गट, गणनिहाय पक्ष संघटना वाढीकडे लक्ष द्या

गट, गणनिहाय पक्ष संघटना वाढीकडे लक्ष द्या

गट, गणनिहाय संघटना
वाढीकडे लक्ष द्या
भरत लब्धे ः चिपळुणात काँग्रेसची बैठक
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १० ः जनतेने एकाधिकारशाहीला, फोडाफोडीच्या राजकारणाला नाकारले आहे. जनता महागाई, बेरोजगारीने त्रस्त आहे, हेच यामधून दिसत आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल काँग्रेसजनांचा उत्साह वाढविणारा असून राहुल गांधींच्या ‘भारत जोडो यात्रे’चा प्रभाव या निकालावर दिसून येत आहे. आता सर्व पदाधिकाऱ्यांनी जबाबदारी स्वीकारून गट व गणनिहाय पक्षसंघटन वाढीकडे लक्ष द्यावे, म्हणजे आगामी काळातील निवडणुकीला सक्षमपणे सामोरे जाता येईल, असे आवाहन जिल्हा उपाध्यक्ष भरत लब्धे यांनी केले.
चिपळुणात शनिवारी (ता. ८) काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने जे यश संपादन केले त्याबद्दल महाविकास आघाडीच्या अभिनंदनाचा ठराव काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष भरत लब्धे यांनी मांडला व उपस्थित पदाधिकाऱ्यांनी एकमताने संमती दिली. जिल्हा सेवादलाचे अध्यक्ष तुळशीराम पवार म्हणाले, ‘‘संघटनवाढीला अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. जे पदाधिकारी काम करीत नसतील, त्यांनी स्वखुशीने बाजूला व्हावे.’’ ज्येष्ठ कार्यकर्ते सुरेश पाथरे यांनी ‘भारत जोडो यात्रे’मुळे तरुण काँग्रेसकडे मोठ्या प्रमाणात आकर्षित होत असल्याचे सांगत सरकारने वीज ग्राहकांच्या माथी प्रीपेड मीटर मारण्याचे धोरण स्वीकारले आहे. त्याला कडाडून विरोध केला पाहिजे, असे मत मांडले. या वेळी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष साजिद सरगुरोह, ज्येष्ठ नेते नंदू थरवळ, दादा आखाडे, ओबीसी सेलचे प्रदेश सचिव संजय जाधव, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष महादेव चव्हाण आदी उपस्थित होते.

चौकट
प्रीपेड वीज मीटरविरोधात
लवकरच आंदोलन
सर्वांना त्रासदायक ठरू शकणाऱ्या महावितरण कंपनीच्या प्रीपेड वीज मीटर धोरणाबाबत सुरेश पाथरे, साजिद सरगुरोह माहिती घेत आहेत. यामध्ये काँग्रेसही त्यांच्यासमवेत असून जनतेच्या हितासाठी लवकरच आंदोलनाची दिशा ठरवू, अशी माहितीही भरत लब्धे यांनी दिली.

89244

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com