पावसाच्या आगमनाने बळीराजा सुखावला

पावसाच्या आगमनाने
बळीराजा सुखावला

पावसाच्या आगमनाने
बळीराजा सुखावला
दोडामार्ग ः तालुक्यात शुक्रवारी (ता. ७) सायंकाळी पावसाला सुरुवात झाली. मॉन्सूनच्या पावसाचे आगमन झाल्याने बळीराजा सुखावला आहे. काल मृग नक्षत्राची सुरुवात होताच पावसाने हजेरी लावली. पहाटेपासूनच तालुक्यात पावसाच्या हलक्या सरी बरसण्यास सुरुवात झाली; मात्र सकाळी ९ च्या दरम्यान पाऊस थांबला. दिवसभर ऊन-पावसाचा लपंडाव सुरू होता. सायंकाळी ६ च्या सुमारास मेघगर्जनेसह जोरदार पावसाला सुरुवात झाली. अचानक आलेल्या पावसामुळे सर्वांची तारांबळ उडाली. काही दुचाकीस्वारांनी रेनकोट परिधान करत पावसात भिजण्यापासून बचाव करून घेतला, तर काहीजण पावसात भिजले. शेतीकामांची लगबग याच नक्षत्रापासून सुरू होते. कधीकधी मॉन्सून लांबणीवर जातो; मात्र यंदा वेळीच हजेरी लावल्याने बळीराजा आनंदीत झाला आहे.
---
अणसूर येथे उद्या
‘कर्ण दिग्विजय’
वेंगुर्ले ः आनंद गावडे मित्रमंडळ व अणसूर ग्रामस्थांच्या वतीने अणसूर येथील श्री देवी सातेरी मंदिर येथे सोमवारी (ता. १०) सायंकाळी ७.३० वाजता ‘कर्ण दिग्विजय’ या संयुक्त दशावतार नाट्यप्रयोगाचे आयोजन केले आहे. यामध्ये गणपती-अक्षय देसाई, रिद्धी-सिद्धी-दिनेश मांजरेकर, भीष्म-यशवंत तेंडोलकर, शकुनी-प्रथमेश खवणेकर, दुर्योधन-प्रशांत मयेकर, कर्ण-गौरव शिर्के, राजा द्रुपद-उदय मोर्ये, इंद्र-आबा कलिंगण, रेवती-सुधीर तांडेल, बलराम-सुहास गावडे, कृष्ण-संजय काळे, प्रद्युम्न-सागर गावकर व सांब-महेंद्र कुडव यांच्या भूमिका आहेत. नाट्यप्रयोगाला मयूर गवळी (हार्मोनियम), चंद्रकांत खोत (पखवाज) व राजू कलिंगण (तालरक्षक) यांची संगीतसाथ आहे.
-----------
‘विसर्जन स्थळाचे
मजबुतीकरण करा’
सावंतवाडी ः आरोंदा-सावरजुवा येथील खाडीपात्रात अवैध वाळू उत्खननामुळे किनाऱ्यालगत बांधलेल्या गणपती विसर्जनस्थळाचे मोठे नुकसान झाले आहे. सावरजुवा येथील गणपती विसर्जनस्थळाच्या सिमेंट काँक्रीटच्या पायऱ्या पूर्णपणे निखळल्या आहेत. त्यामुळे यावर्षीच्या गणेशोत्सवात गणपती विसर्जनावेळी भाविकांना अनेक अडचणी येणार आहेत. संबंधित प्रशासनाने तत्काळ जागेची पाहणी करून गणपती विसर्जनस्थळाचे नव्याने मजबुतीकरण करावे, अशी मागणी तेथील सामाजिक कार्यकर्ते संदेश परब, भाई देऊलकर यांनी केली आहे. अवैध वाळू उत्खनन करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी महसूल विभागाकडे केल्यानंतर प्रशासनाने कारवाई केली होती; परंतु मोठ्या प्रमाणात वाळू उत्खनन होऊन त्याचा गणपती विसर्जन स्थळाकडून वाहतूक करताना बांधकामाला धोका निर्माण झाला आहे.
------------
ठाणे येथे आज
पुस्तकांचे प्रकाशन
कणकवली ः डॉ. महेश केळुस्कर यांच्या चार पुस्तकांचे प्रकाशन कादंबरीकार विश्वास पाटील यांच्या हस्ते उद्या (ता. ९) सायंकाळी ५.३० वाजता ठाणे येथील मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या सरस्वती सभागृहात होणार आहे. डॉ. केळुस्कर यांचा ‘बुक्के’ हा हास्यलेख संग्रह, ‘जहरमाया’ हा काव्यसंग्रह आणि ‘ग्रंथोपजीविये’ हे ललित गद्य तसेच ‘नभोनाट्य आणि रुपक’ या पुस्तकांचे प्रकाशन होणार आहे. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ लेखक, समीक्षक डॉ. अनंत देशमुख, लेखक तथा पत्रकार श्रीकांत बोजेवार उपस्थित राहणार आहेत. साहित्यप्रेमींनी उपस्थित राहण्याचे आवाहन विद्याधर ठाणेकर, शरदराव मराठे, गिरीश शिंदे, प्रा. डॉ. संतोष राणे यांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com