पालवी मेस्त्री हिचा
दोडामार्गात सत्कार

पालवी मेस्त्री हिचा दोडामार्गात सत्कार

पालवी मेस्त्री हिचा
दोडामार्गात सत्कार
दोडामार्ग ः शालांत परीक्षेत दोडामार्ग तालुक्यात प्रथम क्रमांकप्राप्त कळणे हायस्कूलची विद्यार्थिनी पालवी मेस्त्री हिचा जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. श्री गणेशाची चांदीची मूर्ती व गुलाब पुष्प देऊन पालवीचे कौतुक करण्यात आले. आडाळी सरपंच पराग गांवकर, कळणे सरपंच अजित देसाई, मोरगाव उपसरपंच देविदास पिरणकर, ग्रामपंचायत सदस्य अमोल परब, गोविंद परब, भिवा गांवकर, कळणे हायस्कूलचे कर्मचारी, मधुकर गावकर, सानिका गावकर, कल्पना परब, रेश्मा जाधव, राजश्री परब, रामा मेस्त्री आदी उपस्थित होते. पालवी ही आडाळीतील आशा स्वयंसेविका मिताली मेस्त्री व ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण मेस्त्री यांची सुकन्या आहे. अत्यंत सामान्य कुटुंबातील पालवीने मिळविलेल्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. तिच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी लागेल ते सहकार्य करण्याचे आश्वासन श्री. नाडकर्णी यांनी मेस्त्री कुटुंबियांना दिले.
--------------
अर्चना घारे-परब यांचा
आसोली येथे सत्कार
वेंगुर्ले ः आसोली-माईनतडवाडी मित्रमंडळाच्यावतीने शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब यांचा सत्कार करण्यात आला. आसोली-सक्राळवाडी येथे माईनतडवाडी मित्रमंडळाच्यावतीने अमृतनाथ दशावतार मंडळाच्या नाट्यप्रयोगाचे आयोजन केले होते, यावेळी त्या उपस्थित होत्या. आधुनिक युगामध्ये आपल्या सर्व रूढी, परंपरा जपण्याचे काम हे कलाकार करत आहेत. त्यांचे करावे तेवढे कौतुक थोडे आहे. आसोली-सक्राळवाडी हे सुरंगीचे गाव म्हणून परिचित आहे. सुरंगीची फुले येथे बहरतात. इथला समाज, शेतकरी हा कष्टकरी आहे. तुमच्या सुखदुःखात सदैव तुमच्या पाठीशी तुमची लेक म्हणून उभी राहणार, असा शब्द सौ. घारे-परब यांनी दिला. सुरंगीसाठी बाजारपेठ, शेतकरी प्रश्न सोडविण्यासाठी माझे प्राधान्य राहील, असे मत अर्चना घारे-परब यांनी व्यक्त केले.
---
तळवडे-नेमळे रस्त्याचे
काम त्वरित पूर्ण करा
सावंतवाडी ः अनेक दिवसांपासून तळवडे-नेमळे रस्त्याचे काम रखडले आहे. यामागे केवळ सरकारचा निष्काळजीपणा दिसून येत आहे. त्यामुळे यावर वेळीच तोडगा काढून पावसाळ्यापूर्वी रस्त्याचे काम पूर्ण करा, अन्यथा अनोख्या पद्धतीने आंदोलन छेडू, असा इशारा जिल्हा काँग्रेसचे सचिव केतन गावडे यांनी बांधकाम विभागाला दिला. याबाबत बांधकाम विभागाशी संपर्क साधला असता, शासनाकडून ठेकेदाराला बिल न मिळाल्यामुळे काम बंद असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे केवळ सरकारच्या नाकर्तेपणामुळे या रस्त्याचे काम रखडले आहे. यावर तोडगा काढून रस्त्याचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करा, अशी मागणी गावडे यांनी केली.
-------------
गुणवंत विद्यार्थ्यांचा
वेंगुर्ले येथे सत्कार
वेंगुर्ले ः नगर वाचनालय संस्थेकडे मुंबईतील आपा लक्ष्मण कवठणकर यांनी दिलेल्या देणगीतून वेंगुर्ले शहरातील २०२४ मधील दहावी परीक्षेत सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या ख्रिश्चन ज्ञातीतील विद्यार्थ्यांना तसेच वेंगुर्ले-भुजनाकवाडी येथून सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थी अगर विद्यार्थिनीला पारितोषिक देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी नगर वाचनालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन कार्याध्यक्ष अनिल सौदागर व कार्यवाह कैवल्य पवार यांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com