सावंतवाडीत विद्यार्थ्यांना आरोग्याचे धडे

सावंतवाडीत विद्यार्थ्यांना आरोग्याचे धडे

सावंतवाडीत विद्यार्थ्यांना आरोग्याचे धडे

वैद्यदिन उत्साहात ः स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलचा उपक्रम

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २ ः लहान मुलांपासून ते वयस्कर व्यक्ती देखील शारीरिक व मानसिक दृष्ट्या काही अडचणी उद्भवल्यास वैद्यांच्या सल्ल्याने व त्यांच्या योग्य मार्गदर्शनानेच त्या सोडविण्याचा प्रयत्न करतात. वैद्य देखील आपल्या रुग्णांची तितकीच काळजी घेऊन त्यांना रोगमुक्त करतात. अशा या वैद्यांचे महत्त्व सर्व विद्यार्थ्यांना पटवून देण्याकरिता स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमध्ये राष्ट्रीय वैद्यदिन साजरा करण्यात आला.
विद्यार्थ्यांना पौष्टिक अन्न व जीवनसत्त्व यांचे आहारातील महत्त्व समजावून सांगण्यासाठी आयुर्वेदिक वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ व संत गजानन महाराज कॉलेज महागाव-गडहिंग्लज येथे असोशिएट प्रोफेसर म्हणून कार्यरत असलेल्या एम. एस. आयुर्वेदा डॉ. गौरी गणपत्ये यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना बाहेरील अन्नपदार्थ न खाता घरगुती पौष्टिक अन्न ग्रहण केल्यामुळे आपल्या शरीराला पोषक जीवनसत्वे प्राप्त होतात, याबद्दल माहिती सांगितली. दातांची काळजी कशी घ्यावी, याबद्दल मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी कोणकोणते पदार्थ खाल्ले पाहिजे व बाहेरील जंकफूड खाल्ल्यामुळे आपल्या शरीराचे कसे नुकसान होते, ते पटवून दिले. विद्यार्थ्यांनी उत्सुकतेने या कार्यक्रमात सहभाग घेतला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शालेय सहायक शिक्षिका श्रावणी प्रभू यांनी केले. डॉ. गणपत्ये यांना रोपटे भेट म्हणून देण्यात आले.
वैद्यदिनाचे औचित्य साधून पाचवी व सहावीच्या विद्यार्थ्यांना पौगंडावस्थेतील होणारे शारीरिक बदल, मानसिक बदल, या वयात येणाऱ्या अनेक शारीरिक व मानसिक समस्या व त्यांचे निवारण यासंबंधी माहिती देण्यात आली. पाचवी व सहावीच्या विद्यार्थिनींना येथील प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. भक्ती सावंत यांनी मार्गदर्शन केले. प्रशाळेच्या समुपदेशक व मानसोपचार तज्ज्ञ डॉ. मोहिनी वजराटकर यांनीही विद्यार्थ्यांचे प्रबोधन केले. यामध्ये पौगंडावस्थेत होणारी चिडचिड, हट्टीपणा आदी समस्या व त्यांचे निराकरण याबद्दल माहिती दिली. डॉ. सावंत व डॉ. वजराटकर यांना रोपटे भेट म्हणून देण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी शाळेचे संस्थापक ऋजुल पाटणकर व मुख्याध्यापिका साळगावकर यांनी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय वैद्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमांचे संयोजन शालेय समन्वयक सुषमा पालव यांनी केले. मुख्याध्यापिका प्राची साळगावकर यांनी आभार मानले.
94244

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com