उड्डाणपूल कामावरून अधिकारी धारेवर

उड्डाणपूल कामावरून अधिकारी धारेवर

83727
बांदा ः अधिकाऱ्यांना जाब विचारताना ग्रामस्थ. (छायाचित्र ः नीलेश मोरजकर)

उड्डाणपूल कामावरून अधिकारी धारेवर

बांदावासीय आक्रमक ः सेवारस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी

सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. १४ ः मुंबई-गोवा महामार्गावरील बांदा येथे सुरू असलेला उड्डाणपूल सेवारस्त्यावरून ग्रामस्थ आज पुन्हा आक्रमक झाले. चर्चेसाठी आलेले राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या उपअभियंता मुकेश साळुंखे समर्पक उत्तरे देऊ न शकल्याने ग्रामस्थांनी त्यांना धारेवर धरले. पोलिस उपनिरीक्षक शिवराज झांजुरणे यांनी हस्तक्षेप करत ग्रामस्थांना शांत केले; मात्र जोपर्यंत गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या सेवारस्त्याचा प्रश्न मार्गी लागत नाही, तोपर्यंत बसस्थानकासमोर उड्डाणपुलाचे काम बंद ठेवा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली.
बांदा ग्रामस्थांनी शुक्रवारी (ता. १०) गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या सेवारस्त्याच्या रुंदीवरून महामार्ग विभाग प्रतिनिधींना जाब विचारला होता. त्यावेळी वरिष्ठांना बोलावून तोडगा काढू, असे त्यांनी आश्वासन दिले होते. त्यानुसार आज राष्ट्रीय महामार्ग विभागाचे उपअभियंता साळुंखे, अभियंता रुपेश कांबळी, निवासी अभियंता अनिल सराफ, दिलीप पाटण हे दुपारी ३ वाजता ग्रामस्थांशी चर्चा करण्यासाठी आले. यावेळी बांदा शहरातील व शेजारील गावातील सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यात बांदा उपसरपंच बाळू सावंत, वाफोली सरपंच उमेश शिरोडकर, उपसरपंच विनेश गवस, विलवडे सरपंच प्रकाश दळवी, बांदा ग्रामपंचायत सदस्य सुशांत पांगम, गजा गायतोंडे, अजय महाजन, गुरू कल्याणकर, हेमंत दाभोलकर, निखिल मयेकर, अर्णव स्वार, सुनील नाटेकर, धनेश नाटेकर, अक्षय बांदेकर, संतोष खानोलकर, भालचंद्र बांदेकर, दया साळगावकर, भाऊ वाळके, प्रथमेश गोवेकर, दीनानाथ देसाई, अॅलन आलमेडा, प्रियश नाटेकर, शुभम पांगम, सदाशिव नाटेकर, सिद्धेश मोर्ये आदी उपस्थित होते.
साई काणेकर यांनी साळुंखे यांना, सेवारस्ता अरुंद का ठेवला? येथून वाहतूक होत असताना वाहतूक कोंडी झाली, अपघात होऊन कोणी मृत्युमुखी पडल्यास त्याची जबाबदारी तुम्ही घेणार का? आदी प्रश्नांचा भडिमार केला. यावर साळुंखे यांनी, याठिकाणी वळण आल्याने सेवारस्ता अरुंद झाला, असे सांगितले. जर या ठिकाणी तुम्ही साडेपाच मीटर रस्ता ठेवला असेल, तर दोन्ही बाजूंनी साडेपाच मीटर सेवारस्ता ठेवा आणि ज्यांचे बांधकाम तोडले, त्यांना नुकसानभरपाई द्या, असे काणेकर यांनी सुनावले. आमच्या गावाचे नुकसान होत असेल, तर आम्ही गप्प बसणार नाही. प्रसंगी रस्त्यावर ठाण मांडू, असा इशाराही काणेकर यांनी दिला. सुशांत पांगम यांनी, हद्द दाखविण्यास सांगितले असता दोन्ही गटारांतील अंतर ४० मीटर असल्याचे निष्पन्न झाले. यावरून तुम्ही नेमके कोणाच्या सांगण्यावरून काम करता, असा प्रश्‍न ग्रामस्थांनी केला. बांदा उपसरपंच बाळू सावंत यांनी महामार्ग विभाग मनमानी कारभार असल्याचा आरोप केला. गुरू कल्याणकर यांनी काम निकृष्ट दर्जाचे असल्याचे सांगून त्याठिकाणी दिशादर्शक फलक लावा, अशी मागणी केली. यादरम्यान मोठी वाहतूक कोंडी झाली. पोलिसांनी उपस्थित राहून ग्रामस्थांनी महामार्गावर लावलेले बॅरिकेड तत्काळ हलवून वाहतूक सुरळीत केली. यावेळी ग्रामस्थ व पोलिसांत बाचाबाची झाली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com