‘जल जीवन’वरून बांद्यात खडाजंगी

‘जल जीवन’वरून बांद्यात खडाजंगी

88872

‘जल जीवन’वरून बांद्यात खडाजंगी

ग्रामसभा गाजली; कचरा प्रश्न, पीक नुकसान भरपाईसह इतर प्रश्‍नांवर बोट

सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. ८ ः बांदा ग्रामपंचायतीच्या तहकूब ग्रामसभेत जल जीवन मिशन योजनेच्या कामावरून सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांत जोरदार खडाजंगी झाली. या वेळी सरपंच प्रियांका नाईक व ग्रामपंचायत सदस्य साईप्रसाद काणेकर यांच्यात शाब्दिक चकमक उडाली.
बांदा ग्रामपंचायतीची ३० मेची तहकूब ग्रामसभा आज सरपंच प्रियांका नाईक यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या वेळी ग्रामपंचायत सदस्य आबा धारगळकर, रत्नाकर आगलावे, प्रशांत बांदेकर, साईप्रसाद काणेकर, दीपलक्ष्मी सावंत, देवल येडवे, शिल्पा परब, श्रेया केसरकर, ग्रामविस्तार अधिकारी लीना मोर्ये आदी उपस्थित होते.
सुरुवातीला शासनाच्या परिपत्रकांचे वाचन करण्यात आले. त्यानंतर शहरातील विविध समस्यांच्या अनुषंगाने चर्चा करण्यात आली. या वेळी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष अन्वर खान यांनी कृषी विभागाने पाठविलेल्या पत्रातील मुद्यांवर बोट ठेवत मागच्या वेळी पिकांच्या नुकसान भरपाईबाबत काय कार्यवाही झाली? असा प्रश्‍न उपस्थित केला; मात्र या ग्रामसभेला कृषी विभागाचे अधिकारीच उपस्थित नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली.
फिरोज खान यांनी आमच्या प्रभागामधील कचरा का उचलला जात नाही? असा प्रश्‍न करीत या प्रभागात पसरलेल्या घाणीच्या साम्राज्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. काही ठिकाणी मातीच्या भरावामुळे गटाराचे पाणी साचून राहत असल्याने दुर्गंधी व डासांचा त्रास होत असल्याचे सांगत तत्काळ यावर उपाययोजना करण्याची मागणी केली. संपूर्ण बांदा शहरात ओला कचरा व सुका कचरा वर्गीकरणासाठी कचरा कुंड्या घरोघरी देण्यात आल्या; मात्र आमच्या वॉर्डमध्ये त्या दिल्या नसल्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर आचारसंहितेमुळे त्या देण्यास विलंब झाला असून, लवकरच त्या देऊ, असे सरपंच श्रीमती नाईक यांनी स्पष्ट केले.
अमृता महाजन यांनी रामनगर येथील चार महिन्यांपासून उद्भवत असलेल्या पाणीटंचाईच्या समस्येबाबत प्रश्न उपस्थित केला. यावर धारगळकर यांनी, आज कोणीतरी अज्ञाताने वॉल बंद केल्याने पाणी आले नसल्याचे सांगितले. कमी खर्चात काम करणारा ठेकेदार मिळाल्यास सार्वजनिक विहिरीची साफसफाई करण्यात येईल, अशी ग्वाही दिली. माजी ग्रामपंचायत सदस्य गजानन गायतोंडे यांनी ‘जल जीवन’साठीचा आराखडा दाखविण्याची मागणी केली. यावेळी आराखडा अद्याप उपलब्ध झाला नसल्याचे सांगितले गेल्याने उपस्थितांनी आराखड्याशिवाय कामाला परवानगी कशी काय दिली? असा प्रश्‍न उपस्थित केला. यावेळी ‘जल जीवन’चे काम बांद्यात पूर्ण झाले का, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. यावेळी बांद्यातील काहीजणांनी हे काम रोखल्याने या योजनेचे काम रखडले, असे सरपंच नाईक यांनी सांगितले. यावर साईप्रसाद काणेकर यांनी काम का रोखले जातेय याची माहिती घ्या. नियमबाह्य कामामुळे रस्त्याची दुरवस्था होणार आहे. याच रस्त्यावरून विद्यार्थ्यांनी प्रवास करायचा का? अपघात झाल्यास जबाबदार कोण? असा प्रश्‍न उपस्थित केला. दरम्यान, मी बांदावासीयांसाठी प्रामाणिक काम करतेय, असे सरपंच नाईक यांनी सांगताच काणेकर यांनी, आम्ही लोकांसाठी काम करत नाही का? असा प्रतिसवाल केल्याने शाब्दिक चकमक झाली. या ग्रामसभेतही येथील उड्डाण पुलाच्या कामाबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आला. संबंधित विभागाने गटारावर फूटपाथ बांधण्याचे मान्य केले असताना अद्याप त्याची पूर्तता केलेली नाही. त्यामुळे संबंधित ठेकेदारांना नोटीस देऊन त्यांच्याकडून आर्थिक दंड वसूल करण्याची मागणी करण्यात आली.
...............
चौकट
आपत्कालीन बैठकीच्या आयोजनाची मागणी
पूरस्थितीवेळी रात्रीच्यावेळी पाणी येत असल्याने नागरिकांना माहिती मिळावी, यासाठी सायरन व इतर बाबींची पूर्वतयारी करा. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ध्वनीप्रक्षेपकाद्वारे नागरिकांना सतर्क करण्यासाठी प्रयत्न करावेत. जीवरक्षक असलेल्यांचे मोबाईल नंबर लोकांपर्यंत पोहोचवावेत, अशी मागणी ज्येष्ठ नागरिक संघाचे अन्वर खान, तुळशीदास धामापूरकर यांनी केली. आपत्कालीन बैठकीचे आयोजन करण्याची मागणीही या ग्रामसभेत करण्यात आली. बांदा ग्रामपंचायत हद्दीत उड्डाण पुलाच्या कामासाठी उभारलेल्या प्लान्टमधून कर वसुली होतेय का? असा प्रश्नही उपस्थित केला. तसेच या ठिकाणाहून खनिज वाहतूक, वाळू व इतर वाहतूक करणाऱ्या वाहनांकडून कर वसुलीची प्रक्रिया राबवावी, अशी सूचना करण्यात आली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com