टर्मिनल बिल्डिंग उभारणीला लवकरच गती

टर्मिनल बिल्डिंग उभारणीला लवकरच गती

टर्मिनल बिल्डिंग उभारणीला लवकरच गती
रत्नागिरी विमानतळ; ठेकेदार नियुक्तीची प्रक्रिया पूर्ण
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ९ ः रत्नागिरी विमानतळावरून प्रवासी वाहतूक सुरू करण्यासाठी टर्मिनल बिल्डिंग उभारणे आवश्यक आहे. हे काम विमानतळ प्राधिकरणाने काढलेल्या निविदाप्रक्रियेद्वारे न्याती इंजिनअर्स अॅण्ड कन्सल्टंट्स प्रा. लिमिटेडला (एनईसीपीएल) मिळाले आहे. त्यामुळे प्रवासी वाहतुकीसाठी आवश्यक सुविधा उभारणीच्या कामाला गती येणार आहे.
मिरजोळे गावातील रत्नागिरी विमानतळ हे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या एमआयडीसी मालकीचे आहे. सध्या ते भारतीय तटरक्षक दलाकडे आहे. महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनीद्वारे (एमएडीसी) ३२०० चौरस मीटर क्षेत्रफळात पसरलेल्या परिसरात नवीन पॅसेंजर टर्मिनल बिल्डिंग, लिंक टॅक्सी वे आणि दोन एटीआर-७२ प्रकारची विमाने उतरण्यासाठी सक्षम प्रणाली विकसित केली जात आहे. मार्च २०२४ मध्ये विविध बांधकामासाठी ५०.५२ कोटी रुपये शासनाने मंजूर केले आहेत तसेच महाराष्ट्र एअर डेव्हलपमेंट कंपनीने (एमएडीसी) ५४० दिवस (१. ४७ वर्षे) बांधकामासाठी मुदत दिली आहे. त्यासाठी काढण्यात आलेल्या निविदेला सातजणांचा प्रतिसाद लाभला. त्यापैकी फुलारी रियल्डी, नेश ऑर्किटेक्स आणि एससीसी इन्फ्रास्ट्रक्चर या ३ कंपन्यांच्या सादर केलल्या निविदा तांत्रिकदृष्ट्या अपात्र ठरल्या. या प्रक्रियेत न्याती कंपनी पात्र ठरल्यामुळे रत्नागिरी विमानतळाचे पॅसेंजर टर्मिनल बिल्डिंग आणि संबंधित पायाभूत सुविधांच्या कामाला गती मिळणार आहे.
रत्नागिरी विमानतळावर आता ढगाळ वातावरणातही विमान सुरक्षित लॅंडिंग (उतरणे) होणे आता सोपे होणार आहे. त्यासाठी अत्याधुनिक डॉपलर व्हेरिपाय ओमनीरेंज (डी-व्हीओआर) ही यंत्रणा रत्नागिरी विमानतळावर बसवली जाणार आहे. विमानतळासाठी आणखी १७ एकर जमीन संपादित केली आहे. अनेकदा ढगाळ वातावरण असेल तर वैमानिक धोका न पत्करता लँडिग टाळतो आणि नियोजित विमानतळाऐवजी अन्य जवळच्या विमानतळावर सुरक्षित विमाने उतरवली जातात. कोकणात पावसाळ्यात अनेकवेळा ढगाळ वातावरण असते अशावेळी विमान लँडिंग किंवा उड्डाणाला त्याचा फटका बसत असतो. हे टाळण्यासाठी रत्नागिरी विमानतळावर अत्याधुनिक यंत्रणा बसवली जाणार आहे. त्यामुळे विमानतळावरील दृश्यमानता वाढणार असून, वैमानिकाला विमान सुरक्षितपणे उतरवता येणार आहे. या विमानतळासाठी २७ हेक्टर जागेचे भूसंपादन करण्यात आले आहे. आणखी १७ एकर जागा घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे रत्नागिरी येथून प्रवासी वाहतुकीसाठी आवश्यक असणाऱ्या टर्मिनल बिल्डिंगच्या कामाचा मार्ग मोकळा झाला आहे.

चौकट
रात्री विमान उतरण्याची चाचणी
रत्नागिरी विमानतळावर रात्रीच्यावेळी विमान उतरवण्यासाठी आवश्यक चाचण्या काही दिवसांपूर्वी घेण्यात आल्या होत्या. त्यासाठी तज्ज्ञांची मदत घेतली होती. दोनवेळा विमान रात्री उतरवण्यात आले. त्यामुळे भविष्यात २४ तास विमान वाहतूक चालू राहणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com