-दापोली, गुहागरमध्ये विजयासाठी तटकरेंची मदत

-दापोली, गुहागरमध्ये विजयासाठी तटकरेंची मदत

दापोली, गुहागरमध्ये राष्ट्रवादीचे प्राभल्य वाढले

तटकरेंच्या विजयाने उत्साहाचे वातावरण ; विधानसभा निवडणुकीसाठी आशावादी चित्र

सकाळ वृत्तसेवा ः

चिपळूण, ता. ५ ः रायगडचा मतदारसंघ हा प्रवाहाविरोधात जाणारा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. यंदाच्या निवडणुकीत पुन्हा एकदा त्याचीच प्रचिती आली. राज्यातील बहुतांश भागात महाविकास आघाडीचा प्रभाव होता. पण रायगडमध्ये हा प्रभाव दिसला नाही. मतदारांनी पुन्हा एकदा सुनील तटकरेंवर विश्वास दाखवला. त्यामुळे कोकणात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे वजन वाढले आहे. त्याचा फायदा आगामी काळात दापोली आणि गुहागर विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादीला होणार आहे.

गुहागर विधानसभा मतदार संघात अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष आणि तटकरेंचे विश्वासू बाबाजी जाधव विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. त्यांना उमेदवारी मिळाली तर तटकरे त्यांच्यासाठी यंत्रणा उभी करतील. या मतदार संघातून भाजपचे माजी आमदार विनय नातू देखील इच्छूक आहेत. त्यांनी तटकरे यांच्या प्रचारासाठी प्रामाणिकपणे काम केले. त्यामुळे नातूंसाठी तटकरेंना गुहागरमध्ये धावून जावे लागणार आहे. दापोलीची जागा शिंदे गटाच्या शिवसेनेकडे आहे. तेथून विद्यमान आमदार योगेश कदम पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात असतील. या ठिकाणी आगामी काळात महायुतीला आपले स्थान बळकट करण्यासाठी खासदार सुनील तटकरे यांची साथ मोलाची राहणार आहे. या लोकसभा निवडणुकीत रायगड मतदारसंघात अटीतटीचा सामना पाहायला मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र तसे झाले नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनील तटकरे यांनी ही लढत सहज जिंकली.

मतदारसंघातील सक्रीयता, दांडगा जनसंपर्क सुनील तटकरेंच्या पथ्यावर पडले. शिवसेना शिंदे गट, भाजप, मनसे, आरपीआय यांची साथ तटकरेंसाठी मोलाची ठरली. दापोली आणि गुहागरमध्ये पिछेहाट होऊनही त्याचा निवडणूक निकालावर फारसा परिणाम झाला नाही. अलिबाग मुरुड आणि श्रीवर्धनमधील मुस्लिम मतांच्या ध्रुवीकरणाचा प्रभाव कमी करण्यात तटकरेंना यश आले. महायुतीतील घटक पक्षात समन्वय ठेवण्यात तटकरे बऱ्याच प्रमाणात यशस्वी ठरले. त्यामुळे निवडणुकीचा मार्ग सोपा झाला.
----------
चौकट
शेकाप, कॉंग्रेसची साथ गीतेंना मिळाली नाही

मागील निवडणुकीत पराभूत झालेले अनंत गीते पाच वर्षे अज्ञातवासात होते. शिवसेनेतील बंडानंतर ते पुन्हा एकदा सक्रीय झाले. गद्दारांना धडा शिकवा असे आवाहन करत त्यांनी मतदारांना भावनिक साद घातली. धर्म आणि जातीच्या आधारे मतांचे ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा निवडणुकीच्या निकालावर फारसा परिणाम झाला नाही. निवडणूक काळात पक्षाची यंत्रणा खूपच कुचकामी ठरली. शेकाप आणि काँग्रेसची अपेक्षित साथ गीतेंना मिळाली नाही. त्यामुळे सातव्यांदा लोकसभेवर निवडून जाण्याचा गितेंचा प्रयत्न फसल्याची चर्चा आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com