लांजा - माचाळकडे वळताहेत पर्यटकांची पावले

लांजा - माचाळकडे वळताहेत पर्यटकांची पावले

94252

माचाळकडे वळताहेत पर्यटकांची पावले
धबधब्यांवर निर्बंधाचा परीणाम ; ४०० वर्षाच्या इतिहासाची साक्ष
सकाळ वृत्तसेवा
लांजा, ता. २ः धबधब्यांच्या ठिकाणी झालेल्या दुर्घटनांमुळे कडक प्रशासनाकडून लागू केलेले निर्बंध आणि मनाई आदेश यामुळे लांजा तालुक्यातील ‘मिनी महाबळेश्वर’ समजल्या जाणाऱ्या माचाळ या पर्यटन गावाला वर्षा पर्यटनाकरिता पर्यटकांची पावले वळू लागली आहेत. वीकेंडला शनिवारी -रविवार या दिवशी माचाळला सर्वाधिक पसंती दिली जात आहे.
समुद्रसपाटीपासून सर्वाधिक उंचीवर असलेल्या लांजा तालुक्यातील माचाळला जाण्यासाठी आता थेट रस्ता झाल्याने पर्यटकांना अधिक सोयीचे झाले आहे. पावसाळ्यात या ठिकाणचे सौंदर्य अधिक खुलले आहे. लांजा तालुक्याच्या पूर्व दिशेला नयनरम्य माचाळ गाव पर्यटनाच्यादृष्टीने लक्षवेधी ठरला आहे. येथील निसर्गसंपदा पर्यटकांसाठी आकर्षित करणारी ठरली आहे. मिनी महाबळेश्वर म्हणून माचाळची ओळख आहे. ४०० वर्षाच्या इतिहासाची साक्ष या गावाला लाभलेली आहे. पावसाची रिमझिम, अंगाला झोबणारा वारा, येथील थंडगार हवा, सर्वत्र हिरवाई, समोरच दिसणारा विशाळगड, उच उंच नागमोडी डोंगरकडे, सह्याद्रीच्या हिरव्यागार रांगा, नकळत दृष्टीस पडणारे वन्यजीव, थंडगार पाणी, प्राणी-पक्ष्यांचा आवाज, मुचकुंदी ॠषींची गुंफा, मोठमोठे अनोखे वृक्ष असे हे निसर्ग सौंदर्य पर्यटकांना खुणावते आहे. त्यामुळे या ठिकाणाला पर्यटकांची पसंती वाढती आहे. याच माचाळ या पर्यटन गावापासून अवघ्या दोन किमीवर विशाळगड आहे. माचाळ वर्षा पर्यटनाच्यादृष्टीने अधिक सुरक्षित आहे.


चौकट
झापाच्या घरांचे आकर्षण
माचाळ गावात अनेक वर्षाची संस्कृती, रूढी-परंपरा जपलेल्या आहेत. पाऊस-वारा यापासून संरक्षित करणारी झापाची घरे येथे येणाऱ्या पर्यटकांना आकर्षण करतात. आता या ठिकाणी आगाऊ राहण्याची जेवणाची सोय येथील गावकरी करून देतात.

चौकट

खोरनिनको धबधब्यावर मनाई आदेश
लांजा तालुक्यातील वेरवली येथे धबधब्याच्या ठिकाणी एकजण बुडून मृत्यूमुखी पडल्यामुळे लांजा तालुक्यातील प्रसिद्ध खोरनिनको धबधबा आणि इतर धबधब्यांवर मनाई आदेश आहेत. त्याचबरोबर लोणावळा भुशी धरण धबधब्याच्या ठिकाणी मोठी दुर्घटना घडल्यामुळे धबधब्यांवरील पर्यटनावर निर्बंध लागू केले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com