल्याने अनेक औषधी कंपन्या कुड्याच्या बियांचा, सालीचा आणि फुलांचा वापर करतात. कुड्याचे पांढरा कुडा आणि तांबडा कुडा असे दोन प्रकार आहेत. कुड्याच्या सालीचा आणि बियांचा वापर भूकवर्धक, कुष्ठवर्धक आणि त्वचारोगात केला जातो. कुड्याच्या बीजाला आयुर्वेदात इंद्रजव म्हणून ओळखले जाते. दात दुखत असेल तरी कुड्याच्या सालीचा उपयोग केला जातो. अतिसार, आमांश आणि आतड्यातील कृमी यावर कुडा अत्यंत गुणकारी मानला जातो. यापैकी महाडसह संपूर्ण कोकणात पांढऱ्या फुलांचा कुडा आढळून येतो. या कुड्याला एप्रिल, मे या दरम्यान फुले येण्यास सुरुवात होते.
--
कोट
कुड्यामध्ये औषधी गुणधर्म असल्याने, तसेच जंगल संपत्तीत त्याचे स्थान टिकून रहावे यासाठी या वनस्पतींचे जतन व संवर्धन झाले पाहिजे.
- प्रकाश केळकर, वनस्पती अभ्यासक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com