शिवरायांवरील पुस्तक प्रदर्शनास
मालवण येथे उत्स्फूर्त प्रतिसाद

शिवरायांवरील पुस्तक प्रदर्शनास मालवण येथे उत्स्फूर्त प्रतिसाद

शिवरायांवरील पुस्तक प्रदर्शनास
मालवण येथे उत्स्फूर्त प्रतिसाद
मालवण : छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० व्या राज्याभिषेक दिनानिमित्ताने काल (ता. ६) सकाळी १०.३० वाजता नगर वाचन मंदिराच्या वाचन कक्षामध्ये शिवरायांवरील विविध लेखकांच्या पुस्तकांचे प्रदर्शन मांडण्यात आले होते. या प्रदर्शनास वाचकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या प्रदर्शनात रणजित देसाई यांचे ‘श्रीमानयोगी’, गुरुनाथ नाईक यांचे ‘छत्रपती’, राजा लिमये यांचे ‘रणराज शिवाजी’, बाबासाहेब पुरंदरे यांचे ‘राजा शिवछत्रपती’, विश्वास पाटील यांचे ‘महासम्राट’, बा. सी. बेंद्रे यांचे ‘शिवराज्याभिषेक प्रयोग’, नाथमाधव यांचे ‘स्वराज्यावरील संकट’, प्रकाश यादवाडकर यांचे ‘मंत्रयुद्ध’, नयनतारा यांचे ‘कथा शिवरायांच्या’, अनिल माधव दवे यांचे ‘छत्रपती शिवाजी आणि सुराज्य’ यांसारख्या लोकप्रिय पुस्तकांचे प्रदर्शन आकर्षक पद्धतीने मांडले होते. या ग्रंथप्रदर्शनाचे उद्‍घाटन दीपप्रज्वलन आणि छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून ग्रंथालयाचे नियमित वाचक यशराज मोरे व मयुरेश सारंग यांच्या हस्ते करण्यात आले. या ग्रंथप्रदर्शनाचा लाभ बहुसंख्य शिवप्रेमी वाचकांनी घेतला.


बालकामगार विरोधी दिनानिमित्त
सिंधुदुर्गात १२ जूनला जनजागृती
सिंधुदुर्गनगरी : बालकामगार या सामाजिक अनिष्ट प्रथेचे समूळ उच्चाटन करण्याच्या दृष्टीने समाजामध्ये जागृती होण्यासाठी शासनाच्या विविध विभागांमार्फत प्रयत्न केले जात आहेत. १२ जून जागतिक बालकामगार विरोधी दिनाचे औचित्य साधून सरकारी कामगार अधिकारी, कार्यालयामार्फत जनजागृती कार्यक्रम हाती घेण्यात आले आहेत.
१४ वर्षांखालील बालकास सर्वच व्यवसाय व प्रक्रियांमध्ये काम करण्यास प्रतिबंध करण्यास आलेला आहे. १४ ते १८ वयोगटातील किशोरवयीन बालकास धोकादायक व्यवसाय व प्रक्रियांमध्ये कामगार ठेवणे हा फौजदारी गुन्हा आहे. फौजदारी गुन्ह्यासाठी सहा महिने ते दोन वर्षांपर्यंत वाढविता येईल इतक्या तुरुंगवासाची शिक्षा किंवा किमान २० हजार व कमाल ५० हजार इतका दंड किंवा दोन्हीही शिक्षा मालकास होऊ शकतात. गुन्ह्याची पुनरावृत्ती झाल्यास किमान एक वर्ष ते तीन वर्षांपर्यंत वाढविता येईल इतकी तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. सर्व औद्योगिक संघटना, असोसिएशन, व्यापारी असोसिएशन, क्रिडाई बांधकाम व्यवसायातील मालक असोसिएशन व वीटभट्टी असोसिएशन, सर्व शासकीय, निमशासकीय संस्था नागरिक यांनीही या अनिष्ट प्रथेचे उच्चाटन करण्याकरिता जनजागृती करून या मोहिमेत सहभाग नोंदवावा व आपला जिल्हा बालकामगार मुक्त करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन सरकारी कामगार कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.

शासकीय वसतिगृहात
मोफत प्रवेशासाठी आवाहन
सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात सामाजिक न्याय विभागांतर्गत मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, मालवण, कणकवली व वेंगुर्ले अशा तीन ठिकाणी तसेच मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, मालवण, कणकवली, सावंतवाडी, वेंगुर्ले व देवगड अशा पाच ठिकाणी आहेत. या आठ शासकीय वसतिगृहांमध्ये विद्यार्थी, विद्यार्थिनींना २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी मोफत प्रवेशाची संधी उपलब्ध झालेली आहे. या वसतिगृहामध्ये आठवी ते बारावीचे वर्ग सुरू झाले आहेत. तरी मागासवर्गीय मुलांमुलींच्या शासकीय वसतिगृहातील रिक्त असणाऱ्या जागेवर प्रवेश प्रक्रियेबाबत विद्यार्थी, विद्यार्थिनींकडून ऑफलाईन पद्धतीने अर्जाची नोंदणी करण्यात येत आहे. मागासवर्गीय गरजू विद्यार्थी, विद्यार्थिनींना वसतिगृह प्रवेश अर्ज विनामूल्य प्राप्त करून घेण्यासाठी कार्यालयीन वेळेत संबंधित वसतिगृहातील गृहपाल, अधीक्षिका व सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, सिंधुदुर्ग यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त संतोष चिकणे यांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com