शिरोड्यात आज धार्मिक कार्यक्रम

शिरोड्यात आज धार्मिक कार्यक्रम

शिरोड्यात आज
धार्मिक कार्यक्रम
वेंगुर्लेः श्री महाविष्णू भक्तिसेवा मंदिर संस्थेच्यावतीने शिरोडा-गावडेवाडी शाळेनजीकच्या श्री नागदेवता मंदिराचा १९ वा वर्धापन दिन उद्या (ता. २४) विविध कार्यक्रमांनी साजरा होणार आहे. त्यानिमित्त सकाळी श्री गणेश पूजन व नागदेवता पूजा, अभिषेक, दुपारी १ ते ३ यावेळेत महाप्रसाद, सायंकाळी श्री महाविष्णू महालक्ष्मी, श्री दत्त यांचा महाजप, श्रीराम दीक्षित यांचे कीर्तन, सद्‌गुरू गावडे गुरुजी यांचे मार्गदर्शन, शनिवारी (ता. २५) अभिषेक व महाप्रसाद होणार आहे.
............
दशावतार कलाकारांचा
पेंडूरला उद्या सन्मान
मसुरेः सिंधुदुर्ग देवळी समाज उन्नती मंडळांतर्गत देवळी समाज उन्नती मंडळ, पेंडूर-देऊळवाडी (मालवण) यांच्यावतीने शनिवारी (ता. २५) सायंकाळी ७ वाजता देवळी समाज दशावतार कलाकार सत्कार सोहळा व दशावतारी नाटक आयोजित केले आहे. या कार्यक्रमासाठी सिंधुदुर्ग जिल्हा देवळी समाज उन्नती मंडळाचे अध्यक्ष सावळाराम अणावकर प्रमुख पाहुणे म्हणून तर समाजातील प्रसिद्ध उद्योजक दत्ता कवठणकर (कवठणी), बाळ कनयाळकर, विकास कुडाळकर, मालवण तालुकाध्यक्ष श्रीकृष्ण तळवडेकर, वेंगुर्ले तालुकाध्यक्ष रमेश नरसुले, तालुका सरचिटणीस रमेश पिंगुळकर, दोडामार्ग तालुकाध्यक्ष गणपत नाईक, प्रमुख मार्गदर्शक बाबी वेतोरकर, विलास तेंडुलकर, शैलेश पेंडूरकर आदी उपस्थित राहणार आहेत. हा
कार्यक्रम देवी सातेरी परिसर युवक संघटना, पेंडूर-देऊळवाडीच्या रंगमंच (प्राथमिक शाळा क्र. १ नजीक) येथे होणार आहे. अधिक माहितीसाठी शेखर फोंडेकर व किशोर पेंडूरकर यांच्याशी संपर्क साधावा.
.......
पणदूर वृध्दाश्रमास
जीवनावश्यक वस्तू
कणकवली, ता. २४ ः पणदूर येथील संविता निराधार वृद्धाश्रमाला ओंकार राणे यांनी जीवनावश्यक वस्तू भेट दिल्या. संविता आश्रमात अनेक निराधार, वृद्ध यांना आधार दिला जातो. वृद्धांच्या पालन पोषणासाठी आश्रमातर्फे मेहनत घेण्यात येते. यासाठी अनेक दात्यांकडून मदत केली जाते. याच दृष्टीने ओंकार राणे यांनी ५० किलो साखर, १० डझन साबण, बिस्कीट पुडे आदी जीवनावश्यक साहित्याची देणगी दिली. यावेळी वृद्धाश्रमाचे संस्थापक संदीप परब व त्यांचे सहकारी, ए. डी. राणे व इतर उपस्थित होते.
..............
बागवे हायस्कूलचा
९२.५९ टक्के निकाल
मसुरेः येथील आर. पी. बागवे हायस्कूल आणि एम. जी. बागवे भरतगड उच्च माध्यमिक व्यवसाय शिक्षण तांत्रिक विद्यालयाचा बारावीचा निकाल ९२.५९ लागला. तीन ट्रेडमधून प्रविष्ठ २७ पैकी २५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये प्रथम अमोल धावडे (८० टक्के), द्वितीय केदार तांडेल (७८ टक्के), तृतीय हर्षद सांडव (७६.५०) टक्के यांनी यश प्राप्त केले. यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्था व प्रशालेच्या वतीने संस्थाध्यक्ष डॉ. दीपक परब व लोकल कमिटी अध्यक्ष महेश बागवे यांनी अभिनंदन केले.
..............
घरावर वीज कोसळून
परुळेत मोठे नुकसान
म्हापण : परुळे-गौतमनगर येथील कानू लुमाजी परुळेकर यांच्या घरानजीकच्या माडावर वीज कोसळून मोठे नुकसान झाले. याच दरम्यान परुळेकर यांच्या घरात विजेचा लोळ गेल्याने इलेक्ट्रिक उपकरणांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. वीज कोसळल्याने माड आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. ही घटना बुधवारी (ता. २३) सायंकाळी घडली. विजेचा लोळ घरात गेल्याने घरातील वीज उपकरणे जळून मोठे नुकसान झाले. बुधवारी सायंकाळी ६ वाजता विजेचा लखलखाट व ढगांच्या गडगडाटासह पाऊस झाला. यावेळी वीज परुळेकर यांच्या घरालगतच्या माडावर कोसळून माड जळाला. याबाबतचे वृत्त समजताच सरपंच प्रणिती आंबडपालकर व उपसरपंच संजय दुधवडकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
..............

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com