अमेरिकेत टि-२० चा ''फिवर''

अमेरिकेत टि-२० चा ''फिवर''

88382
88383

अमेरिकेत टि-२० चा ‘फिवर’
जोरदार तयारीः स्थायिक भारतीयांमध्ये उत्साह
निलेश मोरजकरः सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. ५ः बेसबॉल आणि बास्केटबॉल खेळासाठी लोकप्रिय असलेल्या अमेरिकेत टी-२० आंतरराष्ट्रीय वर्ल्डकपच्या निमित्ताने क्रिकेटचा कुंभमेळा सुरु असून या खेळाकडे अमेरिकन नागरिकांचा बघण्याचा दृष्टिकोन हा बदलत असल्याचे चित्र आहे. वेस्ट इंडिजसह अमेरिका हा वर्ल्डकपचा संयुक्त आयोजक असून व विशेष म्हणजे भारतीय संघाचे सर्व सामने हे अमेरिकेत होणार असल्याने भारतीय चाहत्यांसोबतच अमेरिकन नागरिकांनाही भारतीय संघाचा खेळ पाहण्याची उत्सुकता लागली आहे.
सर्वाधिक उत्सुकता असलेल्या व पारंपारिक प्रतिस्पर्धी असलेल्या भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना सर्वांना पाहता यावा यासाठी अमेरिकेतील प्रमुख शहरात मोठमोठ्या स्क्रिन लावून विशेष नियोजन करण्यात आल्याचे सकाळचे वाचक व नोकरीनिमित्त अमेरिकेत स्थायिक असलेले शंकर सावंत यांनी सांगितले. ते म्हणाले, ''अमेरिकेत क्रिकेटसाठी पोषक वातावरण नाही. मात्र, अमेरिकेचा राष्ट्रीय संघ आयसीसीच्या अनेक जागतिक स्पर्धामध्ये सहभागी झाला आहे. शालेय अभ्यासक्रमात देखील या खेळाचा समावेश करण्यात आल्याने अमेरिकेत क्रिकेट रुजत असल्याचे चित्र आहे. एकेकाळी ''वेळखाऊ खेळ'' असे म्हणणाऱ्या अमेरिकन नागरिकांनी या खेळाला स्वीकारले असल्याचे क्रिकेट वर्ल्डकपच्या निमित्ताने समोर आले आहे.''
ते पुढे म्हणाले कि, ''अमेरिका हा मुळातच बलाढ्य देश आहे. सर्वच क्षेत्रात या देशाची मक्तेदारी आहे. खेळाच्या दृष्टिकोनातून पाहिल्यास या देशात बेसबॉल व बास्केटबॉल हे अत्यंत लोकप्रिय खेळ आहेत. ऑलिम्पिकमध्ये या खेळात अमेरिकेचे आतापर्यंत वर्चस्व राहिले आहे. मात्र, आता या देशातील युवाईने क्रिकेट या खेळालाही स्वीकारले आहे. देशातील अनेक मोठ्या शहरात तसेच छोट्या शहरात देखील क्रिकेट क्लबच्या माध्यमातून क्रिकेटचे धडे देण्यात येतात. भारतीय युवा खेळाडू सौरभ नेत्रावळकर हा अमेरिकन संघाचे प्रतिनिधीत्व करत आहे. उनमुक्त चंद, हरमीत सिंग हे खेळाडू देखील अमेरिकेत क्रिकेट खेळत आहेत. भारतीय संघातील विराट कोहली, रोहित शर्मा, ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमींस यासह इंग्लंड व वेस्ट इंडिजमधील अनेक स्टार खेळाडूंची क्रेझ या देशात आहे. भारताचा मास्टर ब्लास्टर, विक्रमादित्य सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंग धोनी यांचाही चाहता वर्ग याठिकाणी पाहावयास मिळत आहे.
अमेरिकेतील न्यूयॉर्क आणि न्यूजर्सी भागात आशियाई देशातील नगरिकांची संख्या सर्वाधिक आहे. त्यातही भारत, पाकिस्तान, बांगलादेशचे लोक मोठ्या संख्येने याठिकाणी राहतात. त्यामुळेच आशियाई देशांचे बहुतांश सामने हे न्यूयॉर्कमध्ये ठेवण्यात आले आहेत. येथील भारतीय नागरिकांना क्रिकेटचे सामने हे प्रथमच अमेरिकेत मैदानावर जाऊन पाहण्याची संधी उपलब्ध झाल्याने उत्सुकता अधिकच वाढली आहे. देशातील अनेक शाळेतील शालेय अभ्यासक्रमात क्रिकेटचा समावेश करण्यात आल्याची माहिती सावंत यांनी दिली. त्यामुळे अमेरिकेत देखील क्रिकेट हा खेळ रुजू लागल्याचे चित्र आहे.

चौकट
भारत-पाकिस्तान सामन्याची उत्सुकता
क्रिकेटमधील पारंपारिक प्रतिस्पर्धी असलेले भारत व पाकिस्तानचे संघ हे ९ जूनला आमने सामने येणार आहेत. जगभरात या देशांदरम्यान कुठेही क्रिकेटचा सामना असला तरी गर्दीचा उच्चांक असतो. त्यामुळे येथे होणाऱ्या सामन्यासाठी विशेष प्रयोजन करण्यात आले आहे. हा सामना मैदानाबाहेरील लोकांना पाहता यावा, यासाठी मोठमोठे स्क्रिन्स लावण्यात आले आहेत. तसेच सामना पाहताना विरंगुळा निर्माण होण्यासाठी खास भारतीय व पाकिस्तानी संगीत वाजविण्यात येणार आहे. या सामन्यासाठी भारतीय चाहत्यांमध्ये कमालीचा उत्साह आहे. भारतीय चाहत्यांना मैदानावर पोहचण्यासाठी विशेष बसेसचे देखील आयोजन केले असल्याचे श्री. सावंत यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com