मिठगवाणेतील जबरी चोरी साडेचार कोटींची

मिठगवाणेतील जबरी चोरी साडेचार कोटींची

मिठगवाणेतील चोरी साडेचार कोटींची
समांतर पथकांद्वारे तपास ः सोने असलेली तिजोरीच फोडली
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १५ : राजापूर तालुक्यातील मिठगवाणे येथील श्रमिक पतसंस्थेची शाखा फोडून ५२९ खातेदारांचे आजच्या बाजारभावाने सुमारे साडेचार कोटींच्या ६२ तोळे दागिन्यांवर डल्ला मारला आहे. केवळ सोने असलेली तिजोरी फोडून सोने लांबविले. केवळ सोने असलेली तिजोरी चोरट्यांना कशी समजू शकते, असा प्रश्न निर्माण झाला आहे. सोन्याच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक दक्षता पतसंस्थेने घेतलेली नसल्याची माहिती असलेल्यांनी ही चोरी केल्याचा पोलिसांचा संशय आहे.
जबरी चोरीच्या तपासासाठी जिल्हा पोलिसांनी समांतर पथके स्थापन केली आहेत. नाटे पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेचे स्वतंत्र पथक चोरट्यांचा शोध घेत आहे. राजापूर तालुक्यातील अतिशय दुर्गम व किनारपट्टीवर असलेल्या गावात दरोडेखोर आले कोठून, याचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे. मात्र, स्थानिकाच्या मदतीशिवाय पतसंस्थेवर दरोडा टाकणे शक्य नसल्याचा पोलिसांचा संशय आहे. त्यादृष्टीने पोलिसांनी तपासाला दिशा दिली आहे. साखर येथील श्रमिक पतसंस्थेची शाखा मिठगवाणे ग्रामपंचायतीच्या कार्यालयातील एका छोट्याशा जागेत आहे. तेथील उलाढाल मोठी आहे. शाखा दिसायला लहान असली, तरीही स्थानिक महिला छोटे व्यवसाय व घरगुती कामासाठी पतसंस्थेत दागिने तारण ठेवून पैसे काढतात. त्याच्या परतफेडीचा कालावधीही वेळेत असल्यामुळे श्रमिक पतसंस्थेची मिठगवाणे शाखा उत्तमरीत्या सुरू आहे. शाखेत मोठ्या प्रमाणात सोने तारण कर्जाची उचल होते. याची माहिती असलेल्या व्यक्तीने किंवा त्याच्या माहितीवरून अन्य चोरट्यांनी हा दरोडा टाकल्याची शक्यता आहे. मात्र, या जबरी चोरीचे मूळ स्थानिकांशी जोडलेले असल्याची शक्यता अधिक असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

चौकट
सुरक्षेबाबत आवश्यक दक्षता नाही
सोमवारी मध्यरात्री शाखेचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. श्वान पथकानेही घटनास्थळाची तपासणी केली. पोलिसांच्या स्वतंत्र पथकासह तांत्रिक टीम घटनास्थळी दाखल झाली असून, ती परिसरात चोरट्यांचा माग काढत आहे.

कोट
चोरट्यांचे ‘स्थानिक कनेक्शन’ तपासण्यासाठी गाव व परिसरात गावाबाहेरून आलेल्या व्यक्तींचा पोलिसांनी शोध सुरू केला आहे. त्यामुळे दरोडेखोरांना लवकरच जेरबंद करू.
- धनंजय कुलकर्णी, जिल्हा पोलिस अधीक्षक रत्नागिरी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com