रत्नागिरी-जिल्हा परिषदेला मिळणार ३६७ शिक्षक

रत्नागिरी-जिल्हा परिषदेला मिळणार ३६७ शिक्षक

जिल्हा परिषदेला मिळणार ३६७ शिक्षक
१५ दिवसांत कागदपत्रांची तपासणी ; अजून ६५७ शिक्षकांची पदे रिक्तच
रत्नागिरी, ता. २ : जिल्हा परिषदेला नव्याने ३६७ शिक्षक मिळणार आहेत. पवित्र पोर्टलवरून ही भरती करण्यात येणार आहे. येत्या पंधरा दिवसात या उमेदवारांचे कागदपत्र तपासणी होणार आहे. यामुळे महिनाभरात हे शिक्षक कामावर रूजू होतील. तरीही अजून ६५७ शिक्षकांची पदे रिक्त आहेत.
जिल्हा परिषद शाळांचा दर्जा व गुणवत्ता सुधारली आहे. हे गेल्या चार-पाच वर्षात दिसत आहे. गतवर्षी शैक्षणिक गुणवत्तेमध्ये रत्नागिरी जिल्हा हा राज्यात अव्वल ठरला होता; मात्र रिक्त पदांची संख्या वाढत गेल्याने शैक्षणिक कारभार चालवताना जिल्हा परिषद प्रशासनाला कसरत करावी लागत होती. चालू वर्षी आंतरजिल्हा बदल्या तसेच सेवानिवृत्त होणार्‍या शिक्षकांच्या संख्येमुळे जवळपास २ हजार पदं रिक्त होती; मात्र शासनाने १ हजार पदे भरण्यास मंजुरी दिली होती. त्यानुसार मे महिन्यात ९९७ शिक्षकांची भरती झाली. यामुळे नव्या शैक्षणिक वर्षात शिक्षण विभागाला दिलासा मिळाला होता.
ही भरती झालेली असतानाच जुलैच्या पहिल्या आठवड्यात पुन्हा मराठी माध्यमासाठी ३४८ व उर्दू माध्यमासाठी १९ शिक्षक पवित्र पोर्टलमधून भरण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार ही प्रक्रिया सुरू झाली असून, येत्या पंधरा दिवसात या शिक्षकांची कागदपत्रांची तपासणी पूर्ण होणार आहे. त्यानंतर या शिक्षकांना नियुक्त देण्यात येणार आहे. त्यामुळे महिनाभरात हे शिक्षक शाळेवर रूजू होणार आहेत. यामुळे अध्यापनाच्यादृष्टीने विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. नवे शिक्षक मिळाल्याने आता फक्त ६५७ पदे रिक्त आहेत.

चौकट...
आंतरजिल्हा बदल्यांचा विचार नाही...
गतवर्षी तर ७०० शिक्षकांना एका रात्रीत सोडण्यात आले होते. याबाबत प्रशासनाला विचारले असता जिल्ह्यात अजूनही ६५७ पदे रिक्त असल्याने आंतरजिल्हा बदलीप्राप्त शिक्षकांना सोडण्यात येणार नाही, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com