फसवणूक झाल्यास बॅंकेकडून सहकार्य

फसवणूक झाल्यास बॅंकेकडून सहकार्य

89255


फसवणूक झाल्यास बॅंकेकडून सहकार्य

संजय कुमार ः झाराप येथे ‘टाऊन हॉल’ कार्यशाळेस प्रतिसाद

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १० ः बँकिंग क्षेत्रात काम करताना सद्यस्थितीत होणाऱ्या फसणुकीपासून प्रत्येकाने सतर्क राहा. कोणत्याही आमिषाला बळी पडू नका. बँकेच्या संपर्कात राहा. तुमच्या होणाऱ्या फसवणुकीबाबत बँक निश्चितच तुम्हाला सहकार्य करेल, असे प्रतिपादन रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे लोकपाल संजय कुमार यांनी आज झाराप येथे आयोजित टाऊन हॉल कार्यशाळेत केले.
भारतीय रिझर्व्ह बँक लोकपाल कार्यालय, मुंबईच्यावतीने झाराप येथील हॉटेल आराध्याच्या भव्य सभागृहात टाऊन हॉल बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्‍घाटन लोकपाल संजय कुमार यांच्या हस्ते दीपप्रज्वलाने झाले. यावेळी उपलोकपाल एच. एस. वर्मा, बँक ऑफ इंडिया रत्नागिरी झोनल मॅनेजर नरेंद्र देवरे, बँक ऑफ महाराष्ट्रच्या अधिकारी शिल्पा शिंदे, जिल्हा अग्रणी बँकेचे जिल्हा प्रबंधक मुकेश मेश्राम, विदर्भ कोकण बँकेचे अधिकारी बाबुराव सामंत, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे, भारतीय रिझर्व्ह बँकेचे अधिकारी आकाश काबरा, चैतन्या कृष्णन, पायल बेरा, श्रीहरी त्रिपाठी, गोवा व महाराष्ट्र राज्यांतील विविध बँकांचे अधिकारी, प्रतिनिधी व ग्राहक वर्ग उपस्थित होता.
संजयकुमार म्हणाले, ‘‘बँकिंग क्षेत्रात वाटचाल करताना विविध माध्यमातून फसवण्याचे जाळे मोठ्या प्रमाणात विणले गेले आहे. प्रत्येक ग्राहक, अधिकारी या सर्वांनी सतर्क राहणे काळाची गरज आहे. मोबाईलच्या माध्यमातून फसविण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात होत असून, त्यांना आळा घालणे प्रत्येकाचे काम आहे. मोबाईलच्या माध्यमातून दाखविल्या जाणाऱ्या आमिषांना बळी न पडता तुमच्या समस्यांवर मात करण्यासाठी बँकांच्या शाखाधिकारी किंवा नजीकच्या बँक शाखेशी संपर्क साधा. कोणत्याही आमिषांना बळी न पडता सुरक्षित राहा. भारतीय रिझर्व्ह बँक तुमच्या सोबत राहील. बँकिंगबाबत जे काही मार्गदर्शन करता येईल, त्या दृष्टिकोनातून कार्यरत राहू.’’
प्रमोद गावडे यांनी जिल्हा बँकेच्या माध्यमातून सर्व सेवा देण्यासाठी कार्यरत राहू, असे सांगितले. श्रीहरी त्रिपाठी यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविकात आकाश काबरा यांनी रिझर्व्ह बँकेने ३० दिवसांच्या आत तुमच्या तक्रारीचे निराकरण न केल्यास ग्राहक पोर्टलवर अथवा लोकपाल कार्यालयात तक्रार करू शकतात, अशी माहिती दिली. श्री. सामंत, राजू तेंडुलकर यांनी समस्या मांडल्या. रमाकांत सातार्डेकर यांनी जिल्ह्यात लोकपाल टाऊन हॉल बैठक घेतल्याबद्दल ''आरबीआय''चे आभार मानले. आभार प्रदर्शन जिल्हा अग्रणी प्रबंधक मुकेश मेश्राम यांनी केले.
---
तक्रारी आल्यास बँकेशी संपर्क साधा
श्री. देवरे यांनी, ग्राहक हे आपले दैवत आहे. त्यांना चांगली सेवा देणे प्रत्येकाचे काम आहे. जिल्हा अग्रणी प्रबंधक सिंधुदुर्ग व रत्नागिरी यांचे काम खूप चांगले आहे, असे सांगत सिंधुदुर्ग जिल्हा अग्रणी प्रबंधक मुकेश मेश्राम यांचे कौतुक केले. स्टेट बँक ऑफ इंडियाचे अधिकारी केतन जोशी यांनी फसवणुकीबाबत तुमच्याकडे तक्रारी आल्यास तत्काळ बॅंकेशी संपर्क साधा, असे आवाहन केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com