रत्नागिरी, राजापूर विधानसभा मतदार संघ हा भाजपचाच

रत्नागिरी, राजापूर विधानसभा मतदार संघ हा भाजपचाच

89028

रत्नागिरी, राजापूर विधानसभा मतदारसंघ भाजपचेच
बाळ माने ; राणे बंधूंच्या मागणीला समर्थन, परिवर्तनाचा काळ
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ९ : रत्नागिरी लोकसभा मतदार संघात नारायण राणे यांच्या विजयामुळे रत्नागिरी, राजापूर विधानसभा मतदारसंघात भाजपने दावा केला आहे. गेल्या दहा वर्षांत भाजपची ६५ हजार मते वाढली असून, आज परिवर्तनाचा काळ असल्याने दोन्ही मतदारसंघांवर आमचाच दावा आहे. भाजपने आपला पक्ष वाढविण्यासाठी हा दावा केला असून भाजपला चांगला जनाधार असल्याचे प्रतिपादन माजी आमदार व रत्नागिरी विधानसभा प्रमुख बाळ माने यांनी केला.
बाळ माने यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले, रत्नागिरीत ४५ वर्षानंतर कमळ चिन्हावर निवडणूक भाजपचा हक्काचा खासदार निवडून आला आहे. याबद्दल मी कोकणातील मतदारांचे आभार मानतो. ४५ वर्षांपूर्वी भाजपच्या स्थापनेपूर्वीचा पक्ष म्हणजे जनसंघाचे खासदार म्हणून अॅड. बापूसाहेब परूळेकर या मतदारसंघात निवडून आले होते; परंतु युतीच्या राजकारणात भाजपचा खासदार झाला नव्हता. माजी खासदार नीलेश राणे व आमदार नीतेश राणे यांनी रत्नागिरी व राजापूर विधानसभा मतदार संघ भाजपला मिळावा, असे सांगितले. त्यात गैर काही नाही. मी त्याचे समर्थन करतो.
माने म्हणाले, मोदी सरकार, फडणवीस सरकारने आखलेल्या विकासाच्या योजना तळागाळात पोहोचवण्याचे काम करत आहोत. हा मतदार संघ भाजपचा पारंपरिक मतदारसंघ आहे. यापूर्वी (कै.) कुसुमताई अभ्यंकर, (कै.) शिवाजीराव गोताड आमदार होते. मी १९९९ ते २००४ या काळात आमदार होतो. नंतरच्या निवडणुकीत निसटत्या मतांनी पराभव झाला तरीही गेल्या दहा वर्षांत भाजपची हक्काची अशी ६० ते ६५ हजार मते मतदारसंघात आहेत. त्यामुळे हा मतदारसंघ भाजपला मिळावा, ही अपेक्षा ठेवणे चूक नाही. हा एक व्यूहरचनेचा भाग आहे. रत्नागिरी, राजापूर या दोन्ही जागा आम्ही जिंकू शकतो, असा विश्वास आहे.
रत्नागिरी मतदारसंघात भाजपचा जनाधार चांगल्या पद्धतीने आहे, असा ठाम विश्वास बाळ माने यांनी व्यक्त केला. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, नेते देवेंद्र फडणवीस, मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली दोन वर्षे मेरा बूथ सबसे मजबूत, शतप्रतिशत भाजप, महाविजय २०२४ हे अभियान राबवले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही धोरण ठरवू, नियोजन करू, स्ट्रॅटेजी ठरवू. मी सुद्धा सातत्याने जनतेच्या संपर्कात आहे. भविष्यात भाजपचा उज्ज्वल विजय आहे, असे ते म्हणाले.

चौकट
हे आहे विजयाचे गणित
गेल्या काही निवडणुकांत रत्नागिरीमध्ये १ लाख ६० हजार ते १ लाख ७५ हजार मतदान होते. यात राणे यांचे नेतृत्व, मंत्री चव्हाण यांच्यामुळे सार्वजनिक बांधकाम खात्यातून योजनांचा लाभ व त्यातून वाढलेले मतदान यामुळे लोकसभेला राणे यांना ७५ हजारांचे मतदान झाले आहे. भाजपचे निष्ठावंत, कार्यकर्ते मतदान करत आहेत. विधानसभेला साधारण २० ते २५ हजार मतदान हे नेहमीच हलते राहिले आहे. त्यावर जय-पराजय ठरतो. आमचे भाजपचे मतदार कुठेही गेलेले नाहीत. महायुती असते तेव्हा काहीवेळा मतांचे स्थित्यंतर होते, हे या निवडणुकीत दिसून आले आहे, असे माने म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com