रत्नागिरी-५० खाटांचे रुग्णालय

रत्नागिरी-५० खाटांचे रुग्णालय

३४ (पान ३ साठी )

मुंबई, ठाणेच्या धर्तीवर पालिकेचे ५० खाटांचे रुग्णालय

पालकमंत्री उदय सामंत ः विकासकामे टप्प्याटप्प्याने पूर्ण करणार

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी, ता. २३ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून जसे मुंबई आणि ठाणे येथे सर्वसामान्यांसाठी रुग्णालय सुरु झाले आहे, त्याच धर्तीवर रत्नागिरी पालिकेचे ५० खाटांचे रुग्णालय सुरू केले जाणार आहे. केवळ एका केस पेपरच्या आधारावर रुग्णाला उपचार मिळणार आहेत. जो शब्द दिला आहे, ती विकास कामे टप्प्या टप्प्याने पूर्ण होतील, अशी माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली. राज्यातील निवडणुका संपल्यानंतर रत्नागिरी दौऱ्यावर आल्यानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
सामंत म्हणाले, २० मे रोजी महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीचा टप्पा संपला. त्यामुळे रत्नागिरीतील विकासकामांचा आढावा आज दिवसभर घेण्यात आला. त्यामध्ये ७७ कोटींच्या जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीचे काम ८० टक्के पूर्ण झाले असून ते दोन महिन्यात पूर्ण होईल. जिल्हाधिकारी कार्यालयातील १०० कोटीच्या प्रशासकीय इमारतीचे काम प्रगतीपथावर आहे. पालिकेच्या नूतन इमारतीचे काम अंतिम टप्प्यात आहे. रत्नागिरी पंचायत समितीचे नूतन इमारतीचे काम ९० टक्के झाले असून लवकरच ही इमारत पूर्ण होईल. रत्नागिरी शहरातील मध्यवर्ती बस स्थानकाचा काम सुद्धा येत्या दोन महिन्यांमध्ये पूर्ण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
राहाटाघर बस स्थानकातील काँक्रिटीकरणासह इतर काम १५ दिवसात पूर्ण होणार आहेत. रत्नागिरी शहरातील शिवसृष्टीचे काम ६०% पूर्ण झाले असून येत्या महिनाभरात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला जाणार आहे. रत्नागिरी शहरातील लोकमान्य टिळक स्मारकाच्या नुतनिकरणाच्या पहिला भाग पूर्ण झाला असून तेथील उजव्या इमारतीमध्ये संशोधन केंद्र आणि वाचनालय सुरू केले जाईल. मिऱ्या धूप प्रतिबंधक बंधाऱ्याच्या ६० कोटीच्या बंधाऱ्‍याचं काम ८० टक्के पूर्ण झाले आहे. ४१ कोटींच्या सुशोभीकरणाचं काम सुद्धा लवकरच सुरू होणार आहे. थ्रीडी मल्टीमीडियाचे काम पूर्णत्वास आले आहे. १५ ऑगस्टला त्याचं लोकार्पण होणार असून या थ्रीडी मल्टीमीडिया मध्ये मराठीसाठी प्रसिद्ध अभिनेते सचिन खेडेकर यांच्यासह हिंदी आणि इंग्रजी आवाजासाठी प्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन यांचा आवाज असेल असे त्यांनी सांगितले.
-----------

अनेक निकाल धक्कादायक
४ जूनला लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. त्यामध्ये महायुती सर्वाधिक जागा जिंकेल आणि अनेक निकाल धक्कादायक असतील. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या चारशे पारच्या आकड्यांमध्ये महाराष्ट्राचा सर्वात मोठा वाटा असेल असा विश्वास पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com