कुडाळात ‘आपला दवाखाना’ बंदावस्थेत

कुडाळात ‘आपला दवाखाना’ बंदावस्थेत

Published on

कुडाळात ‘आपला दवाखाना’ बंदावस्थेत

ठाकरे शिवसेनेकडून पोलखोल ः शिंदे सरकारकडून फसवणूक

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २ ः राज्याच्या वतीने सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत राज्यभरात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने ‘आपला दवाखाना’ सुरू केला आहे. मात्र, शहरात कार्यरत असलेला हा दवाखाना बंद असल्याचे वास्तव ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी समोर आणले. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यावर आपले प्रेम असल्याचे दाखवण्यासाठी शिंदे सरकारने सर्वत्र दवाखाने सुरू केले. मात्र, हे दवाखाने बंद ठेवून (कै.) बाळासाहेब ठाकरे यांनाही फसवण्याचे काम शिंदे सरकारने केल्याचा आरोप ठाकरे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत यांनी केला. या बंद असलेल्या दवाखान्यांबाबत पदाधिकाऱ्यांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांची भेट घेऊन लक्ष वेधले.
सध्या सुरू असलेल्या राज्याच्या पावसाळी अधिवेशनात कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांनी हिंदुहृदयसम्राट (कै.) बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने आपला दवाखाना सिंधुदुर्ग जिल्ह्यात ठिकठिकाणी उभारले आहेत, हे सुरू आहेत का? असा प्रश्न सरकारला विचारला होता. या चर्चेत सत्ताधारी आमदार नीतेश राणे यांनी सहभाग घेत जिल्ह्यातील हे सर्व दवाखाने सुरू असल्याची माहिती सभागृहात दिली होती. या दवाखान्यांवरून आमदार नाईक आणि आमदार राणे यांच्यात जोरदार खडाजंगी झाली होती. त्यानंतर काल (ता. १) शहरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कन्याशाळेलगत असलेल्या ‘आपला दवाखाना’ याला ठाकरे गट पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेट दिली. यावेळी हा दवाखाना कुलूपबंद स्थितीत असल्याचे समोर आले. तर या दवाखान्याला वीज जोडणीही नाही. कोणतीही सुविधाही नसल्याचे वास्तव ठाकरे गटाने समोर आणले. यावेळी उपजिल्हाप्रमुख सावंत, तालुकाप्रमुख राजन नाईक, तालुका संघटक बबन बोभाटे, अतुल बंगे, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी, शहरप्रमुख संतोष शिरसाट, उपतालुकाप्रमुख कृष्णा धुरी, ओबीसी सेल शहरप्रमुख राजू गवंडे, विभागप्रमुख गंगाराम सडवेलकर, गुरू गडकर आदी उपस्थित होते.
---
कै. बाळासाहेबांना फसवण्याचे काम
उपजिल्हाप्रमुख सावंत म्हणाले, ‘‘शहरातील ‘आपला दवाखाना’ला भेट दिली असता तो कुलूपबंद स्थितीत असल्याचे वास्तव समोर आले आहे. प्राथमिक शाळेची इमारत या दवाखान्यासाठी घेण्यात आली. इमारतीला नावाचा फलक लावला असून रंगरंगोटी केली आहे; परंतु वीज, पाणी जोडणी नाही. कोणतीही आवश्यक सुविधाही उपलब्ध केल्याचे दिसत नाही. शिंदे गटाने शिवसेना पक्ष फोडला, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव व निशाणी चोरली, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यावर आपले प्रेम असल्याचे दाखवण्यासाठी सर्वत्र दवाखाने सुरू केले. मात्र, हे दवाखाने बंद ठेवून (कै.) बाळासाहेब ठाकरे यांनाही फसवण्याचे काम शिंदे गटाने केले आहे.’’
94399

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.