वेंगुर्ले शहराची टंचाईवर मात

वेंगुर्ले शहराची टंचाईवर मात

M86576
86577

वेंगुर्ले शहराची पाणी टंचाईवर मात
निशाण तलावः २५ जूनपर्यंत पुरेल इतका साठा
दीपेश परब ः सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. २९ : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या निशाण तलावात सद्य़स्थितीत ५ मीटर एवढा मुबलक पाणी साठा उपलब्ध असून हे पाणी २५ जूनपर्यंत शहराला पुरेल एवढे आहे. काही उंच भागातील वाडी-वस्तीत कमी दाबाने तर शहरात इतर ठिकाणी नियमित पाणीपुरवठा सुरू आहे. दरवर्षी टंचाईचे रडगाणे ऐकू येणाऱ्या येथील पालिकेने पाणीटंचाईवर मात केली आहे.
वेंगुर्ले नगरपरिषदेला पाणीपुरवठा करणारा मुख्य स्रोत निशाण तलाव आहे. तलावाची उंची २.५ मीटरने वाढविण्याचे काम पूर्ण झालेले आहे. यामुळे तलावातील पाण्याची क्षमता १७२ मीटरवरून १७४.५० मीटर एवढी वाढलेली आहे. सद्यस्थितीत तलावामध्ये ५ मीटर एवढा मुबलक पाणी साठा उपलब्ध आहे. त्यामुळे हा पाणी साठा २५ जूनपर्यंत पुरणारा आहे. वेंगुर्ले शहराला पाणीपुरवठा करणारा दुसरा स्रोत असलेल्या नारायण तलावामध्ये पाणी साठा कमी असल्याने या भागातील काही नळ जोडणीला कमी दाबाने पाणीपुरवठा होत असतो. सद्यस्थितीत शहरात १३०० च्या आसपास नळ जोडण्या आहेत. शहराला पाणीपुरवठा करणारे इतर स्रोत गाडीअड्डा, वेशी-भटवाडी विहीर, आनंदवाडी विहीर आणि अग्निशमन विहीर या ठिकाणी पाणी साठा उपलब्ध असल्याने २५ जूनपर्यंत पाणीपुरवठा होऊ शकणार आहे.
वेंगुर्ले शहरात फेब्रुवारी-मार्चनंतर ठरलेली पाणीटंचाई हे समीकरण गेली कित्‍येक वर्षे नित्‍यनियमाने गृहित धरले होते. पावसाळ्यात मुबलक पाऊस पडला तरी नियोजनाअभावी त्‍याचे वाहून जाणाऱ्या पाण्यामुळे शहरातील बहुतांश भागात साधारण फेब्रुवारी-मार्चनंतर टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत असे. परिणामी वर्षभरातील आठ महिने स्‍वर्गासारखे भासणारे शहर पावसाळ्यापूर्वीचे चार महिने पाण्‍याअभावी वाळवंटासारखे वाटत असे.
पालिकेमार्फत पाण्‍याची अडचण दूर करण्‍यासाठी अस्तित्‍वात असलेल्‍या संसाधनांचे योग्‍य नियोजन करण्‍यात आले. शहरातील सात ठिकाणच्‍या जुन्‍या व गळती लागलेल्‍या जलवाहिन्‍या बदलण्‍यात आल्‍या. संपूर्ण शहराची तहान भागविणारा निशाण तलावाची उंची २.५० मीटरने उंची वाढवून तो सक्षम बनविण्‍यात आला. निशाण तलावाचे गोडबोले गेट १४ ऑगस्‍ट २०२३ ला पालिकेकडून बंद करण्‍यात आले. अरबी समुद्रात निर्माण झालेल्‍या कमी दाबाच्‍या पट्टयामुळे पडलेल्‍या मुसळधार पावसामुळे सप्‍टेंबर अखेरीस निशाण तलाव ''ओव्‍हर फ्लो'' म्‍हणजे पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागला.

चौकट
पाणीटंचाई इतिहासजमा
वेंगुर्ले शहराला पाणीटंचाईचा प्रश्न बरीच वर्षे भेडसावत होता. २०१६ मध्ये शहरात पाण्याचे टँकर फिरवावे लागत असत; मात्र हे चित्र आता इतिहासजमा झाले आहे. येथील निशाण तलावाची उंची वाढविल्याने व शहरातील जीर्ण पाईपलाईन बदलल्याने हे शक्य झाले. निशाण तलावाची उंची १७२ मीटरवरून १७४.५० मीटरपर्यंत वाढली असून, ११ कोटी ६० लाख लिटर इतका वाढीव पाणी साठा निर्माण झाला होता. त्यामुळे आता उन्हाळ्याच्या या शेवटच्या दिवसात सुद्धा मुबलक पाणीसाठा उपलब्ध आहे.

कोट
देशात आणि राज्यात पाणीटंचाईचे संकट असताना वेंगुर्ले पालिकेने पाण्याचे योग्य नियोजन केले. त्यामुळे यंदा २५ जूनपर्यंत पाणीटंचाई भासणार नाही. शहराला योग्य प्रकारे पाणीपुरवठा होऊ शकेल. पावसाळा लांबल्यास पाण्याचे पुढील नियोजनही पालिकेकडून योग्य प्रकारे करण्यात येत आहे. तशी वेळ उद्भवल्यास शहराला एक दिवस आड करून पाणीपुरवठा करण्यात येणार आहे; मात्र सद्यस्थितीत वेंगुर्ले पालिकेने पाणीटंचाईवर मात केली आहे.
- परितोष कंकाळ, मुख्याधिकारी

कोट
मी नगराध्यक्ष झाल्यानंतर २०१६ मध्ये पाणीटंचाईचे मोठे आव्हान होते. यामुळे सर्व नगरसेवकांच्या मदतीने या समस्येवर काम सुरू केले. निशाण तलावातील पाणी किती लोकांपर्यंत पोहोचते, याचा सर्व्हे केला. याअगोदर धरणातून ७ लाख लिटर पाणीसाठा होत होता. पैकी ४ लाख लिटर पाणी नागरिकांपर्यंत पोहोचत असे, तर ३ लाख लिटर पाणी गळतीमुळे वाया जात असे. हे लक्षात घेऊन वेंगुर्ले शहर नळपाणी पुरवठा योजना टप्पा २, निशाण तलावाची उंची २.५ मीटरने वाढविणे, अग्निशमन केंद्र येथे २.२५ लाख लिटर क्षमतेची टाकी आणि विहिरीचे बांधकाम पूर्ण करणे, गाडीअड्डा भागात १ लाख लिटर क्षमतेची टाकी बांधकाम करणे आणि बोरवेल बांधकाम पूर्ण करणे, असे प्रकल्प हाती घेतले. शहरातील महत्त्वाच्या भागात म्हणजे वेशी-भटवाडी, किनळणे, दाभोसवाडा, राजवाडा, गावडेवाडी, बंदर रोड, मानसी पूल रस्ता ते दाभोली नाका, राऊळवाडा ते पाटीलवाडा, म्हाडा वसाहत येथील पाईपलाईन बदलल्यामुळे उंच भागातील पाण्याची समस्या कमी झाली आणि वेंगुर्ले शहर टँकरमुक्त होऊ शकले.
- दिलीप गिरप, माजी नगराध्यक्ष

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com