-केंद्राच्या मंत्रीमंडळात कोकण कोरडेच

-केंद्राच्या मंत्रीमंडळात कोकण कोरडेच

केंद्राच्या मंत्रीमंडळात कोकण कोरडेच

राणे, तटकरेंची निराशा ; पाच खासदार आले निवडून

सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १० ः लोकसभा निवडणुकीत भाजपसह महायुतीला दमदार यश मिळवून देणाऱ्या कोकणला केंद्रात एकही मंत्रिपद मिळाले नाही. त्यामुळे केंद्राच्या मंत्रीमंडळात कोकण कोरडेच राहिल्याची प्रतिक्रिया उमटत आहे.
कोकणातून नारायण राणे (रत्नागिरी-सिंधुदुर्ग) डॉ. हेमंत सावरा (पालघर), डॉ. श्रीकांत शिंदे (कल्याण), नरेश म्हस्के (ठाणे), सुनील तटकरे (रायगड) असे महायुतीचे पाच खासदार लोकसभेवर निवडून आले. फक्त भिवंडीत केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांचा पराभव झाला. या निवडणुकीत महायुतीने उद्धव ठाकरे यांच्या कोकणातील वर्चस्वाला महायुतीने दणका दिला. नरेंद्र मोदींच्या दुसऱ्या टर्ममध्ये नारायण राणे राज्यसभेचे सदस्य असताना त्यांना लघु, सुक्ष्म आणि मध्यम खात्याचे कॅबिनेट मंत्री मिळाले होते. मोदींच्या पहिल्या टर्ममध्ये सुरेश प्रभूंना रेल्वे खाते मिळाले होते. नंतर प्रभूंना हटवण्यात आले. सध्या ते राजकारणात सक्रीय नाहीत. यावेळी राणे लोकसभेवर निवडून गेले; पण मंत्रीपदापासून वंचित राहिले. गेल्या वेळी राणे आणि कपिल पाटील असे कोकणातले दोन मंत्री केंद्रात होते.
अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीला मोदी सरकारमध्ये एक राज्यमंत्रीपद देण्याची तयारी भाजपने केली होती. त्यासाठी रायगडचे खासदार सुनील तटकरे यांचे नाव सुरवातीला आघाडीवर होते. नंतर तटकरेंचे नाव मागे पडून प्रफूल्ल पटेल यांचे नाव पुढे आले. त्यामुळे राष्ट्रवादीच्या कोट्यातून मंत्रीपद मिळण्याची आशाही संपली.
लोकसभा निवडणुकीच्या काळात राज ठाकरे यांनी नारायण राणेंच्या प्रचारासाठी कणकवलीत सभा घेतली. या सभेत राणेंच्या मंत्रीपदाचा धागा पकडून राज ठाकरेंनी बाकावर बसणारा खासदार हवाय की मंत्री होऊन निर्णय घेणारा, असा सवाल उपस्थित करीत राणेंना मंत्रीपद मिळण्याचा विश्वास व्यक्त केला होता. ते म्हणाले होते की, केंद्रात नरेंद्र मोदींचे सरकार केंद्रात येईल तेव्हा नारायण राणे त्या मंत्रीमंडळात असतील. मात्र नरेंद्र मोदींच्या तिसऱ्या टर्ममधील मंत्रीमंडळात नारायण राणेंचा पत्ता कट झाला आहे. त्यामुळे राज ठाकरे जे बोलले नेमके त्याच्या उलटच घडल्याची चर्चा रंगली आहे.
---------
कोट
खासदार नारायण राणे यांना मंत्रीपद मिळाले नसले तरी आपल्या केंद्रातील अनुभवातून ते कोकणातील विकास कामे मार्गी लावतील. त्यांनी लोकसभा निवडणुकीदरम्यान विकास कामे पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे. ती कामे पुढील पाच वर्षात पूर्ण होतील.
--बाळ माने, माजी आमदार, भाजप
---------------------
कोट
राज ठाकरे म्हणाले त्याप्रमाणे महायुतीच्या खासदारांवर केवळ बाके वाजवण्याची वेळ येणार आहे. कोकणचा खरा विकास आम्हीच करू. मी खासदार नसलो तरी जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
----विनायक राऊत, माजी खासदार, रत्नागिरी - सिंधुदुर्ग

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com