पान एक-सिंधुदुर्गात मान्सूनची जोरदार सलामी

पान एक-सिंधुदुर्गात मान्सूनची जोरदार सलामी

सिंधुदुर्गात मॉन्सूनची जोरदार सलामी
विजांचा कडकडाट ः वैभववाडी, देवगडला सर्वाधिक
सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. ७ ः जिल्ह्यात मॉन्सूनने जोरदार सलामी दिली असून विजांच्या लखलखाटांसह गुरुवारी (ता.६) मध्यरात्रीनंतर जिल्ह्यात सर्वत्र जोरदार पाऊस झाला. वैभववाडी आणि देवगडला तर मुसळधार पावसाने रात्रभर झोडपले. आज सकाळपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. सायंकाळी वैभववाडीसह जिल्ह्याच्या काही भागात पुन्हा मुसळधार पाऊस झाला. जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची नोंद वैभववाडीत ६२ मिलिमीटर इतकी झाली आहे.
जिल्ह्यात गुरुवारी सकाळी मॉन्सून दाखल झाला. सकाळी काही भागात हलक्या तर काही भागात जोरदार सरी बरसल्या; परंतु, दुपारनंतर पावसाने उघडीप दिली. सायंकाळी सर्वत्र ढगाळ वातावरण होते. रात्री साडेदहापासून जिल्ह्यात पुन्हा पावसाला सुरूवात झाली. वैभववाडी आणि देवगड तालुक्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले. या दोन्ही तालुक्यात पहाटेपर्यत जोरदार सरी कोसळत होत्या. याशिवाय कणकवली, सावंतवाडी तालुक्यात देखील मॉन्सूनच्या चांगल्या सरी बरसल्या. कुडाळ, सावंतवाडी, मालवण, वेंगुर्ले तालुक्यात देखील मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. आज सकाळपासून पावसाने विश्रांती घेतली असली तरी सर्वत्र ढगाळ वातावरण होते. काही भागात पावसाचा छिडकावा सुरू होता. सायंकाळी वैभववाडीसह जिल्ह्याच्या काही भागात मुसळधार पाऊस झाला.


खरीप हंगामाला आजपासून प्रारंभ
जिल्ह्यात मॉन्सूनने जोरदार सलामी दिल्यामुळे उद्यापासून (ता. ८) खरीप हंगामाला प्रारंभ होणार आहे. उद्यापासून भातरोपवाटिका तयार करण्याच्या कामांना शेतकरी सुरूवात करतील, अशी शक्यता आहे.

खते, बियाण्यांसाठी शेतकऱ्यांची धावपळ
जिल्ह्यात खरीप हंगामात भातपीक लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. दमदार पावसामुळे आज सकाळपासून भातबियाणे आणि खते खरेदीसाठी शेतकऱ्यांनी जिल्ह्यातील विविध कृषी सेवा केंद्र, तालुका खरेदी विक्री संघाच्या केंद्रांवर गर्दी केली होती.

समुद्रात वाहणार वादळी वारे
जिल्ह्यात आजपासून ११ जूनपर्यंत ३५ ते ४५ किलोमीटर प्रतितास या वेगाने वारे वाहणार असून त्याचा वेग ५५ किलोमीटरपर्यंत पोहचण्याची शक्यता आहे. तरी यांत्रिक व यंत्रचलित नौकांनी पावसाळी मासेमारी बंदी कालावधीचे पालन करावे. बिगर यांत्रिकी नौकांनी देखील या कालावधीत खाडी क्षेत्रात किंवा समुद्रात मासेमारीस जाऊ नये. वादळीवारेसह पाऊसाचे हवामान योग्य होईपर्यंत जिल्ह्यातील कोणत्याही नौका वादळी हवामानाच्या या कालावधीत समुद्रात जाणार नाहीत, याबाबत खबरदारी घेण्यात यावी. नौका, जाळी, इंजिन आदी मासेमारी साधने सुरक्षित ठिकाणी ठेवावी. योग्य ती खबरदारी घेण्यात यावी, असे आवाहन सहायक मत्स्यव्यवसाय आयुक्तांनी केले आहे.

कोट
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मॉन्सूनचे आगमन झाले आहे. आजपासून पुढील चार दिवस विजेच्या गडगडाटासह जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. ९, १० व ११ जूनला मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी सतर्क राहावे.
- मच्छिंद्र सुकटे, मुख्य कार्यकारी अधिकारी, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण
----------------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com