‘ते’ १३ कोटी ६२ लाख कुणाच्या घशात?

‘ते’ १३ कोटी ६२ लाख कुणाच्या घशात?

Published on

94640
94641

‘ते’ १३ कोटी ६२ लाख कुणाच्या घशात?

रणजित तावडे ः वैभववाडीतील अपूर्ण विकासकामांवरुन प्रश्न

सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. ३ ः वाभवे वैभववाडी नगरपंचायतीकडे प्राप्त झालेल्या १३ कोटी ६२ लाख रूपयांच्या विकास निधीतून शहरात एकही विधायक आणि दर्जेदार काम झाल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे हा निधी नेमका कुणाच्या घशात गेला? याचे स्पष्टीकरण सत्ताधाऱ्यांनी द्यावे, अशी मागणी ठाकरे गटाचे नगरसेवक रणजित तावडे यांनी करतानाच गटाराचे अर्धवट काम गणेशोत्सवापूर्वी पूर्ण न केल्यास भाजपच्या शहर प्रवक्त्यांच्या घरासमोर आंदोलन करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.
येथील ठाकरे शिवसेनेच्या संपर्क कार्यालयात ठाकरे गटाचे नगरसेवक व महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची पत्रकार परिषद झाली. यावेळी तालुकाप्रमुख मंगेश लोके, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष रवींद्र चव्हाण, नगरसेवक मनोज सावंत, ठाकरे शिवसेनेचे शहरप्रमुख शिवाजी राणे आदी उपस्थित होते.
श्री. तावडे म्हणाले, ‘‘चार-पाच दिवसांपूर्वी भाजपने नव्याने शहर प्रवक्तेपदी नियुक्त केलेले डॉ. राजेंद्र पाताडे यांनी वैभववाडी शहराच्या विकासासाठी १३ कोटी ६२ लाखांचा निधी प्राप्त झाल्याचे सांगून अनेक विकास कामे मार्गी लावल्याचे स्पष्ट केले होते. याशिवाय अनेक विकासकामांची छायाचित्रेही प्रकाशीत केली होती. परंतु, श्री. पाताडे यांनी शहरवासीयांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे. नगरपंचायतीने विकास नाही तर शहराचा भकास केला आहे. शहरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला नाही, सांडपाणी, गटाराचे बांधकाम यासह कोणतीच कामे पूर्ण झालेली नाहीत. ५० लाखांच्या बंधाऱ्यात थेंबभर पाणी नाही. मग प्राप्त झालेले १३ कोटी ६२ लाख कुणाच्या घशात गेले, याचे उत्तर डॉ. पाताडे यांनी द्यावे. शहरात जिकडे तिकडे चिखलाचे साम्राज्य आहे. गटारात डासांची उत्पत्ती होवू लागली आहे. त्यामुळे शहरात रोगराई पसरल्यास त्याला नगरपंचायत जबाबदार असेल.’’ ते पुढे म्हणाले, ‘‘नगरपंचायतीने अर्धवट ठेवलेल्या गटारामुळे शहरात अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. या गटाराचे काम गणेशोत्सवापूर्वी पूर्ण न केल्यास नगरपंचायतीला टाळे ठोकून खोट्या विकासाचा आभास निर्माण करणारे भाजपचे शहरप्रवक्ते डॉ. पाताडे यांच्या घरासमोर आंदोलन केले जाईल.’’
----------
चौकट
फलकाच्या माध्यमातून प्रत्युत्तर
भाजपचे शहर प्रवक्त्यांनी शहरातील विकासकामांचा घोषवारा प्रोजेक्टरच्या माध्यमातून मांडला होता. त्याला प्रत्युत्तर म्हणून ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी बॅनरच्या माध्यमातून जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. यावर शहरातील चिखलमय परिसर, रस्त्यावर आलेले पाणी, अर्धवट गटार, पाणी नसलेला बंधारा अशी छायाचित्रे आहेत. त्यावर नगरपंचायतीचे १३ कोटी ६२ लाख गटाराच्या पाण्यात, असा उल्लेख केला असून वैभववाडी विकासाचे नवे व्हीजन असाही उल्लेख आहे.
-------------
कोट
वैभववाडी शहराच्या विकासाच्या नावाखाली अनागोंदी कारभार सुरू असून कोट्यवधी रूपयांच्या निधीचा अपव्यय झाला आहे. सत्ताधाऱ्यांकडून जनतेचा भ्रमनिरास झाला आहे. या सर्व प्रकरणामध्ये मी जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागणार असून गटारामुळे रोगराई पसरल्यास नगरपंचायतीवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
- रवींद्र चव्हाण, तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट
----------
94642
फलक हटविल्यामुळे नगरपंचायत धारेवर

