रत्नागिरी ः दागिने हस्तगत

रत्नागिरी ः दागिने हस्तगत

रेल्वेत चोरीतील १३ तोळे दागिने हस्तगत
शहर पोलिसांचे यश ः मडगाव येथे कारवाईत अलिबागच्या चोरट्यास अटक
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ३ : तांत्रिक तपासाची कमाल आणि तपासातील सातत्य यामुळे रेल्वे प्रवासात चोरी उघडकीस आणण्यात शहर पोलिसांना यश आले आहे. यातील चोरटा जेरबंद झाला असून चोरीस गेलेल्या १८ तोळे दागिन्यांपैकी १३ तोळे दागिने हस्तगत केले आहेत. महिलेच्या बॅगमधून दागिने चोरण्याची ही घटना २६ मे २०२४ ला घडली होती. ही कारवाई शहर पोलिसांतील गुन्हे प्रकटीकरण कक्षाच्या पोलिसांनी केली. प्रसाद जगन्नाथ पाटील (वय ३०, रा. भेरसे, अलिबाग, रायगड) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे. रेल्वेत चोरी करून पसार झालेल्या संशयित आरोपीला पकडण्यात शहर पोलिसांना यश आले आहे. पोलिसांच्या खबऱ्यांच्या संपर्कात आल्याने हा चोरटा पोलिसांच्या तावडीत सापडला.
अन्नमा जोसफ (५६, रा. केरळ, सध्या रा. डोंबिवली) हे केरळ ते मुंबई प्रवास करत होते. त्यांना कोकण रेल्वे मार्गावरील आडवली ते रत्नागिरी दरम्यान झोप लागली. त्याचा फायदा घेऊन चोरट्याने त्यांची बॅग व १८ तोळ्याचे सोन्याचे दागिने चोरून नेले होते. जोसेफ यांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर एक महिन्यानंतर पोलिसांनी चोरट्याला पकडले. शहर पोलिसांतील गुन्हे प्रकटीकरण कक्षाच्या पोलिसांनी केली. प्रसाद पाटील याचा तपास करताना पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजचा वापर केला. प्रसाद पाटील कुठे कसा गेला याचा ट्रेस सुरू असताना एका एटीएममध्ये पैसे काढत असताना त्याचा पूर्ण चेहरा समोर आला. त्यानंतर शहर पोलिसांनी शुक्रवारी २८ जूनला पहाटे मडगाव येथून त्याला अटक केली होती. प्रसादला अटक केल्यानंतर त्याने चोरलेले सोने कुठे नेले याचा तपास करताना ते सोने अलिबाग येथील अरुण जनबा घोटणे याला विकल्याची माहिती पुढे आली. पोलिसांनी अरुण घोटणे यालाही ताब्यात घेऊन त्याच्याकडून १८ तोळे पैकी १३ तोळे सोने जप्त करण्यात यश मिळवले.
अनेकदा रेल्वेमधील चोऱ्या उघडकीस येत नाहीत. चोरी एकीकडे होते तर त्याची तक्रार दुसऱ्या गावातील पोलिस स्थानकात होते. रेल्वे प्रवास दरम्यान चोरट्याचा माग काढणे सोपे नसते. मात्र रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण कक्षाच्या पोलिसांनी कमाल करत हो चोरी उघडकीस आणलीच परंतु दोन मुख्य संशयिताना जेरबंद करतानाच मुद्देमालसुद्धा जप्त केला.
ही कामगिरी शहर पोलिस निरीक्षक महेश तोरसकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण कक्षातील पोलिस उपनिरीक्षक श्याम आरमळकर, सहायक पोलिस उपनिरीक्षक दीपक साळवी, पोलिस हवालदार अरुण चाळके, राहुल जाधव, अमोल भोसले, पोलिस नाईक पंकज पडेलकर, आशिष भालेकर, भालचंद्र मयेकर पोलिस शिपाई अमित पालवे यांनी केली. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक श्याम आरमळकर करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com