रत्नागिरी - श्री देव भैरी मंदिरात तरुणाचा धिंगाणा

रत्नागिरी - श्री देव भैरी मंदिरात तरुणाचा धिंगाणा
Published on

भैरी मंदिरात तरुणाचा गोंधळ

पुजाऱ्यासह दोघांना मारहाण; संशयित ताब्यात

रत्नागिरी, ता. २ : रत्नागिरीकरीचे ग्रामदैवत भैरी एका तरुणाने गोंधळ घातला. रात्रभर शहरात धुमाकूळ घालून पोलिसांच्या नाकीनऊ आणणाऱ्‍या या तरुणाने मंदिरात प्रवेश केला. भगवतगीता वाचल्यानंतर अंगात वारे संचारल्याप्रमाणे मंदिरात धुडगूस घातला. त्याला बाहेर काढायला गेलेल्या एका पुजाऱ्‍याच्या डोक्यात धुपारती मारली, तर दुसऱ्‍या पुजाऱ्याच्या डोक्यात घंटा मारून त्याला गंभीर जखमी केले आहे. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
अचानक आज दुपारी १२ च्या सुमारास एक तरुण मंदिरात आला. त्याने तेथे असलेल्यांना काठीने मारण्यास सुरुवात केल्याने भक्तमंडळीचीही पळापळ झाली. नेमके काय घडते आहे, हे कोणाच्याच लक्षात येत नव्हते. त्यानंतर मात्र त्याला रोखण्याचे प्रयत्न सुरु झाले. ते यशस्वीही झाले. मात्र त्या युवकाने केलेल्या मारहाणीमुळे २ जण जखमी झाले. कर्ला परिसरात राहणारा तरुण इंजिनिअर आहे. सोमवारी तर्रर्र होऊन तो घरी आला होता. घरात राडा करून त्याने त्यांना सर्वांनाच जेरीस आणले. त्याच्या त्रासाला कंटाळून घरच्यांनी पोलिसांना बोलावून घेतले होते. रात्रभर त्याने पोलिसांसह घरच्यांनादेखील हैराण करून सोडले होते.
समीत पिलणकर असे त्या संशयित तरूणाचे नाव आहे. पोलिसांनी रात्री त्याला ताब्यात घेतले होते. मंगळवारी पहाटेच्या सुमारास त्याला शहर पोलिसांनी ताकीद देऊन सोडून दिले. ताकीद दिल्यानंतर तो सरळ घरी जाईल, असे पोलिसांना वाटले. मात्र हा तरूण थेट भैरी मंदिरात गेला. तो एकदम शांत बसला होता. मंदिरात बसून त्याने ३ तास भगवद्गीता वाचली. परंतु दुपारी अचानक उभा राहिला आणि थेट गाभाऱ्‍याकडे धावत सुटला. त्याने क्षणात गाभाऱ्‍यात प्रवेश केला. त्यावर सारे त्याला बाहेर काढण्यासाठी धावले. मंदिराचे पुजारी चंदू गुरव धावत गाभाऱ्‍याकडे गेले. त्यांनी त्या तरूणाला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला मात्र त्याने धुपारती उचलून चंदू गुरव यांच्या डोक्यात मारली. यामध्ये ते गंभीर जखमी झाले. त्यांना वाचविण्यासाठी त्यांचा मुलगा समीर गुरव पुढे आला. समित याने समीरच्या डोक्यात पाटावर असलेली घंटा मारली व त्यालाही जखमी केले. त्याला जमावाने कसेबसे पकडले आणि लागलीच पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. तरुण अचानक बेकाबू कसा झाला याची चर्चादेखील आता सर्वत्र सुरू आहे. शहर पोलिस निरीक्षक महेश तोरस्कर यांनी मंदिरात येऊन पाहणी केली. या व्यक्तीची चौकशी सुरू होती. मात्र सायंकाळी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

--------------

चौकट...
दोन नेत्यांनाही समितकडून प्रसाद
हा प्रकार सुरू असताना रत्नागिरी शहरातील सुप्रसिद्ध व्यक्ती दर्शनासाठी मंदिरात गेल्या होत्या. या व्यक्ती वेगवेगळ्या पक्षाचे नेते असून, तेही त्या तरुणावर नियंत्रण आणण्यासाठी पुढे आले. मात्र त्या नेत्यांनादेखील त्याने सोडले नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com