पेठमाप-मुरादपूर पुलावरून वाहतूक पुढील वर्षीच

पेठमाप-मुरादपूर पुलावरून वाहतूक पुढील वर्षीच

ratchl१४४.jpg-
83653
चिपळूणः पेठमाप - मुरादपूर दरम्यान सुरू असलेल्या पुलाचे काम.
-------------------
पेठमाप-मुरादपूर पुलाचे काम संथगतीने
गर्डरसह जोडरस्त्याचे काम अर्धवट; आठ कोटी खर्च
चिपळूण, ता. १४ : शहरातील वाहतूक व्यवस्था सुलभ होण्यासाठी आमदार शेखर निकम यांच्या प्रयत्नातून वाशिष्ठी नदीवर पेठमाप ते मुरादपूर दरम्यान पुलाची उभारणी केली जात आहे. या पुलाचे काम संथगतीने सुरू आहे. मे अखेर हा पूल वाहतुकीस खुला होईल, अशी अपेक्षा होती. मात्र आता जानेवारी २०२५ मध्येच या पुलावरून वाहतूक सुरू होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
शहर बाजारपेठेतील वाहतूक कोंडी रोखण्यासाठी पेठमाप-मुरादपूर हा वाशिष्ठी नदीवरील पूल प्रस्तावित करण्यात आला. आठ कोटी रूपये खर्चून हा पूल उभारण्यात येत आहे. या पुलासाठी आमदार शेखर निकम यांनी निधी मंजूर केला. पुलाचे सर्व पिलर तयार झाले असून अर्ध्या भागावर गर्डर चढविले आहेत. शिवाय चढविलेल्या गर्डरवर स्लॅब टाकण्याचे कामही लवकरच सुरू होणार आहे. संबंधित बांधकाम कंपनीने या ठिकाणी साठ गर्डर तयार केले आहेत. त्यातील चाळीस गर्डर पुलावर चढवून झाले आहेत, तर उर्वरित वीस गर्डर पावसाळ्याच्या आधी चढविले जाणार आहेत.
या ठिकाणी स्लॅबसाठी आवश्यक ती तयारी पूर्ण करण्यात येत आहे. अजूनही वीस गर्डर तयार करावे लागणार आहेत. मात्र हे काम पावसाळ्याआधी करणे शक्य नसल्याने पावसाळ्यानंतरच उर्वरित वीस गर्डर तयार करून पिलरवर चढविले जाणार आहेत. त्यानंतर म्हणजे डिसेंबर किंवा जानेवारीमध्ये हा पूल वाहतुकीसाठी सुरू होण्याची अपेक्षा आहे. मुरादपूर भागाकडील जोडरस्त्यासाठी अखेरची भिंत बांधून झाली आहे. मात्र जोडरस्त्याचे काम झालेले नाही. त्याच पद्धतीने पेठमापकडील भागाची परिस्थिती आहे. त्या ठिकाणी जोडरस्त्यासाठी आवश्यक भिंत अद्याप बांधलेली नाही. जोडरस्त्यासाठी पुन्हा नव्याने आवश्यक तो निधी मंजूर झालेला आहे. मात्र त्याची निविदा प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. त्यामुळे यावर्षीतरी मुरादपूर जोडरस्ता पावसाळ्याआधी होणार नाही हे निश्चित झाले आहे. पावसाळा संपल्यानंतर उर्वरित गर्डर तयार करून पुलावर चढविले जातील व त्यानंतर स्लॅब टाकला जाईल. तरीही जोडरस्त्याचे काम शिल्लक राहाणार आहे. त्यामुळे मुरादपूर-पेठमाप पूल सुरू होण्यास पुढचे वर्ष उजाडणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com