आसोली नं. १ शाळेत 
उद्यापासून कार्यक्रम

आसोली नं. १ शाळेत उद्यापासून कार्यक्रम

आसोली नं. १ शाळेत
उद्यापासून कार्यक्रम
वेंगुर्ले ः जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा श्री नारायण विद्यामंदिर, आसोली नं. १ शाळेला १०० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल शताब्दी वर्षपूर्तीनिमित्त शतक महोत्सव साजरा १६ ते १८ मे या कालावधीत साजरा करण्यात येणार आहे. गुरुवारी (ता. १६) सकाळच्या सत्रात राज्याचे शालेय शिक्षण आणि मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांच्या अध्यक्षेखाली, प्रमुख पाहुणे सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, विशाल फाउंडेशनचे अध्यक्ष तथा उद्योजक विशाल परब, शाळेचे संस्थापक (कै.) दाजी नाडकर्णी यांचे नातू तथा निवृत्त बँक अधिकारी राजेश नाडकर्णी, आसोली सरपंच बाळा जाधव, उपसरपंच संकेत धुरी यांच्या प्रमुख उपस्थितीत शतक महोत्सवी कार्यक्रमाचा प्रारंभ होणार आहे. यानिमित्त गुरुवार (ता. १६) ते शनिवार (ता. १७) या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. शनिवारी (ता. १७) रात्री १० वाजता आसोली येथील नारायणी नाट्यमंडळाचा ‘पांडगो इलो रे बा इलो’ विनोदी नाट्यप्रयोग होणार आहे.
---------------
‘हळवल फाट्यावर
पथदीप आवश्‍यक’
कणकवली ः मुंबई-गोवा महामार्गावरील हळवल फाटा येथे पथदीप बसविण्याची ग्रामस्थांची मागणी आहे. हळवल फाटा येथील वळण अपघात प्रवण क्षेत्र आहे. फाट्यालगत असलेले वळण वाहतुकीच्यादृष्टीने धोकादायक आहे. रात्रीच्यावेळी याठिकाणी लाईट नसल्यामुळे वळणाचा अंदाज न आल्याने वारंवार अपघात झाले आहेत. त्यामुळे या ठिकाणी पथदीप बसविणे नितांत गरजेचे आहे. पथदीप बसविण्याच्या मागणीचे निवेदन प्रांताधिकाऱ्यांना ग्रामस्थांनी दिले होते. त्यानंतर तेथे पथदीप लावण्याबाबत प्रशासकीय पातळीवर कार्यवाही झाली होती; मात्र अद्यापही पथदीप लावण्यात न आल्याने ग्रामस्थांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
----------------
झाराप येथे रविवारी
स्पर्धा परीक्षांचे धडे
कणकवली ः झाराप ग्रामस्थ मित्रमंडळाच्या पुढाकाराने रविवारी (ता. १९) सकाळी १०.३० वाजता जिल्हा परिषद झाराप शाळा नं. १ येथे ‘तिमिरातून तेजाकडे’ या शैक्षणिक चळवळीचे प्रणेते व सीमा शुल्क विभागातील अधिकारी सत्यवान रेडकर यांचे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित केले आहे. सिंधुदुर्गातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन झाराप ग्रामस्थ मित्रमंडळाने केले आहे.
---------------
सावंतवाडी येथे
१२ला स्नेहसंमेलन
सावंतवाडी ः येथील राणी पार्वतीदेवी हायस्कूलच्या दहावीच्या १९९६-९७ बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी आपल्या बॅचच्या काही गरजवंत सहकार्‍यांना आर्थिक मदत केली. या माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन सावंतवाडी येथील हॉटेल शिल्पग्राम येथे रविवारी (ता. १२) झाले. यावेळी मोठ्या संख्येने दहावीचे माजी विद्यार्थी उपस्थित होते. वर्षातून एकदा जमा होणाऱ्या या मित्रमंडळींच्या सहकार्यातून विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात, अशी माहिती या बॅचचे माजी विद्यार्थी पुंडलिक दळवी यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com