

85041
सिंधुदुर्गात आज यलो अलर्ट
मॉन्सूनपुर्व पाऊस : पाच ते सहा दिवस प्रभाव कायम
सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. २१ : जिल्ह्यात मॉन्सूनपूर्व पावसाचा धडाका सुरूच असून, आज वैभववाडीसह जिल्ह्याच्या अनेक भागांत पाऊस झाला. पुढील पाच-सहा दिवस पाऊस कायम राहणार असून, हवामान विभागाने उद्या (ता. २२) यलो अलर्टचा अंदाज दिला आहे.
जिल्ह्यात यावर्षी ११ मेपासून मॉन्सूनपूर्व पावसाला सुरुवात झाली. गेले दहा दिवस जिल्ह्याच्या कोणत्या ना कोणत्या भागात मॉन्सूनपूर्व पाऊस पडत आहे. गेले दोन दिवस जिल्ह्यात सर्वदूर पाऊस झाला. किनारपट्टी भागातही दोन दिवस पाऊस झाला. आज सकाळपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. दुपारी दोन वाजल्यांपासून विजांच्या कडकाडाटासह तालुक्यात पावसाला सुरुवात झाली. तालुक्याच्या सर्व भागांत पावसाच्या जोरदार सरी झाल्या. सायंकाळी उशिरापर्यंत पावसाची रिपरिप सुरू होती. कणकवली तालुक्यातील फोंडा, हरकूळ परिसरात पावसाच्या सरी कोसळल्या. या तालुक्यात सायंकाळी पावसाचे वातावरण निर्माण झाले होते. कोणत्याही क्षणी पाऊस पडेल, अशी स्थिती होती. याशिवाय इतर भागांत देखील पावसाचे वातावरण होते. गेले दहा दिवस जिल्ह्यात पाऊस सुरू असून, हवामान विभागाने २६ मेपर्यंत मॉन्सूनपूर्व पावसाचा अंदाज दिला आहे. त्यामुळे सध्या पडत असलेला पाऊस कायम राहण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने उद्या सिंधुदुर्गात यलो अलर्ट जाहीर केला आहे. या कालावधीत जिल्ह्यात प्रतितास ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहणार आहेत. याशिवाय ढगांच्या गडगडाटासह पाऊसही होणार आहे. सतत पडत असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगाम पूर्वतयारीच्या कामांना सुरुवात केली आहे.
.............
चौकट
हवामान विभागाचा अंदाज ठरतोय खरा
जिल्ह्यात सध्या पडत असलेल्या पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून तंतोतंत सांगितला जात आहे. जिल्ह्याच्या कोणत्या भागात विजांचा लखलखाट होणार आहे, अधिक पाऊस कोणत्या भागात पडणार आहे, याची माहिती हवामान विभागाकडून दिली जात आहे. विजांचा लखलखाट किंवा पाऊस याचा अंदाज हवामान विभागाकडून तासभर अगोदरच शेतकऱ्यांना मिळत असल्यामुळे फळपिकांची काढणी किंवा अन्य कामे करताना त्याचा मोठा फायदा होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.