आमदार नाईकांना जागा दाखवू

आमदार नाईकांना जागा दाखवू

89272

आमदार नाईकांना जागा दाखवू

शिंदे, गावकर : मतदारसंघात धनुष्यबाण चिन्हासाठी आग्रही

सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. १० : लोकसभा निवडणुकीत सिंधुदुर्गातील जनतेने ठाकरे शिवसेनेचे उमेदवार विनायक राऊत यांना जागा दाखवून दिली. आता येत्या विधानसभेच्या निवडणुकीत आमदार वैभव नाईक यांना त्यांची जागा दाखवून देऊ, असा इशारा शिवसेनेचे (शिंदे गट) कुडाळ-मालवण विधानसभाप्रमुख बबन शिंदे व तालुकाप्रमुख राजा गावकर यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिला. येत्या विधानसभा निवडणुकीत कुडाळ-मालवण मतदारसंघाचा उमेदवार हा ‘धनुष्यबाण’ या चिन्हावर निवडणूक लढविणारा असावा, अशी सर्व शिवसेनेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांची इच्छा असल्याचे श्री. गावकर यांनी स्पष्ट केले.
सागरी महामार्ग येथील हॉटेल रामेश्वर येथे पत्रकार परिषद झाली. यावेळी तालुकाप्रमुख महेश राणे, महिला उपजिल्हाप्रमुख नीलम शिंदे, तालुकाप्रमुख आशा वळपी, शहरप्रमुख गीता नाटेकर, विभागप्रमुख गीतांजली लाड, उपविभागप्रमुख भक्ती कवटकर, उदय गावडे, पराग खोत, अरुण तोडणकर, श्रीहरी खवणेकर, विशाल आचरेकर, आदी उपस्थित होते.
श्री. शिंदे म्हणाले, ‘नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांना रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील जनतेने भरघोस मतांनी निवडून दिले. त्यांच्या या विजयात कुडाळ-मालवण तालुक्यांतील शिवसेना आणि भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा खारीचा वाटा आहे. यापूर्वी भाजपच्या निशाणीवर निवडणूक लढवली गेली नाही. मात्र, यावेळी राणे यांच्या रूपाने कोकणात भाजपचे कमळ फुलले आहे. कुडाळ-मालवण मतदारसंघांतून मिळालेले मताधिक्य पाहता येत्या विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराचा विजय निश्चित असून विद्यमान आमदारांसाठी ही धोक्याची घंटा असेल. लोकसभा निवडणुकीत मिळालेले २८ हजारांचे मताधिक्य ३५ हजारांपर्यंत कसे जाईल, यादृष्टीने येत्या काळात मतदारसंघात काम केले जाणार आहे.’
मतदारसंघात ठाकरे शिवसेनेचे वर्चस्व असल्याचे सांगितले जात होते. प्रत्यक्षात राऊत यांना मतदारसंघातील जनतेने नाकारल्याचे दिसून आले. शिवाय राऊत यांच्या विजयासाठी आमदार नाईकांनी कामच केले नसल्याचा आरोप श्री. शिंदे यांनी केला. राऊत यांना आपल्या मतदारसंघातून मताधिक्य मिळवून देण्यात आमदार नाईक हे अपयशी ठरले. त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही श्री. शिंदे यांनी केली. पक्षात असलेल्या अंतर्गत वादाचा फटका श्री. राऊत यांना बसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
श्री. गावकर म्हणाले, ‘महायुतीचे उमेदवार म्हणून राणेंचे नाव घोषित केल्यानंतर ठाकरे शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते हे वेगळ्याच अविर्भावात वावरत होते. त्यांना आपल्या उमेदवाराचा सहज विजय होईल, असे वाटत होते. मात्र, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, दीपक केसरकर यांनी रणनीती आखत नियोजनबद्ध प्रचार केला. त्यामुळेच राणेंचा विजय झाला. राऊत यांच्यानंतर आता आमदार नाईक यांची वेळ आहे. त्यांना येत्या विधानसभेच्या निवडणुकीत धूळ चारल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. त्यांना बबन शिंदे, राजा गावकर शिंदे गटात गेल्याने कोणताही फरक पडणार नाही, असे वाटत होते. मात्र, आम्ही लोकसभा निवडणुकीत त्यांना चांगली प्रचिती घडवून आणली. कुडाळ-मालवण मतदारसंघ हा शिवसेनेचा असल्याने या मतदारसंघात महायुतीचा उमेदवार हा धनुष्यबाण या निशाणीवर निवडणूक लढविणारा असावा, अशी सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांची इच्छा आहे. याची मागणी आम्ही वरिष्ठांकडे करणार आहोत.’
-----------
चौकट
अपप्रचारामुळे रत्नागिरीत मताधिक्य घटले
लोकसभा निवडणुकीत मंत्री उदय सामंत, किरण सामंत यांनी महायुतीचे काम केले नसल्याचा आरोप होत आहे. याबाबत विचारले असता श्री. गावकर म्हणाले, ‘रत्नागिरी जिल्ह्यात महायुतीच्या उमेदवाराचा सामंत बंधूंकडून प्रभावी प्रचार करण्यात आला. मात्र, राणे यांना या जिल्ह्यातून मताधिक्य न मिळण्याची अन्य कारणे आहेत. यात विरोधकांकडून झालेला अपप्रचार हे प्रमुख कारण आहे. या अपप्रचाराला रत्नागिरीतील जनता बळी पडल्याने राणेंचे मताधिक्य घटले.’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com