जिल्ह्यात अतिसार नियंत्रण अभियान

जिल्ह्यात अतिसार नियंत्रण अभियान

जिल्ह्यात अतिसार नियंत्रण अभियान
डॉ. सई धुरीः बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्याचे उद्दिष्ट
सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. ६ः राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे अर्भक व बालमृत्यू दर कमी करणे हे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. देशात पाच वर्षांपर्यंतच्या बालमृत्यूमागे अतिसार हे प्रमुख कारण असून, ५ ते ७ टक्के बालके अतिसारामुळे दगावतात. त्यामुळे होणाऱ्या बालमृत्यूचे प्रमाण शून्यावर आणणे, हे विशेष अतिसार नियंत्रण पंधरवडयाचे उद्दिष्ट आहे. या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यात विशेष अतिसार नियंत्रण पंधरवडा ६ ते २१ जून या कालावधीत राबविण्याचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी यांनी दिली.
यामध्ये सर्व आरोग्य केंद्र व अंगणवाडीमध्ये ''ओआरएस'' व झिंक कॉर्नर स्थापन करण्यात येणार आहे. याद्वारे गृहभेटी देऊन बालकांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. बालकांमध्ये अतिसार आजारादरम्यान ''ओआरएस''चे महत्त्व व ''ओआरएस'' बनविण्याचे प्रात्यक्षिक दाखवून घरोघरी आरोग्य शिक्षण देण्यात येणार आहे. दुर्गम भाग, पूरग्रस्त भाग व जोखीमग्रस्त भागातील बालकांवर प्राधान्याने लक्ष देण्यात येईल. अतिसार पंधरवड्याअंतर्गत ए.एन.एम. त्यांच्या उपकेंद्रामध्ये व ग्राम आरोग्य पोषणदिनी मातांना विशेषतः ५ वर्षांवरील बालकांच्या मातांना अतिसाराचा प्रतिबंध आणि व्यवस्थापन याविषयी माहिती देणार आहेत. अतिजोखमीचे भाग जसे की, दुर्गम भाग, डोंगराळ भाग, पूरग्रस्त भाग, तात्पुरत्या स्वरुपातील वस्ती, मागील दोन वर्षे अतिसाराची साथ लागलेले क्षेत्र, पाणीपुरवठा व स्वच्छतेचा अभाव असलेल्या क्षेत्राचा कृती आराखडा तयार करून अतिसार उपचारासाठी ओआरएस व झिंक पुरवठ्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. सर्व शाळा व अंगणवाडी केंद्रांमध्ये हात धुण्याच्या टप्प्याविषयी प्रात्यक्षिक व स्वच्छतेबाबत माहिती देण्यात येईल.
अतिसार टाळण्याकरिता पिण्यासाठी पाण्याचा वापर उकळून करणे, उघड्यावरील अन्नपदार्थ खाण्याचे टाळणे, वैयक्तिक शौचालयाचा वापर करणे, ग्रामपंचायत स्तरावर सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांचे नियमित निर्जंतुकीकरण करणे, जेवणापूर्वी साबणाने स्वच्छ हात धुणे याबाबत ग्राम आरोग्य स्वच्छता व पोषण समितीची सभा घेऊन आवाहन करण्यात येणार आहे. या पंधरवड्यादरम्यान जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्थांमध्ये अतिसार प्रतिबंधात्मक संदेश असणारे बॅनर, आशा सेविकांसाठी गृहभेटी दरम्यान वापरण्यासाठी लिफ्लेट उपलब्ध करून देऊन अतिसार नियत्रणांबाबत जनजागृती करण्यात येईल. अतिसार दरम्यान बालक अधिक आजारी होत असेल, स्तनपान करू शकत नसेल, शौचामध्ये रक्त पडत असेल, कमी पाणी पित असेल, ताप येत असेल तर अशावेळी संबंधित बालकाला त्वरित नजीकच्या आरोग्य संस्थेत दाखल करण्यात यावे, असे आवाहन करण्यात येत आहे. या कार्यक्रमाचे संनियंत्रण जिल्हास्तरीय अधिकारी, तालुका स्तरावर तालुका आरोग्य अधिकारी, प्राथमिक केंद्र वैद्यकीय अधिकारी हे क्षेत्रभेट देऊन करणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com