रस्ता स्थगितीच्या मागणीसाठी उपोषण

रस्ता स्थगितीच्या मागणीसाठी उपोषण

89214

रस्ता स्थगितीच्या मागणीसाठी उपोषण

सिंधुदुर्गनगरीत आंदोलन ः कोंडुरा ते येरम लिंगाचे देवालय प्रश्‍न

सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. १० ः वायंगणी (ता. वेंगुर्ले) ग्रामपंचायतीच्या हद्दीतील खानोली कोंडुरा ते येरम लिंगाचे देवालय या रस्त्याच्या कामाला तत्काळ स्थगिती द्यावी, या मागणीसाठी वायंगणी येथील ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज उपोषण सुरू केले आहे. बेकायदेशीर कारभार करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली.
वायंगणी कोंडुरा येथील कायम रहिवासी असलेल्या ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार तळेकरवाडी येथील काही मिळकती या माडबागायतीच्या आहेत. मच्छीमारी, मोलमजुरीबरोबरच या माडबागायतीवरच त्यांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. त्या मिळकती आतापर्यंत स्थानिक ग्रामपंचायत अथवा अन्य कुठल्याही शासकीय कार्यालयाला कुठच्याही कायदेशीर लेखाने दिलेल्या नाहीत. तसेच त्या मिळकती या सीआरझेड-१ क्षेत्रात समाविष्ट आहेत. खानोली कोंडुरा ते येरम लिंगाचे देवालय या रस्त्याची एकूण लांबी १७०० मीटर एवढी शासन दप्तरी नोंद असताना शासनाचे अधिकारी शेतकऱ्यांवर दबाव तंत्राचा वापर करत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे माडबागायतीला व आमच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. बेकायदेशीर व नियमबाह्य होत असलेल्या रस्त्याबाबत गेल्या चार-पाच वर्षांपासून मुख्यमंत्री यांच्यासह जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, पर्यावरण विभाग, उपविभागीय अधिकारी सावंतवाडी, खनिकर्म विभाग सिंधुदुर्ग अशा सर्व ठिकाणी तक्रार अर्ज देऊन त्यांचे लक्ष वेधले आहे. मात्र, अद्यापपर्यंत कोणतीही कार्यवाही झालेली नाही.
पोलिस संरक्षणाखाली आमच्या माडबागायतीच्या संरक्षणासाठी केलेले कुंपण तोडण्याची धमकी देत आहेत. जर शासनाने या रस्त्यासाठी कायदेशीर बाबींची पूर्तता करून आम्हा शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केलेल्या असतील तर तशी कागदपत्रे जनतेसमोर सादर करावीत. या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने शासनाचा लाखो रुपये निधी खर्च करण्याचा प्रयत्न होत असतानाही जिल्हा प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे. शेतकऱ्यांनी माडबागायतीच्या व अन्य कुठल्याही जमिनी शासनाला कायदेशीरदृष्ट्या दिलेल्या नाहीत व देणारही नाही, असे वारंवार सांगूनदेखील उपअभियंता बांधकाम कुडाळ यांनी १२ एप्रिलला शेतकऱ्यांना पत्र काढून पंधरा दिवसांत अतिक्रमण हटविण्याबाबत कळविले आहे. परंतु, आम्ही शासनाच्या कुठल्याही जागेमध्ये अतिक्रमण केले नसल्याने अतिक्रमण हटविण्याचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे चुकीच्या पद्धतीने पत्रव्यवहार करून प्रशासनाची व आम्हा शेतकऱ्यांची दिशाभूल करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी. तसेच खानोली कोंडुरा ते येरम लिंगाचे देवालय या बोगस रस्त्याच्या कामाला तत्काळ स्थगिती देण्यात यावी, या मागणीसाठी आज वायंगणी येथील नारायण पेडणेकर, प्रशांत पेडणेकर, नीता पेडणेकर, प्रणाली पेडणेकर, योगेश तांडेल यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
-------------
चौकट
चारवेळा उपोषणे; तरीही कार्यवाही नाही
खानोली कोंडुरा ते येरम लिंगाचे देवालय या एकाच रस्त्याच्या दोन निविदा काढून व बोगस प्रस्ताव सादर करून संबंधित खात्याचे अधिकारी प्रशासनाची दिशाभूल करत असल्याबाबत २०१८ पासून प्रशासनाच्या निदर्शनास आणून देत आहे. या रस्त्याच्या कामाचा बोगस प्रस्ताव, एका रस्त्याच्या नावावर दोन निविदा, प्रस्तावावर झालेल्या बोगस सह्या, नियमबाह्य व बेकायदेशीर संमती पत्रे, कायदेशीर संपादित न केलेल्या जागेचा ट्रांजेक्ट वॉक अहवाल, ग्रामपंचायत दप्तरी नोंद न झालेल्या रस्त्याचा समावेश, सीआरझेड १ चे उल्लंघन, शासन नियमांचे उल्लंघन या आणि अन्य बाबींबाबत शासनाचे लक्ष वेधून घेण्याकरिता आतापर्यंत चारवेळा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करूनदेखील या कामाला अद्यापपर्यंत स्थगिती मिळालेली नाही. अद्यापपर्यंत कुठल्याही कायदेशीर बाबींची पूर्तता न करता संबंधित विभागाचे अधिकारी शासनाने प्रस्तावित केलेल्या करोड रुपयांचा निधी डोळ्यासमोर ठेवून हे बोगस काम रेटून नेण्याच्या प्रयत्नात आहेत, असे योगेश तांडेल यांनी यावेळी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com