देवगडात कचराप्रश्नी पुन्हा वावटळ

देवगडात कचराप्रश्नी पुन्हा वावटळ

83556
देवगड ः येथील शहर विकास ग्रामस्थ मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी कचरा टाकलेल्या जागेची पाहणी केली. (छायाचित्र ः संतोष कुळकर्णी)

देवगडमध्ये कचराप्रश्‍नी पुन्हा वावटळ

साठवणुकीमुळे शहरात दुर्गंधी ः आवाज उठवूनही प्रश्‍न सुटेना

सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. १३ ः येथील देवगड-जामसंडे शहराच्या कचरा प्रश्‍नावरून पुन्हा एकदा वावटळ उठली आहे. नगरपंचायत कार्यालयाच्या बाजूलाच तात्पुरत्या स्वरुपात शहरात कचरा साठवणूक होत असल्याने परिसरात पसरलेल्या दुर्गंधीमुळे नागरिक हैराण झाले आहेत. या पार्श्‍वभूमीवर शहर विकास ग्रामस्थ मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी कचरा टाकलेल्या जागेची पाहणी करून नगराध्यक्षा साक्षी प्रभू यांच्याशी चर्चा केली. तातडीने कचरा उचलून परिसर स्वच्छ करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. दरम्यान, काही विरोधी भाजप नगरसेवकांसह भाजप पदाधिकाऱ्यांनी कचराप्रश्‍नी नगराध्यक्षांची भेट घेऊन आपल्या भावना व्यक्त केल्या.
देवगड-जामसंडे नगरपंचायतीची स्थापना मार्च २०१६ मध्ये झाली; मात्र आजवर शहराचा कचराप्रश्‍न कायमस्वरूपी काही सुटलेला दिसत नाही. याबाबत अनेकदा आंदोलने झाली, आश्‍वासने दिली गेली; मात्र कचऱ्याचा प्रश्‍न ‘जैसे थे’ राहिला आहे. आता तर नगरपंचायत कार्यालयाशेजारीच तात्पुरत्या स्वरुपात कचरा साठवून ठेवला जात आहे. त्यामुळे वाऱ्यामुळे कचरा परिसरात पसरला आहे. मोकाट गुरे आणि भटकी कुत्री यांचा वावर असल्याने परिसरात अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधीही पसरली आहे. याच कचरा प्रश्‍नावरून शहरात पुन्हा वावटळ उठली आहे. हा प्रश्‍न मार्गी लागावा, अशी मागणी होत आहे. या पार्श्‍वभूमीवर येथील शहर विकास ग्रामस्थ मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी नगराध्यक्षा प्रभू यांची भेट घेऊन झालेल्या दुरवस्थेबाबत चर्चा केली. येत्या तीन दिवसांत कचरा उचलून जागा स्वच्छ करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. नगरपंचायत कार्यालयाशेजारी उघड्यावर कचरा असल्याने आरोग्याच्या दृष्टीनेही ही बाब धोकादायक असल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. नगरपंचायत कार्यालयातील भेटीदरम्यान सक्षम अधिकारी उपस्थित नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली. याबाबत वरिष्ठ प्रशासनाशी संपर्क साधून या प्रश्‍नाकडे लक्ष वेधले गेले. दरम्यान, भाजपच्या विरोधी नगरसेवकांनीही नगराध्यक्षा प्रभू यांची भेट घेऊन याकडे लक्ष वेधले. त्यांच्यासोबत भाजप पदाधिकारीही होते. आपल्या भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या. दरम्यान, याबाबत नगराध्यक्षा प्रभू यांना विचारले असता, नगरपंचायत कार्यालयाशेजारी तात्पुरत्या स्वरुपात कचरा ठेवण्यात आला आहे. येत्या दोन-तीन दिवसांत पर्यायी जागा पाहून कचरा उचलला जाईल, असे त्यांनी सांगितले.
--
पर्यायी जागेसाठी प्रशासनाचे प्रयत्न
देवगड-जामसंडे नगरपंचायत सुरुवातीला पर्यायी मोकळ्या ठिकाणी तसेच नंतर भाडेतत्वावर घेतलेल्या जागेत घनकचरा व्यवस्थापन करीत होते; मात्र सध्या नगरपंचायतीसाठी जागा उपलब्ध नसल्याने तात्पुरत्या स्वरुपात कार्यालयाजवळच कचरा साठवून ठेवला आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून, परिसरातील नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. घनकचरा व्यवस्थापनासाठी जागा उपलब्ध करण्याकरिता प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात आले.
.............
कोट
83615
शहराची स्वच्छता आणि घनकचरा व्यवस्थापन यामध्ये सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे. यामध्ये राजकीय विरोध करून प्रश्न सुटणार नाही. शहराचा कचराप्रश्न मार्गी लावण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. लवकरच पर्यायी जागेची उपलब्धता करून नगरपंचायत कार्यालयाजवळ असलेला कचरा उचलून परिसरात स्वच्छता करण्यात येईल. त्याप्रमाणे कार्यवाही सुरू करण्यात येत आहे.
- साक्षी प्रभू, नगराध्यक्षा
..............
कोट
83616
नगरपंचायत कार्यालयाशेजारी साठविलेला घनकचरा तातडीने उचलावा, ही आमची मागणी आहे. शहराच्या विकासासंदर्भात काही धोरणात्मक निर्णय घेण्याची वेळ असेल, त्यावेळी विरोधी नगरसेवकांना विश्‍वासात घेतले पाहिजे. पाणीप्रश्‍न, घनकचरा व्यवस्थापन आदी विषयासंदर्भात विरोधी नगरसेवकांना सामावून घेतल्यास प्रश्‍न राहणार नाहीत. घनकचऱ्याबाबत जाग आणण्यासाठी नगराध्यक्षांची भेट घेतली होती.
- शरद ठुकरुल, गटनेते तथा भाजप नगरसेवक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com