बेगमी

बेगमी

रानभूल - लोगो

87295

बेगमी

उन्हाची लाहीलाही संपून पावसाळा तोंडावर आला की, ऋतूमान प्रचंड बदलू लागतं. हवेत उष्णता जरी कमी होऊ लागली तरी आर्द्रता वाढू लागते. मधूनच थंडगार पावसाचा शिडकावा येऊन जातो आणि सगळ्यांची धावपळ उडवतो. वळवाचा किंवा मान्सूनपूर्व पाऊस तसा नासाड्याचा. जांभळं, करवंद, आंबे असा रानमेवा एकदा का पाऊस पडला की, बिनकामाचा होतो. आंब्याची तर चवसुद्धा बदलते. पाणी शोषून घेऊन पचपचीत झालेली जांभळं उचलण्याचे कष्ट कोण घेत नाही. त्यातल्या त्यात फणस नेमके पाऊस सुरू झाला की, पिकायला लागतात. झाडावर लटकणारे अतिपिकलेले फणस पावसाळी वारा सुटला की, दणकन खाली पडतात. वीज चमकण्याच्या भितीनंतर हा फणस अंगावर पडणे हा दुसरा भितीदायक प्रकार असावा. तयार होऊन चांगले कपडे घालून बाहेर निघालो की, फणस पडून कपडे खराब होणे हे चांगलंच भितीदायक. अळू, नेरली, अटक मे महिन्याअखेरीस कमी झालेली असतात. जिभेचे चोचले पुरवण्यासाठी या काळात उपयोगी पडतात ते अढीचे आंबे. भाताचा पेंढा गवत वापरून केलेल्या अढीमध्ये पिकवलेल्या आंब्यांचा घमघमाट विसरणे अशक्य आहे. मोठे खोबरी, भोपळी आंबे मात्र लोणच्याच्या बरणीत कैद होतात. पावसाळ्याचे चार महिने येणार, बऱ्याच ठिकाणी नदीनाले भरले जाणार, दरडी कोसळणार, रस्ते बंद होणार आणि मुख्य म्हणजे बहुतांशी लोकं शेतीच्या कामात अडकून पडणार. पावसात घराबाहेर बाजारात आणि गावाबाहेर जायचं प्रमाण अचानक कमी होतं. म्हणून या चार महिन्यांची बेगमी करणं अतिशय महत्वाचं ठरतं.

