रत्नागिरी-सुधारित बातमी

रत्नागिरी-सुधारित बातमी

रत्नागिरी, राजापूरवर भाजपचा दावा
नीतेश, नीलेश राणे यांचे ट्विट ः महायुतीत संघर्षाची चिन्हे
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ६ : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात भाजपचे नेते नारायण राणे यांनी बाजी मारत राजकीय दबदबा निर्माण केला. याला दोन दिवस होत नाहीत तोवर रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर आणि रत्नागिरी विधानसभा मतदारसंघावर भाजपने दावा केला आहे. तसे ट्विट नीतेश आणि नीलेश राणे यांनी केले. महायुतीला धक्का देणाऱ्या या ट्विटमुळे जोरदार राजकीय वातावरण तापले आहे.
नारायण राणे यांच्या विजयाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाजपला चांगलीच ऊर्जा मिळाली. सिंधुदुर्गच्या मतांनी तारल्यामुळेच राणे विजयी झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट दिसत आहे. महायुती म्हणून नारायण राणे यांना रत्नागिरी, चिपळूण मतदारसंघातून मताधिक्याची अपेक्षा होती. त्यात शिवसेनेचे विद्यमान उद्योगमंत्री आणि पालकमंत्री उदय सामंत यांच्या रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून तरी चांगले मताधिक्य मिळेल, अशी राणेंची अपेक्षा होती; परंतु रत्नागिरीतून १० हजार तर चिपळूणमधून १९ हजारांनी राणे पिछाडीवर आहेत. महायुती म्हणून राणेंना याचे शल्य आहे. राजापूर विधासभा मतदारसंघातून चांगले मतदान राणेंना झाले आहे; मात्र या निवडणुकीवर प्रतिक्रिया देताना दगाफटका देणाऱ्यांची विधानसभा निवडणुकीत परतफेड करू, असा थेट इशारा राणेंनी दिला होता.
या विजयाच्या गुलालाचा रंग जाण्याआधीच काल आमदार नीतेश राणे यांनी ट्विट करून राजापूर विधासभेवर भाजपने दावा केला आहे. याला काही अवधी जातो न जातो तोवर माजी खासदार नीलेश राणे यांनी ट्विट केले की, राजापूरच नाही तर रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ पारंपरिक भाजपचा आहे आणि तो आम्हाला परत मिळावा आणि तो आम्ही घेणार. विधानसभेवर दावा केल्याने जिल्ह्यात भाजप-शिवसेना शिंदे गटात राजकीय ठिणगी पडली आहे. त्यामुळे आगामी काळात महायुतीत जमवून घेतले जाणार की, महायुतील दोन्ही पक्षाचे येथील संबंध अधिक ताणले जाणार, हे पाहावे लागणार आहे.

कोट
मतदारसंघ कुणाला सोडायचा, कोण उमेदवार असेल हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपमधून देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीकडून अजित पवार ठरवतात. लोकशाहीमध्ये कोणालाही कुठलाही मतदारसंघ मागण्याचा अधिकार आहे. निर्णय नेतेमंडळी घेततात. मी महायुतीतला जबाबदार मंत्री आहे. त्यामुळे मला वाद वाढवायचा नाही. राणे बंधूंच्या मताचा मी आदर करतो. मी प्रामाणिकपणे काम करतो. त्यामुळे मला कोणाच्याही सर्टिफिकेटची आवश्यकता नाही.
- उदय सामंत पालकमंत्री, रत्नागिरी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com