दहा दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा

दहा दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा

swt1615.jpg
84108
दहिबांवः येथील अन्नपूर्णा नदीत नळयोजना उद्भवाच्या ठिकाणी असलेला पाणीसाठा. (छायाचित्रः संतोष कुळकर्णी)

दहा दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा
देवगडवर संकटः गाळ उपसा, पाईप लाईन न बदलल्यास भविष्यात चिंता
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. १६ः येथील प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजनेच्या तालुक्यातील दहिबांव येथील अन्नपूर्णा नदीतील उद्भवाच्या ठिकाणी देवगड जामसंडे शहराला पुढील सुमारे दहा ते बारा दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. भविष्यात नदीपात्रातील संपूर्ण गाळ उपसा करणे तसेच पंप बदलणे आणि टाकीपर्यंत येणारी पाईप लाईन बदलल्याशिवाय शहराला पाणी पुरवठा होणे अवघड असल्याची चिंताजनक बाब येथील नगरपंचायत प्रशासनाकडून स्पष्ट केली आहे. शहरातील पाणी वितरणाची पाईप लाईन गटारातून गेली असल्याची स्पष्टोक्तीही त्यांनी यावेळी दिली.
देवगड जामसंडे शहराला सध्या भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. शहराला सुमारे सात दिवसांनी तेही तासभरच सध्या पाणी पुरवठा केला जात आहे. योजनेच्या अन्नपूर्णा नदीतील उद्भवाच्या ठिकाणचा पाणीसाठा वाढत्या उष्णतेमुळे कमी होत चालला आहे. शहरातील किल्ला भागातील नागरिकांना गढूळ पाणी येत असल्याच्या कारणावरून आज भाजप नगरसेवकांनी येथील देवगड जामसंडे नगरपंचायतीचे मुख्याधिकारी सूरज कांबळे यांची भेट घेऊन चर्चा केली.
यावेळी काही ग्रामस्थही उपस्थित होते. नागरिकांनी येताना बाटलीतून पाणी नमुनाही दाखवण्यासाठी आणला होता. या समस्येकडे भाजप नगरसेवकांनी लक्ष वेधले असता बाजारपेठमार्गे खाली किल्ला भागात जाणारी पाईप लाईन पूर्णपणे गटारातून गेली आहे. जामसंडे भागातही काही ठिकाणी गटारातून लाईन गेली आहे. त्यामुळे पाईपलाईनला कुठे गळती असल्यास दुषित पाणी आत जात असावे, असे नगरपंचायत प्रशासनाकडून सांगण्यात आले. यावर तोडगा म्हणून नागरिकांना पाणी सोडल्यावर सुरूवातीला येणारे पाणी वापरले जावू नये, असे आवाहन मुख्याधिकाऱ्यांनी करून तसे संबधित ग्राहकांना कळवण्याचे प्रशासनाला सुचित केले. शहरातील पाणी प्रश्‍नाकडे नगरसेवकांनी लक्ष वेधताच दहिबांव येथील पाणीसाठा कमी झाला आहे. शिरगांव येथील पाणी पुरवठा होण्यात काही अडचणी असल्याचे सांगण्यात आले. दहिबांव येथील नदीपात्रात नळयोजना उद्भवाच्या ठिकाणी सद्यस्थितीत पुढील सुमारे दहा ते बारा दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. नदीपात्रातील पाणी साठवण क्षमता कमी झाली आहे. त्यामुळे भविष्यात नदीपात्रातील गाळ काढणे आवश्यक आहे. तसेच टाकीपर्यंत येणाऱ्या पाईपलाईनला वारंवार गळती लागत असल्याने तीही पूर्णपणे बदलणे आवश्यक आहेत. पंपही जुने असल्याने नवीन पंप खरेदी करण्याची आवश्यकता भासत आहे. याकडे वेळीच लक्ष न दिल्यास भविष्यात शहराचा पाणी पुरवठा पूर्णपणे ठप्प होऊ शकतो, अशी भिती प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आली. यावेळी भाजप नगरसेवक गटनेते शरद ठुकरूल, नगरसेविका प्रणाली माने, तन्वी चांदोस्कर उपस्थित होत्या.

चौकट
पाणी साठवण क्षमता कमी असल्याने चिंता
चर्चेदरम्यान देवगड जामसंडे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या देवगड प्रादेशीक नळपाणी पुरवठा योजनेचे भीषण वास्तव समोर आले. यातून धोक्याची घंटाच जणू प्रशासनाने वाजवली. जामसंडे शहरासाठी वेळवाडी टापू येथे नव्याने पाणी साठवण टाकी बांधण्यात आली आहे. मात्र, ती कार्यान्वित न झाल्याने सद्यस्थितीत पाणी साठवण क्षमता कमी असल्याची बाब प्रशासनाकडून यावेळी स्पष्ट करण्यात आली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com