- प्रतीक मोरे
Email ID: moreprateik@gmail.com
------

कोकणात पावसाळा ऋतूला ‘आगोट’ असा शब्दोच्चार करून संबोधणारी अनेक वयस्कर मंडळी आपल्याला आजही आढळतील. पाऊस सुरू झाला की, ‘आगोट भरली‘ असा शब्दप्रयोग सगळीकडे सर्रास ऐकावयास मिळतो. अशीच अनेक वर्षे अनुभवलेली पावसाळी आगोट अजूनही मनाच्या तळाशी जतन करून ठेवली आहे. कोकणात मुसळधार पाऊस आणि भातशेतीची कामे हातात हात घालून येतात. पर्जन्यकाळात तीन-चार महिने पुरेल इतका बाजारहाट करून साठवण करून ठेवणे (म्हणजेच आगोटचा बाजारहाट करणे.) याला फार महत्व होतं. कांदे, जाडं मीठ, तेल, कडधान्ये आणि महत्वाची म्हणजे सुकी मच्छी. प्रत्येक घरासमोरील अंगणात कोलीम, काड, सुकट, सोडे, बांगडे, बोंबील आणि शिंगट्याचे तोरण यांना एक-दोनदा उन्हं दाखवण्याचा कार्यक्रम ठरलेला असे आणि याच्या राखणीसाठी घराच्या उंबरठ्यावर काठी घेऊन त्या घरातील वयस्कर व्यक्ती बसलेली असे चित्र सर्रास पाहायला मिळते. कडधान्यं, सुकी मच्छी, मीठ, पापड वाळवून पत्र्याच्या डब्यात, मडक्यात नीटनेटके बांधून, माळ्यावर सुरक्षित स्थळी ठेवून द्यायची आणि गरजेनुसार त्याचा वापर केला जायचा. पावसानं यथेच्छ समाचार घेतला, ओली मासळी मिळणं मुश्कील झालं की, मासळीप्रेमींना सुक्या मच्छीची हमखास आठवण येतेच. भात आणि त्यावर वाफाळलेला सुक्या मच्छीचं कालवण किंवा रस्सा याची चव काही औरच. तो तृप्तीचा ढेकर, ती चव! आठवणींच्या गाठोड्यात अजूनही तशीच जतन आहे. अगदीच पावसात भिजून आल्यावर चुलीत भाजलेला खारा बांगडा, वरून थोडे तिखट-मीठ आणि गरम गरम भाकरी भल्याभल्यांना जिभेला पाणी सुटवू शकते. त्यात एखादी कांद्याची फोड आणि करकरीत लोणचं. जोताला चिखल तुडवून दुखू लागलेलं अंग क्षणात दुखायचं थांबून डोळ्यावर कधी झापड येते हे कळतदेखील नाही. मे महिन्यातील लग्नसराई संपली की, पावसाच्या चाहुलीने आगोटची लगबग सुरू होत असे. वर्षभर साठवून ठेवलेली लाकडे खोपीत भरणे, खोप, वाडा (गोठा) शिवणे, वाड्याच्या माळ्यावर पेंढा (वैरण) भरणे, शेतीची औजारे, बी-बियाणे, खताची गोणीची जमवाजमव, काकडी, दोडके, पडवळ, चिबूड अशा वेलीची लहान लहान रोपं तयार करणे, माशांसाठी नदीत ‘बांधन’ धरणे, टोके वळणे, साकव बांधणे, सापळा रचणे, खेकड्यांसाठी मेंटलच्या बत्तीची शोधाशोध अशा हजार भानगडीत डोकं वर निघणं मुश्किल होतं. कांदे-बटाटे, डाळी आणण्यासाठी बाजारात किराणा दुकानात लाईन लागते. वर्षभराचा मसाला करण्यासाठी गृहिणी पहिली धाव मिरच्या घ्यायला वळते काश्मिरी बेडगी तिखट रंगाची. अशा अगम्य बडबडीत बायका गुंगून जातात. घरी मिरची आली की, मग एका दुपारी मिरची भाजलेल्याच्या ठसक्याने जाग येते. या मसाल्याचा दरवळ आणि पुराण मग पुढचे दोन-तीन दिवस डबे भरून कपाटात जात नाहीत तोपर्यंत चालू राहते.
भात व मासे हे येथील शेतकऱ्यांच्या दररोजच्या आहारातील मुख्य पदार्थ आहेत. जून महिन्यापासून सर्वत्र सागरी मासेमारी बंद होते. पुढील तीन महिन्यांपर्यंत ती बंदच असते. पावसाळ्यात गोड्या पाण्यातील मासे, खेकडे उपलब्ध होत असले तरी अनेकांना शेतीच्या कामांमुळे असे मासे, खेकडे पकडणे शक्य होत नाही. अशा परिस्थितीत येथील खवय्यांची गैरसोय होऊ नये यासाठी पावसाळ्यासाठी लागणाऱ्या सुक्या मच्छीची खरेदी पावसाळ्यापूर्वी केली जाते. विकत घेतलेली सुकी मच्छी खरेदी करून ती आणखी वाळवून आवश्यक वाटल्यास व्यवस्थित तुकडे करून ती पावसाळ्यासाठी हवाबंद बरण्यांमध्ये किंवा डब्यांमध्ये भरून ठेवली जाते. आगोटसाठीच्या सुक्या मच्छीच्या खरेदीत प्रामुख्याने बगी, बोंबिल, कोलीम, आंबडखाड, सोडे, बांगडा, ढोमा, लेपा, मांदेली, चेवना, सुरमई यांसारख्या सुक्या मच्छीचा सामावेश असतो. आगोटच्या या काळात अनेक स्थानिक बाजारपेठांमध्ये, आठवडी बाजारांतून अशा सुक्या मासळीची खरेदी-विक्री मोठ्या प्रमाणावर होते. आगोटीची तयारी संपली की, मग कोकणी मिरगाच्या तयारीला लागतो.

(लेखक निसर्ग अभ्यासक आणि सह्याद्री संकल्प सोसायटीचे कार्यकारी संचालक आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com