वाशी येथील वीजरोधक यंत्रणा बंद

वाशी येथील वीजरोधक यंत्रणा बंद

Published on

वाशी येथील वीजरोधक यंत्रणा बंद

ग्रामस्थांकडून दुरुस्तीची मागणी; दोन किलमीटर परिसर बनतो सुरक्षित

सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. १ ः वीज कोसळून होणाऱ्या दुर्घटनांमध्ये मनुष्य तसेच पशुधनाची जीवितहानी टाळण्यासाठी वीजरोधक यंत्रणा काही गावात बसवण्यात आली होती. संगमेश्वर तालुक्यातील वाशी गावात वीजरोधक यंत्रणा बसवण्यात आली; परंतु गेले दोन वर्षे ही यंत्रणा बंद आहे. केवळ कागदावर ही यंत्रणा कार्यान्वित असल्यामुळे प्रत्यक्षात त्याचा काहीच उपयोग नाही. ही यंत्रणा चालू करावी, अशी मागणी ग्रामस्थांमधून केली जात आहे.
कोकणात पावसाळापूर्व तसेच पावसाळा संपता संपता विजेच्या गडगडाटासह जोरदार पाऊस पडतो. वीज कोसळून होणाऱ्या दुर्घटनांमध्ये दरवर्षी अनेक शेतकरी, पशुपालक, नागरिकांचा तसेच जनावरांचा मृत्यू होतो. शेतकऱ्यांसाठी प्राणघातक असलेल्या या नैसर्गिक संकटामुळे शेती व्यवसायात मोठी जोखीम निर्माण झाली आहे तर इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे, विजेवर आधारित महत्वाच्या यंत्रणा यांना धोका निर्माण होतो. अनेक ठिकाणी वीज पडण्याबरोबरच लाखोंची मालमत्ता, उपकरणे यांनाही मोठ्या प्रमाणावर हानी पोहोचत आहे. जीवितहानी टाळण्यासाठी राज्यशासनाने गांभीर्याने विचार करून २०१३ मध्ये प्रत्येक गावामध्ये वीज कोसळण्याची पूर्वसूचना देणारी वीजरोधक यंत्रणा बसवावी, अशा सूचना केल्या होत्या. काही शासकीय कार्यालयाबरोबर काही गावांमध्ये ही यंत्रणा बसवण्यात आली होती. वीजरोधक यंत्रणा बसवल्यानंतर यंत्राच्या सुमारे दोन किलमीटर परिसरात वीज कोसळल्यास वीजरोधक यंत्रणा ती वीज आपल्याकडे खेचून घेते. त्यानंतर त्या प्रणालीच्या माध्यमातून जमिनीमध्ये तो वीजप्रवाह वळवला जातो. त्यामुळे वीज पडण्याच्या घटना कमी होऊन जीवितहानी टळते. संगमेश्वर तालुक्यातील वाशी येथेही यंत्रणा बसवण्यात आली होती; परंतु गेली दोन वर्षे ही यंत्रणा बंद आहे. आपत्ती व्यवस्थापनाच्या बैठकीमध्ये ही यंत्रणा चालू असल्याचे सांगण्यात येते; पण प्रत्यक्षात ही यंत्रणा बंद आहे. ही यंत्रणा दुरुस्त करण्यासाठी तहसीलदार कार्यालयाकडून बांधकाम विभागाला सूचना करण्यात आल्या होत्या; परंतु बांधकाम विभागाने अद्याप ही यंत्रणा दुरुस्त केलेली नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.