आरे परिसरात गव्यांचा वावर

आरे परिसरात गव्यांचा वावर

आरे परिसरात
गव्यांचा वावर
देवगडः शिरगाव पाठोपाठ आरे गावामध्येही गवारेड्यांचा वावर दिसून आला. यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आरे-बोडदेवाडी येथे बोडदेव मंदिर परिसरात रविवारी (ता. १२) सायंकाळी ६ वाजता गवारेडा पाहायला मिळाला. सध्या आंबा व काजू पिकाचा हंगाम असल्याने गावातील लोक काजू-आंबा बागेत वावरत असतात. येथील बागा बहुतांशी जंगलमय भागात आहेत. गावात गवारेडा आल्याने नागरिक व शेतकर्‍यांमध्ये भीती पसरली आहे. घराबाहेर पडावे तरी कसे, असा प्रश्न ग्रामस्थांमध्ये निर्माण झाला आहे. वन विभागाने याबाबत खबरदारी म्हणून गव्यांचा बंदोबस्त करावा तसेच शेतकर्‍यांचे समुपदेशन करावे, गावात जनजागृती मोहीम राबवावी, अशी मागणी पंचायत समिती माजी सदस्य अजित कांबळे यांनी केली आहे.
--------------
कणकवली शहराचा
पाण्याचा प्रश्न मार्गी
कणकवलीः शिवडाव धरणाचे सोडण्यात आलेले पाणी सोमवारी (ता. १३) कणकवली नगरपंचायत नळ योजनेच्या जॅकवेल जवळ गड नदीपात्रातील कोंडीमध्ये पोहोचले. यामुळे शहराला पाणीटंचाईचा सामना करावा लागणार नाही. कणकवली नगरपंचायत नळ योजनेच्या जॅकवेल जवळील कोंडीमधील पाणीसाठा कमी झाल्याने शहराला पाणीटंचाईचा सामना करावा लागता नये, यासाठी शिवडाव धरणाचे पाणी सोडण्याची मागणी नगरपंचायतीने केली होती. त्यानुसार १ मे रोजी शिवडाव धरणाचे पाणी सोडण्यात आले होते; मात्र ते पाणी पोहोचण्यासाठी आठ दिवस लागणार असल्याने जॅकवेल जवळील कोंडीतील गाळ उपसा करण्यात आला होता. तसेच जॅकवेल जवळील कोंडीतील पाणीसाठा कमी होत असल्याने नदीपात्रातील ज्या ठिकाणी पाणी साठलेले होते, तेथून पाणी जॅकवेल जवळील कोंडीमध्ये सोडण्यात येत होते; मात्र आता शिवडाव धरणाचे पाणी कोंडीमध्ये पोहोचल्याने शहरवासीयांना पाणीटंचाईपासून काहीसा दिलासा मिळाला आहे.
---------------
विजय नेमळेकरांचा
नेमळे येथे सत्कार
सावंतवाडीः नेमळेचे सुपुत्र तथा भारतीय बौद्ध महासभेच्या सावंतवाडी तालुक्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष विजय नेमळेकर यांनी आपल्या शिक्षकी पेशातून स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली. याबद्दल त्यांचा बौद्ध महासभेच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भूमिअभिलेखचे सेवानिवृत्त उपाधीक्षक तथा भारतीय बौद्ध महासभेचे माजी जिल्हाध्यक्ष सत्यवान जाधव होते. सत्कारमूर्ती श्री. व सौ. नेमळेकर, पत्रकार मोहन जाधव उपस्थित होते. मोहन जाधव यांनी उपस्थितांचे स्वागत करून प्रास्ताविक केले. मान्यवरांच्या हस्ते नेमळेकर उभयतांचा सत्कार करण्यात आला. सत्यवान जाधव, मोहन जाधव, चंद्रशेखर जाधव, दिलीप जाधव, संघमित्रा जाधव, प्रियदर्शनी जाधव, ममता जाधव, सुनील जाधव आदींनी त्यांना शुभेच्छा दिल्या. शेवटी त्यांनी सत्काराला उत्तर देऊन कृतज्ञता व्यक्त केली. सूत्रसंचालन ममता जाधव यांनी केले. आभार मिलिंद नेमळेकर यांनी मानले.
..................

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com