वेंगुर्लेत मॉन्सूनपूर्व कामांना वेग

वेंगुर्लेत मॉन्सूनपूर्व कामांना वेग

83897
वेंगुर्ले ः पालिकेमार्फत शहरातील गटारे व व्‍हाळी साफसफाईची कामे जलदगतीने करण्यात येत आहेत.

वेंगुर्लेत मॉन्सूनपूर्व कामांना वेग

पालिकेकडून खबरदारी ः गटारांसह व्‍हाळींची साफसफाई

सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. १५ ः शहरवासीयांचे आरोग्‍याचे हित लक्षात घेऊन पालिकेमार्फत शहरातील गटारे व व्‍हाळी साफसफाईची कामे जलदगतीने पूर्ण करण्‍यात येत आहेत. शहरातील मुख्‍य व अंतर्गत रस्‍त्‍यांच्‍या दुतर्फा असलेली गटारे, शहरातील विठ्ठलवाडी, दाभोसवाडा, राजवाडा, गावडेवाडी, कलानगर, नातू व्‍हाळी, पोकळे गल्‍ली, गाडीअड्डा, होळकर गल्‍ली व आनंदवाडी याठिकाणी असणारी मोठी गटारे, व्‍हाळी पाऊस सुरु होण्‍यापूर्वी पूर्णपणे साफ करुन घेण्‍याच्‍या उद्देशाने पालिकेमार्फत आवश्‍यक ती कार्यवाही करण्‍यात येत आहे.
पावसाळ्यापूर्वी शहरातील सर्व व्‍हाळी व गटारांमध्‍ये गाळ, प्लास्टिक व कचरा साचल्‍याने अल्‍प प्रमाणात पाऊस झाला तरी व्‍हाळी व गटारांचे पाणी रस्‍त्‍यांवर येते. त्‍यामुळे स्‍थानिक रहिवाशांना त्‍याचा नाहक त्रास सहन करावा लागतो. स्वच्छतेअभावी व्‍हाळी व गटारांमध्‍ये घाणीचे थर साचून राहतात. त्‍यामुळे परिसरामध्‍ये दुर्गंधी पसरुन नागरीकांच्‍या आरोग्‍याचा प्रश्‍न उद्भवतो. त्‍याचप्रमाणे डासांच्‍या प्रादुर्भावाने अनेक साथीचे आजार पसरण्‍याचा धोका असतो. त्‍यामुळे शहरातील मुख्‍य व अंतर्गत रस्‍त्‍यांच्‍या दुतर्फा असलेली गटारे, शहरातील सर्व गटारे व व्हाळी पालिकेमार्फत युद्धपातळीवर साफ करण्यात येत आहेत.
बंदर रोड, दाभोसवाडा, गावडेवाडी, गिरपवाडा, जुना स्‍टॅंड, जुनी पोलिस लाईन, भुजनाकवाडी, कलानगर, दाभोली नाका ते बस स्‍टॅंड या भागातील गटारे व व्‍हाळी साफसफाईचे काम पूर्ण झालेले आहे. तसेच उर्वरीत शहरातील गटारे व व्‍हाळींची साफसफाई पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्‍यात येणार आहे. शहरातील गटारे, व्हाळी साफसफाई पूर्ण झाल्यानंतर शहरामध्ये डास फवारणी करण्यात येणार आहे. तसेच पावसाळ्यात उद्भवणाऱ्या आपत्ती निवारणासाठी पालिकेमध्ये आपत्‍ती व्‍यवस्‍थापन कक्ष स्‍थापन करण्‍यात येणार आहे. शहरातील रहदारीच्‍या ठिकाणी व रस्‍त्‍यांलगत सार्वजनिक मालकीच्‍या जागेमध्‍ये किंवा वैयक्तिक मालकीच्‍या जागेमध्‍ये जी धोकादायक झाडे असतील, ती झाडे महाराष्‍ट्र (नागरी क्षेत्रे) झाडांचे संरक्षण व जतन (सुधारणा) अधिनियम २०२१ अन्‍वये या कार्यालयाची रितसर परवानगी घेऊन संबंधितांनी तोडून घ्‍यावीत अन्‍यथा अशा धोकादायक झाडांमुळे किंवा झाडांच्‍या फांद्यांमुळे कोणत्‍याही प्रकारची जिवित व वित्‍तहानी झाल्‍यास संबंधित जागा मालक, झाड मालक जबाबदार राहतील. यामुळे होणाऱ्या दुर्घटनेस पालिका जबाबदार राहणार नाही याची गंभीरपणे नोंद घ्‍यावी, अशा सुचना मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांनी दिल्या आहेत.
--------------
चौकट
धोकादायक इमारतींबाबत नोटीसा
शहरातील ज्‍या इमारती धोकादायक आहेत, त्‍या मिळकतधारकांना नोटीसा बजाविल्‍या आहेत. नोटीसीनुसार कार्यवाही करुन तशी माहिती पालिकेस द्यावी. रस्‍त्‍याने ये-जा करणाऱ्या नागरिकांच्या जिवितास कोणताही धोका पोहोचणार नाही याची दक्षता घ्‍यावी व पालिकेस सहकार्य करावे. याकामी संबंधितांनी वेळीच दक्षता न घेतल्‍यास कोणतीही जिवितहानी झाल्‍यास त्‍यास पालिका जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्‍यावी, असे आवाहन मुख्याधिकारी कंकाळ यांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com