पहिल्याच पावसात चिपळूण तुंबले

पहिल्याच पावसात चिपळूण तुंबले

88592
88625
88626

पहिल्याच पावसात चिपळूण तुंबले
प्रांतांकडून उपाययोजनाच्या सूचना; १०२ मिमी पावसाने त्रेधातिरपीट
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ७ : चिपळूण शहर गुरूवारी (ता. ६) झालेल्या पहिल्याच पावसात तुंबले. त्यानंतर प्रांताधिकाऱ्यांनी तातडीने दखल घेऊन शहराची पाहणी केली. पालिकेने तत्काळ नालेसफाई हाती घ्यावी आणि शहरातील सखल भागात साचणाऱ्या पाण्याचा तातडीने निचरा होण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना दिल्या.
चिपळूण शहरातून जाणाऱ्या मुंबई-गोवा महामार्गाच्या दोन्ही बाजूने बंदिस्त गटारे बांधण्यात आली आहेत. यातील अनेक गटारे ठिकठिकाणी फुटली आहेत. काही ठिकाणी नाले तुंबले. त्यामुळे महामार्गालगत असलेल्या काही घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले. शहरातील काविळतळी, मार्कंडी, गुहागरनाका, गांधीचौक, खाटीकआळी, परशुराम नगर येथील रस्ते तुंबले. परशुराम नगर येथील चार ते पाच घरात एक ते दीड फूट इतके पाणी घुसल्याने त्या कुटुंबाची धावपळ उडाली. तालुक्यात गुरूवारी १०२ मिमी पावसाची नोंद झाली. या पावसाने चिपळूण शहरातील उपनगर असलेल्या काविळतळी, परशुराम नगर परिसरात चांगलीच धावाधाव उडाली.
शहरातून जाणाऱ्या महामार्गाच्या दोन्ही बाजूला गटारे बांधण्यात आली आहेत तसेच सर्व्हिसरोडचे कामदेखील पूर्णत्वाकडे गेले आहे; परंतु त्या गटारांचे काम किती तकलादू आहे हे पावसाने दाखवून दिले. फरशीतिठा येथील रस्ताही पाण्याखाली होता. नाईक कंपनीच्या परिसरातील रस्त्यावरही पाणी साचले होते. पावसाळ्यापूर्वी शंभर टक्के नालेसफाईचा दावा पालिकेने केला होता. पहिल्याच पावसात शहरातील अनेक नाल्यांमधील पाणी रस्त्यावर आले. शहरातील टाईप शॉपिंगसेंटर, फायरस्टेशन, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर आणि मार्कंडी येथील काही भागात पाणी साचले होते. येथील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर प्रांताधिकारी आकाश लिंगाडे, तहसीलदार प्रवीण लोकरे, पालिकेचे प्रशासकीय अधिकारी अनंत मोरे यांनी या भागाची पाहणी केली. प्रांताधिकारी लिंगाडे यांनी शहरात सखल भागात पाणी साचू नये यासाठी पालिकेला काही सूचना केल्या आहेत.

कोट
मार्कंडीमध्ये नेहमी पाणीच असते. येथील नाले जेसीबीने स्वच्छ करता येत नाहीत. तेथे सफाई कामगार लावून नाले स्वच्छ करण्यात यावेत, अशा सूचना पालिकेला केल्या आहेत. काही ठिकाणी पालिकेने अंडरग्राउंड नाले बांधले पाहिजेत. या पावसात कुठेही पाणी साचणार नाही याची पालिकेने दक्षता घ्यावी, अशा सूचना केल्या आहेत.
- आकाश लिंगाडे, प्रांताधिकारी, चिपळूण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com