ओबीसींच्या हक्कासाठी लढणार

ओबीसींच्या हक्कासाठी लढणार

Published on

ओबीसींच्या हक्कासाठी लढणार

अण्णा केसरकर ः कुडाळात आरक्षित समाज कार्यालयाचे उद्‍घाटन

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २ ः जिल्ह्यात ओबीसी व मराठा समाज असा संघर्ष करण्याचा प्रयत्न केला नाही व तो कोणी करू नये. घटनेने दिलेल्या अधिकारासाठी हा आमचा लढा आहे. तो कुठल्या जाती अथवा समाजाच्या विरोधात नाही. राज्यात आरक्षणाचा विषय चालू असताना ओबीसी म्हणून आम्हाला दाबण्याचा प्रयत्न केला जात असेल तर त्या विरोधात लढल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा केसरकर यांनी कुडाळ येथील सिंधुदुर्ग जिल्हा ओबीसी आणि आरक्षित समाज सिंधुदुर्गच्या कार्यक्रमात बोलताना दिला.
सिंधुदुर्ग जिल्हा ओबीसी आणि आरक्षित समाज महासंघ सिंधुदुर्ग यांचे जिल्हा संपर्क कार्यालय कुडाळमध्ये भोगटे बिल्डींग कंपाउंड येथे सुरू केले आहे. या कार्यालयाचे उद्‌घाटन श्री. केसरकर यांच्या हस्ते झाले. यानंतर ओमकार डिलक्स येथील आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सावळाराम अणावकर, सिंधुदुर्ग जिल्हा आरक्षित समाज महासंघाचे अध्यक्ष नितीन वाळके, ओबीसी समाजाचे राष्ट्रीय प्रतिनिधी सुनील भोगटे, राज्य समन्वयक काका कुडाळकर, संघाचे महासचिव नंदन वेंगुर्लेकर, कार्याध्यक्ष रमण वायंगणकर, चंद्रशेखर उपरकर, खजिनदार बाळासाहेब बोर्डेकर, सुतार समाजाचे आनंद मेस्त्री, अस्मिता बांदेकर, जिल्हा कार्यकारिणी सदस्य नामदेव मठकर, चंद्रकांत कुंभार, मनोहर सरमळकर, आत्माराम ओटवणेकर, दयानंद चौधरी, वर्षा कुडाळकर, अतुल बंगे, रुपेश पावसकर, बाळ कनयाळकर, श्रीराम चव्हाण, रामदास चव्हाण आदी उपस्थित होते.
श्री. केसरकर म्हणाले, ‘‘समाजबांधवांनी संकुचित वृत्तीने न राहता एकत्र येऊन संघटनावाढीसाठी प्रयत्न करावा. व्यक्तीपेक्षा समाज संघटना महत्त्वाची असते. संघटनेसाठी सतत संघर्ष करा. यातून समाजावर होणारे अन्याय थांबविले पाहिजेत. यासाठी लढवय्या म्हणून पुढे या. ओबीसी समाज जातीधर्मात भेदभाव करत नाही; परंतु ओबीसी म्हणून न्याय मिळण्यासाठी संघर्ष करत राहणार आहोत. ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागत असेल, तर गप्प बसणार नाही. जिल्ह्यातील ओबीसी समाजाने एकसंघ राहिले पाहिजे. राज्यातील वैचारिकता व घटनेला अनुसरून बांधिल राहून काम करा.’’ ओबीसी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच पोलिसपाटलांचा सत्कार करण्यात आला. नंदन वेंगुर्लेकर यांनी सूत्रसंचालन केले. सुनील भोगटे यांनी आभार मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
...........
चौकट
संघटना मजबूत करा
नितीन वाळके यांनी, संघर्षनातूनच आरक्षणाची प्रेरणा व विचार पुढे आला. आरक्षण हे प्रथम सामाजिक आहे. ते दबलेल्यांचा आवाज पुढे आणण्यासाठी आहे. शेवटच्या घटकाला वर आणण्याचा प्रयत्न आरक्षण करत आहे, असे सांगितले. सुनील भोगटे यांनी, यापुढे कुडाळ तालुक्यात ९ जिल्हा परिषद मतदार संघनिहाय ६९ गावांमध्ये संघटनेची मोट बांधायची आहे. हे कोणत्याही राजकीय पक्षाला ताकद दाखविण्यासाठी नसून संघटना मजबूत करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन केले. आनंद मेस्त्री यांनी संविधानाने आपल्याला जे अधिकार दिले आहेत, त्यांच्या आड कोण येत असतील, तर त्याचा प्रतिकार केला पाहिजे, असे प्रतिपादन केले. सावळाराम अणावकर यांनी समाजबांधव म्हणून सांघिक शक्ती वाढवा, असे आवाहन केले. अस्मिता बांदेकर यांनी समाजाने एकत्र येणे ही काळाची गरज असल्याचे मत व्यक्त केले.
94240

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.