भाजपच्या विजयानंतर हलणार अनेक सत्तास्थाने

भाजपच्या विजयानंतर हलणार अनेक सत्तास्थाने

कोकणातील राजकीय समीकरणे बदलणार

नारायण राणे यांच्या विजयाने हलणार अनेक सत्तास्थाने ; भाजपसाठी पोषक वातावरण

राजेश शेळके ः सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ५ : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीत नारायण राणे यांनी फक्त सिंधुदुर्गातील आघाडीच्या बळावर बाजी मारल्यानंतर कोकणचे नेते म्हणून पुन्हा एकदा त्यांनी आपला दबदबा निर्माण केला. जी रणनीती त्यांनी वापरली त्याचा विचार करता भविष्यातील विधानसभेसह पालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीवर एकहाती अधिराज्य राहण्यासाठी ते आक्रमक राहतील असे चित्र आहे. भाजपसाठी हा अनपेक्षित फायदा आहे. राणेंच्या विजयामुळे रत्नागिरीसह इतरत्र अनेकांची सत्तास्थाने हलण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदार संघापैकी विनायक राऊत यांची राजापूर विधानसभेवर भिस्त होती. आमदार राजन साळवी आणि काँग्रेसची ताकद असलेला हा मतदार संघ आहे. त्यामुळे ४० ते ५० हजारापेक्षा जास्त मते मिळतील, अशी राऊत यांनी गृहित धरले होते; परंतु राणेंनी आपल्या राजकीय खेळीने ती १९ हजारांवर सीमित ठेवली. रत्नागिरी मतदार संघ राणेंना चांगला बोनस देणारा ठरेल, अशी अपेक्षा होती. येथील आमदार आणि राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी महायुती म्हणून जोरदार काम केले होते. प्रत्यक्षात राणे ९ हजार ६७८ नी पिछाडीवर पडल्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाले. तोच प्रकार चिपळूण मतदार संघात झाला. येथील आमदार शेखर निकम तर स्वतः प्रत्येक घराघरात फिरत होते; मात्र राऊत यांना २० हजार ६३१ चे मताधिक्य मिळाले. ही निवडणूक म्हणजे एकप्रकारे विधानसभेपूर्वीची तालिम आहे.

नारायण राणे यांचा विजय होताना सामंत आणि निकम यांना मतांच्या आकडेवारीत मात्र हार मानावी लागली आहे. राणेंना पडलेल्या मतांचा विचार केला तर रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेना अजून मजबूत आणि जागेवर आहे. राणेंना शिवसेनेचे हे मूळ हलविणे तेवढे सोपे नाही. रत्नागिरी जिल्ह्यात त्यांना आपली राजकीय मूळे मजबूत करण्याचे मोठे आव्हान आहे.
----------
कामांचा निवाडा केला जातो
विधानसभा मतदार संघाअंतर्गत वेगवेगळी सत्तास्थाने आहेत. तेथूनच जिल्ह्यासह कोकणाचा राजकीय कारभार हाकला जातो. शासकीय, अशासकीय कामांचा निवाडा केला जातो. त्यामुळे काहींना राजकीय वलय निर्माण झाले आहे; परंतु या निवडणुकीनंतर महायुतीतील अंतर्गत कलह वाढत जाण्याची शक्यता आहे. कोकणचे नेते म्हणून पुन्हा एकदा नारायण राणेंनी आपला दबदबा निर्माण केला आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत आता सर्व सत्तास्थाने हलणार आहेत.
-------------
कोट
लोकसभा निवडणुकीत राजापूर मतदारसंघात आम्हाला दोन नंबरची मते मिळाली आहेत. २०१९ च्या तुलनेत भाजपला चांगला लोकाश्रय मिळाला आहे. भाजपसाठी हे सूचिन्ह असून येत्या विधानसभेला राजापूर विधानसभेवर भाजपचा दावा असणार आहे.
- नीतेश राणे, भाजप आमदार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com