मालवण २५ तास अंधारात

मालवण २५ तास अंधारात

85484

मालवण २५ तास अंधारात
वादळी पावसाचा तडाखाः महावितरणसह हॉटेल, पर्यटन व्यवसायिकांचे नुकसान
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. २३ः तालुक्याला काल (ता.२२) वादळी वाऱ्यासह कोसळलेल्या मुसळधार पावसाचा फटका मोठ्या प्रमाणात बसला. यात महावितरणसह हॉटेल, पर्यटन व्यवसायिक यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. २५ तासाहून अधिक काळ मालवण काळोखात होते. महावितरणकडून विज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु होते.
तालुक्यात काल सायंकाळी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळला. विजेच्या लखलखाटासह कोळसलेल्या पावसामुळे सर्वसामान्यांबरोबरच पर्यटकांची तारांबळ उडाल्याचे दिसून आले. वाऱ्याचा जोर पहिल्यानंतर मालवणवासियांना तौक्ते वादळाची आठवण झाली. या वादळी वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात वित्तहानीच्या घटना घडल्या. अनेकांच्या घराची छप्पर, पत्रे, कौले उडून गेली. अनेक ठिकाणी नारळाची, आंब्याची झाडे तुटून पडली. या वादळी वाऱ्याचा फटका किल्ले सिंधुदुर्गला बसला. मुख्य विज वाहिनीसह विद्युत खांब कोसळून विज पुरवठा खंडित झाला. किल्ल्यातील अनेक झाडेही पडली. सौर नळपाणी योजेनेचे पॅनेल उडून गेल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरवात झाल्यानंतर विज पुरवठा खंडित झाला. रात्री उशिरापर्यंत विज पुरवठा सुरळीत होईल, असे वाटले होते. मात्र, अनेक ठिकाणी विद्युत खांब, विजेच्या तारा तुटून पडल्याचे दिसून आले. यात महावितरणचेही लाखो रुपयांचे नुकसान झाले. काल सायंकाळी ५ वाजता खंडित झालेला विज पुरवठा आज सायंकाळी सात वाजेपर्यंत सुरळीत झालेला नव्हता.
विज पुरवठा खंडित झाल्याने आणि तो पूर्ववत न झाल्याचा मोठा फटका पर्यटन, हॉटेल, थंडपेय व्यवसायिकांना मोठ्या प्रमाणात बसला. सध्या पर्यटन हंगाम अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे किनारपट्टी भागासह शहर परिसरात पर्यटकांची वर्दळ आहे. कालच्या दिवशी विज पुरवठा खंडित राहिल्याने पर्यटकांचे मोठे हाल झाले. अनेकांचे इन्व्हर्टर बंद पडल्याने व्यवसायिकांना भाड्याने जनरेटर मागवून घ्यावे लागले. आजच्या दुसऱ्या दिवशीही विज पुरवठा पूर्ववत न झाल्याने याचा फटका गृहिणींना, हॉटेल, पर्यटन व्यवसायिकांना बसल्याचे दिसून आले. शहरातील विज पुरवठा हा खंडित राहिल्याने पर्यटक येथे न थांबता अन्य ठिकाणी वास्तव्यास निघून गेल्याचे दिसून आले.
सध्या पर्यटन हंगाम अंतिम टप्प्यात आहे. येथे पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांना खंडित वीज पुरवठ्याचा फटका बसला आहे. यामुळे हॉटेल तसेच पर्यटन व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. महावितरण केवळ वीज बिले वसुलीचे काम ज्या पद्धतीने करते त्यानुसार पावसाच्या पार्श्वभूमीवर तातडीच्या उपाययोजना करण्याची कार्यवाहीही त्यांच्याकडून होणे अपेक्षित होती. मात्र ती न झाल्याने याचा मोठा फटका येथील व्यावसायिकांना बसला आहे असेही श्री. खोबरेकर यांनी सांगितले.

चौकट
धोकादायक खांबावरच नव्या वाहिन्यांची जोडणी
वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तविल्याने महावितरणने त्यादृष्टीने सतर्क राहणे गरजेचे होते. मात्र, पहिल्याच पावसात सुरळीत वीज पुरवठा देण्यास महावितरण अपयशी ठरले. महावितरणकडे विद्युत खांब तसेच अन्य अत्यावश्यक साहित्यच उपलब्ध नसल्याचे दिसून आले. जे खांब धोकादायक आहेत, त्यावरूनच नवीन वीज वाहिन्या ओढण्याचे काम करण्यात आले असल्याचा आरोप ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com