जीवन जगणारं शिक्षण, आनंद देणारे करिअर निवडा

जीवन जगणारं शिक्षण, आनंद देणारे करिअर निवडा

87534

जीवनात आनंद देणारे करिअर निवडा

जनार्दन नारकर ः कनेडीत ‘शिक्षणाच्या पुढील वाटा’ विषयी मार्गदर्शन

सकाळ वृत्तसेवा
कनेडी, ता. ३ः पहिलीपासून शिक्षण घेत असताना रोजच्या जीवनाला जगणारे शिक्षण असले पाहिजे. विद्यार्थ्यांच्या आवडीप्रमाणे शिक्षण मिळायला हवे. तसेच दहावी-बारावी नंतर स्वतःला आनंद देणाऱ्या करियरची निवड करा, असा सल्ला शिक्षणतज्ज्ञ, माजी मुख्याध्यापक तथा कोकिसरे शिक्षण संस्थेचे सचिव जनार्दन नारकर यांनी आज येथे दिला.
माध्यमिक विद्यामंदिर कनेडी या प्रशालेच्या ज्ञानदीप सभागृहात आज दहावी बारावीतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी ‘शिक्षणाच्या पुढच्या वाटा’ विषयावर मार्गदर्शन कार्यक्रमात नारकर बोलत होते. कनेडी संस्थेचे अध्यक्ष सतीश सावंत, सरचिटणीस शिवाजी सावंत, शालेय समितीचे चेअरमन राजाराम सावंत, सदस्य तुषार सावंत, मुख्याध्यापक सुमंत दळवी आदी उपस्थित होते.
दहावी बारावी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या कथा आणि थोर पुरुषांच्या वाटचालीची माहिती देत आनंददायी शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. श्री. नारकर म्हणाले, ‘‘दहावी- बारावीनंतर विद्यार्थ्यांना जे गुण मिळतात ते गुण समाजातील इतर लोकांना दाखवण्यासाठी असतात. त्या गुणांचा विद्यार्थ्यांना फारसा फायदा होत नाही, कारण समाजाच्या किंवा आपल्या आजूबाजूच्या नातेवाईकांच्या मोठ्या अपेक्षा विद्यार्थ्यांकडून असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना करिअर निवडताना अनेक अडचणी निर्माण होतात. दुसऱ्याच्या सल्ल्याने कधीच करिअर निवडू नये. मला काय व्हायचे आहे, माझे स्वप्न काय आहे आणि मी काय बनणार, माझ्याकडे कोणती कला आहे. हे ज्या विद्यार्थ्याला समजले तोच विद्यार्थी आनंददायी करिअर निवडू शकतो. जिथे आपण व्यवसाय किंवा नोकरी करणार आहोत तिथे आपल्याला आयुष्यबराचे समाधान मिळायला पाहिजे. कुणीतरी कुठलातरी विषय घेऊन नोकरीची संधी आहे असे सांगितले तर तुम्ही निश्चितपणे यात फसाल.’’
संस्था अध्यक्ष श्री. सावंत म्हणाले, ‘आपला मित्र किंवा मैत्रीण ज्या वाटेने जात आहे तीच वाट चोखाळली पाहिजे हे प्रथम प्रत्येकाने विसरावे. स्वतःची गुणवत्ता, भविष्याची स्वप्न साकारायची असतील तर तुम्हाला स्वतःच्या विचाराने करिअर निवडण्याची गरज आहे. मार्गदर्शन हे दुसऱ्यांकडून घेत असताना आपण त्यात कोणता विषय निवडणार हे दहावी बारावी मध्येच निश्चित करा. दहावी-बारावी या शिक्षणाच्या प्रमुख पायऱ्या आहेत. पण, दहावीत ९० टक्के गुण मिळाले असले तरी त्या यशाने भारावून जाऊ नका. कारण खऱ्या अर्थाने पुढील शिक्षणाचा पाया हा बारावीच्या गुणावर ठरतो. दहावीचे गुण हे निव्वळ मार्गदर्शक आहेत. गुण देण्याची पद्धत ही बदलल्यामुळे निकालाची गुणवत्ता वाढलेली दिसते. त्यावर पालक शिक्षकांनी भारावून न जाता बारावीमध्ये आपण विशेष प्राविण्य श्रेणीतून उत्तीर्ण होणार आहोत का? हा खरा करिअरच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा विषय आहे. मुख्याध्यापक सुमंत दळवी यांनी प्रास्ताविक केले. श्री. कोरडे यांनी सूत्रसंचालन केले.
---
स्वतःमधील क्षमता ओळखा
श्री. नारकर म्हणाले, ‘‘आई-वडिलांपेक्षा स्वतःला काय बनायचे आहे. आपली काय क्षमता आहे, ती प्रथम ओळखा. आज प्रचलित शिक्षण पद्धती, छोट्या-मोठ्या उद्योगासाठी आणि नव्या तंत्रज्ञानासाठी अगदी कमी खर्चाचे नोकरी धंदा देणारे अनेक अभ्यासक्रम आहेत. कला शाखेमधूनही अनेक अभ्यासक्रम आहेत. परंतु, आजकालची पिढी ही आयटी आणि कॉम्प्युटर क्षेत्राकडे वळत आहे. आयटी क्षेत्र किंवा इंजीनियरिंग आणि वैद्यकीय क्षेत्र यालाही मर्यादा आहेत. या पारंपरिक क्षेत्राबरोबरच करिअरच्या अनेक वाटा आहेत. या विविध अभ्यासक्रमाची माहिती श्री. नारकर यांनी आपल्या मार्गदर्शनात दिली.’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com