राणे बंधूचे दावे गैरसमजुतीतून

राणे बंधूचे दावे गैरसमजुतीतून

-rat७p२६.jpg-
P२४M८८६८८
उदय सामंत.
---------------------

राणे बंधूंचे विधानसभेवरील दावे गैरसमजातून

उदय सामंत ः येत्या निवडणुकीत पिछाडीची परतफेड

सकाळ वृत्तसेवा ः
रत्नागिरी, ता. ८: रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात आपण महायुतीचे प्रामाणिकपणे काम केले. या ठिकाणी मताधिक्य घेण्यात अपयश आले असले तरी आगामी विधानसभा व अन्य निवडणुकांमध्ये त्याची परतफेड करू. नीलेश राणे व नीतेश राणे यांचे काही गैरसमज झाले आहेत. त्यामुळे त्यांनी रत्नागिरी विधानसभेवर दावा केला; परंतु लवकरच तो दूर होईल. माझ्यासाठी हा विषय संपला असून, यापुढे आपण या विषयावर बोलणार नाही, अशी भूमिका पालकमंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केली.
आपण महायुतीतील एक जबाबदार मंत्री आहोत. भविष्यात महायुती म्हणूनच निवडणुका लढल्या जाणार आहेत. त्यात मिठाचा खडा पडणार नाही याची खबरदारी सर्वांनी घेतली पाहिजे, असेही सामंत म्हणाले. रत्नागिरी विधानसभा मतदार संघात महायुतीचे उमेदवार नारायण राणे पिछाडीवर राहिल्याने नीतेश राणे व नीलेश राणे यांनी सामंत यांना टार्गेट केले होते. त्यानंतर आज हॉटेल विवेकमध्ये पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
सामंत म्हणाले, रत्नागिरीतील मताधिक्क्याबाबत आपण भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, रत्नागिरीची जबाबदारी असणारे बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांच्याशी चर्चा करून मत मांडले आहे. नारायण राणे हे पन्नास हजार मतांनी विजयी झाले आहेत. रत्नागिरीसह सिंधुदुर्गतील पदाधिकारी व शिवसैनिकांनीही त्यांचे प्रामाणिक काम केले. काही व्यक्ती गैरसमाजाचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. नीलेश व नितेश राणे यांचे गैरसमज लवकरच दूर होतील. येत्या काही दिवसांमध्ये पदवीधर निवडणूक असल्याने त्याचे परिणाम आपण या निवडणुकीवर होऊ देणार नाही.
महायुतीच्या घरातील हे भांडण आहे. आम्ही आपसात बसून ते मिटवू. त्यामुळे हा विषय खिलाडूवृत्तीने बघून त्यातून मार्ग काढला जाईल. खासदार नारायण राणे यांना आपण स्वत: भेटणार आहोत. त्यांच्यासोबत आपण वाड्यावस्तांवर फिरलो आहे. ही कटुता फारकाळ राहणार नाही असे सामंत यांनी सांगितले.
माझा मतदार संघ मागण्याचा त्यांना अधिकार आहे. लोकशाहीने त्यांना तो दिला आहे. या मतदार संघात सुमारे २७ हजार मुस्लिम मतदार आहेत. त्यापैकी ८० ते ९० टक्के मतदान महाविकास आघाडीला झाले. मुस्लिम समाजात महाविकास आघाडीने पसरवलेले गैरसमज दूर करण्यात आम्हाला अपयश आले.
---------------
चौकट
भैय्यांविरुद्ध पुरावे असल्यास कारवाई

किरण उर्फ भैय्या सामंत हे उद्धव ठाकरे किंवा रश्मी ठाकरे यांना निवडणूक काळात भेटले, असा आरोप होत आहे. यावर उत्तर देताना सामंत म्हणाले, किरण सामंतांबद्दल त्यांच्याकडे पुरावे असतील तर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांना द्यावेत. त्यांचे आरोप योग्य असतील तर पक्षप्रमुख एकनाथ शिंदे पक्षांतर्गत कारवाई करतील असे उदय सामंत यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com