खारेपाटण सरपंच स्वार्थासाठी 
भाजपमध्ये ः मंगेश गुरव

खारेपाटण सरपंच स्वार्थासाठी भाजपमध्ये ः मंगेश गुरव

88725

खारेपाटण सरपंच स्वार्थासाठी
भाजपमध्ये : मंगेश गुरव

ग्रामस्थांशी विश्वासघात केल्याचा आरोप

सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. ७ ः खारेपाटण सरपंच सौ. प्राची ईसवलकर यांचा अचानकपणे भाजपमध्ये प्रवेश हा त्यांच्या व्यक्तिगत स्वार्थासाठी झाला आहे. पैशाच्या आमिषाने त्यांनी भाजपमध्ये पक्षांतर केले आहे, अशी टीका शिवसेनेचे उपतालुका प्रमुख मंगेश गुरव यांनी केली.
खारेपाटण (ता. कणकवली) गावच्या शिवसेना शिंदे गटाच्या विद्यमान सरपंच सौ. ईसवलकर लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होताच आमदार नीतेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत कणकवली येथे भाजपमध्ये प्रवेश केला. याबाबत प्रतिक्रिया देताना शिवसेना कणकवली उपतालुका प्रमुख गुरव यांनी खारेपाटण शिवसेना पक्ष कार्यालयात तातडीची पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली. याबाबत त्यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे, ‘‘महायुतीचा घटक पक्ष असलेल्या शिवसेनेच्या सरपंचांचा भाजपमध्ये प्रवेश करून घेणे म्हणजे खारेपाटणवासीयांचा विश्वासघात केल्यासारखे आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंचपदाच्या भाजप उमेदवाराचा दारुण पराभव करीत शिंदे गट शिवसेनेने खारेपाटण सरपंच आपल्या मेहनतीने निवडून आणला होता. त्याचे शल्य स्थानिक आमदार व विभागातील कार्यकर्त्यांना होते. त्यामुळे खारेपाटणमधील विकासकामांचे प्रस्ताव जाणीवपूर्वक अडविले जात होते. इतकेच काय तर गेली अनेक वर्षे सुरू असलेला खारेपाटण तालुक्याचा प्रस्तावही मंत्रालय स्तरावर भाजपने अडवून ठेवल्याची माहिती तालुका समितीकडे आहे. अशा प्रकारे खारेपाटणला विकासापासून वंचित ठेवणाऱ्या भाजपमध्ये प्रवेश करताना खारेपाटण सरपंच ईसवलकर यांनी विकासासाठी पक्षांतर केले असे म्हणणे हास्यास्पद आहे. स्वतःचा आर्थिक फायदा व कुटुंबीयांच्या विकासासाठी केलेला हा प्रवेश असल्याने एकप्रकारे तमाम खारेपाटणवासीयांच्या भावनेला तडा देणे व ग्रामस्थांच्या आणि कार्यकर्त्यांच्या पाठीत खंजीर खूपसण्यासारखे आहे.’’ १५ वर्षांपासून भाजप दबावाचे राजकारण करीत आहे. भाजपच्या सर्व स्थानिक पदाधिकारी नेत्यांना आव्हान आहे की, जर हिंमत असेल तर सरपंचांनी राजीनामा देत पुन्हा निवडून येऊन दाखवावे. याबाबत शिवसेना नेते व मार्गदर्शक किरण सामंत व जिल्हाप्रमुख संजय आंग्रे यांच्याशी चर्चा करून पुढील भूमिका स्पष्ट करू, असेही त्यांनी म्हटले आहे. यावेळी शिवसेना शिंदे गटाचे खारेपाटणमधील कार्यकर्ते व ग्रामपंचायत सदस्य गुरुप्रसाद शिंदे, सुधाकर ढेकणे, सौ. अस्ताली पवार, मंगेश ब्रम्हदंडे, सुहास राऊत आदी उपस्थित होते.
---
८८७२६

माझा भाजपमध्ये पक्षप्रवेश
खारेपाटणच्या विकासासाठी

सौ. प्राची ईसवलकर ः पराभव पत्करलेल्यांनी राजीनामा मागणे हास्यापद

सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. ७ ः भाजपमध्ये झालेला पक्ष प्रवेश हा पैशाच्या हव्यासापोटी किंवा वैयक्तिक स्वार्थासाठी तसेच कुणाच्या सांगण्यावरून किंवा दबावाखाली झालेला नाही. खारेपाटणचा विकास मागील १० वर्षांत खुंटल्याने त्याला चालना मिळण्यासाठी आमदार नीतेश राणे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन हा प्रवेश केल्याची प्रतिक्रिया खारेपाटण सरपंच सौ. प्राची ईसवलकर यांनी दिली.
सरपंच ईसवलकर यांनी नुकताच आमदार राणे यांच्या उपस्थित कणकवली येथे भाजप पक्षात जाहीर प्रवेश केला होता. याबाबत टीका करताना शिंदे गट कणकवली उपतालुका प्रमुख मंगेश गुरव यांनी खारेपाटण सरपंच यांचा भाजप प्रवेश हा व्यक्तिगत स्वार्थासाठी व पैषाच्या हव्यसापोटी झाल्याचे वक्तव्य केले. याला सौ. इसवलकर यांनी प्रसिद्धीपत्रकातून प्रत्युत्तर दिले आहे. पत्रकात म्हटले आहे की, ‘गुरव यांनी आपल्या मूळ गावी हातदे येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन निधी आणला. मात्र, खारेपाटण गावासाठी निधी आणला नाही. ही येथील जनतेशी केलेली गद्दारी नाहीतर काय म्हणावे? श्री. शिंदे मुख्यमंत्री असतानाही खारेपाटण तालुक्याचा प्रस्ताव मंत्रालयात प्रलंबित आहे व गावची विकासकामे स्थानिक आमदारांकडून अडविली जातात, असे म्हणणे यातून गुरव यांची राजकीय अपरिपक्वता दिसून येते. ज्यांना स्वतः ग्रामपंचायत निवडणुकीत सदस्य पदासाठी दोन वेळा पराभवाचा सामना पत्करावा लागला, अशा व्यक्तींनी माझ्या सरपंचपदाचा राजीनामा मागणे हास्यस्पद आहे. कोणताही विजय हा सांघिक असतो. माझा सरपंचपदाचा झालेला विजय हा माझ्या गावातील ग्रामस्थांनी माझ्यावर दाखवलेला विश्वासाचा विजय आहे. त्यामुळे सरपंचपदाचा राजीनामा देण्याचा प्रश्नच उद्‌भवत नाही. माझ्या दीड वर्षांच्या काळात मुख्यमंत्री शिंदे व आमदार राणे यांच्या माध्यमातून झालेली विकासकामे ही सर्वांच्याच नजरेसमोर आहेत. त्यामुळे मी माझे जुने सहकारी श्री. गुरव यांच्या टीकेला जास्त महत्त्‍व देत नाही. कारण विरोधकांशी संगनमत करून पर्यायी ग्रामपंचायत चालवण्याचा त्यांचा हेतू साध्य न झाल्याने व राजकीय, सामाजिक आणि वैयक्तिक आयुष्यात श्री. गुरव हे अपयशी झाल्याने सद्या ते वैफल्यग्रस्थ झालेले आहेत. त्यामुळे श्री देव कालभैरव व श्री धनी रवळनाथ त्याना सुबुद्धी देवो, असे प्रसिद्धी पत्रकात नमूद आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com