वैभववाडी, ता. ३ ः येथील एसटी बसस्थानकासमोर ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी लावलेले फलक काढल्यामुळे नगरसेवक आणि पदाधिकारी चांगलेच आक्रमक झाले. त्यांनी नगरपंचायत कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. त्यानतंर ते बॅनर होते त्याच ठिकाण नेऊन ठेवण्यात आले. यावर शहरातील सद्यस्थितीची वस्तुस्थिती दर्शविणारी छायाचित्रे आहेत.
शहरात कालपासून (ता.२) एक वेगळ्याच फलकाची चर्चा सुरू झाली आहे. हे फलक आज प्रत्यक्षात ठाकरे शिवसेनेचे नगरसेवक आणि महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी येथील बसस्थानकासमोर उभे केले. दरम्यान, हे फलक आज ठाकरे शिवसेनेचे तालुकाप्रमुख मंगेश लोके, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे रवींद्र चव्हाण, नगरसेवक रणजित तावडे, नगरसेवक मनोज सावंत, स्वप्निल रावराणे, गणेश पवार यांनी बस स्थानकासमोर उभे केले. त्यानंतर हे सर्व पदाधिकारी कार्यालयात गेले. नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ ते फलक काढून नगरपंचायतीत नेले. ही माहिती मिळाल्यानंतर सर्व पदाधिकारी संतप्त झाले. त्यांनी नगरपंचायतीत जाऊन धिंगाणा घातला. नगरपंचायतीच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. तुम्ही फलक का काढले? इतर शेकडो फलक शहरात आहेत मग आमचेच फलक का काढले? असा प्रश्न करीत अधिकाऱ्यांवर तोंडसुख घेतले. पाऊणतास हा प्रकार नगरपंचायत कार्यालयात सुरू होता. नगरपंचायतीचे एस. व्ही. पवार यांनी पदाधिकाऱ्यांची समजुत काढण्याचा प्रयत्न केला. परंतु, जोपर्यंत फलक लावलेल्या ठिकाणी नेऊन ठेवले जात नाही, तोपर्यंत गप्प बसणार नाही, अशी भूमिका पदाधिकाऱ्यांनी घेतली. श्री. पवार यांनी वरिष्ठांशी चर्चा केल्यानंतर बॅनर होते त्या ठिकाणी नेऊन ठेवण्यास सांगितले. त्यानंतर पदाधिकारी कार्यालयातून निघुन गेले.
---
काय आहे फलकावर?
यावर शहरातील अर्धवट स्थितीतील गटारे, जागोजागी रस्त्यावर होत असलेला चिखल, कचरा अशा प्रकारची आठ ते दहा छायाचित्रे आहेत. शहरातील सद्यस्थितीची वस्तुस्थिती दर्शविणारी ही छायाचित्रे या फलकावर असून नगरपंचायतीचे १३ कोटी ६२ लाख गटाराच्या पाण्यात आणि वैभववाडी विकासाचे नव व्हीजन, असा मजकुर त्यावर आहे. शहरात या फलकाची जोरदार चर्चा सुरू आहे. अनेकांच्या स्टेटसला हे फलक आहेत. याशिवाय सोशल मीडियावर शेअर केले जात आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.